स्त्रीवादी चळवळ
डॉ. मनीषा गुप्ते
टाच मारून प्रश्नांना
तू तुझं उत्तर
शोधायला हवं
घरट्याच्या दारावर
तुझ्या नावाचं
एक नवीन
अक्षर कोरायला हवं
मनीषा ताईंशी बोलले तेंव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, महिलांच्या अधिकारासाठी आग्रही भूमिका मांडणाऱ्या मनीषा ताईच्या बोलण्यात कुठेही पुरुष विरोधी सुर नव्हता. स्त्रीने आपला हक्क घ्यायलाच हवा म्हणून त्यासाठी पितृसत्तेला टक्का देणे आवश्यक आहे. पुरुष जन्मतः हिंसक नसतो, त्याला पुढे जाऊन कुटुंबप्रमुख करायचे असते म्हणून आक्रमक बनवले जाते. आपण लिंगभेदावर आधारित असमनातेच्या विरोधात आहोत, पुरुषांच्या नव्हे असे विचार मनीषा ताईंनी व्यक केले.
तीन पिढ्या पासून समाजकार्याचा वारसा मनीषा ताईंना लाभलेला आहे. बालपणापासून कुटुंबातून समाजकार्याचे, पुरोगामी संस्कारांचे बाळकडू मिळाले आणि सत्तरच्या दशकात दलीत, पीडित,गरजू स्त्रियांच्या हातात आपला हात देऊन स्त्रीवादी चळवळीत त्या सक्रिय झाल्या. स्वातंत्र्य लढा आणि कामगार चळवळीत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांपासून ते आयुष्यातील छोटे मोठे संघर्ष खंबीरपणे सोडवणाऱ्या महिलांपर्यंत अनेक व्यक्ती त्यांच्यासाठी प्रेरणादयी ठरल्या. अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये देखील इतर वंचित घटकांच्या हक्कांसाठी ठामपणे भूमिका घेत उभ्या राहिलेल्या ग्रामीण सहकारी स्त्रिया माझ्यासाठी रोल मॉडेल आहेत असं मनीषाताई म्हणतात. आम्ही एकमेकींना ताकत आणि साथ देत असतो म्हणून सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न बघणे शक्य होते असं त्यांना वाटते. मानवतावादी दृष्टिकोन हा उद्देश मुळाशी ठेवून त्यांचे कार्य सुरू आहे.
डॉ. मनीषाताई या अठरा वर्षांच्या असल्यापासून स्त्रीवादी चळवळीसोबत व आणीबाणीच्या काळापासून गेली पंचेचाळीस वर्षे आरोग्यविषयक, तसेच लिंगाधारित हिंसाचार विरोधी कार्यक्रम राबवत आहेत. महिला सर्वागीण उत्कर्ष मंडळ (मासूम) च्या माध्यमातून १९८७ पासून त्यांनी आणि डॉ रमेश अवस्थी यांनी ग्रामीण स्त्रियांबरोबर काम करायला सुरुवात केली ती आजतागायत. मुंबई विद्यापीठातून मायक्रोबायॉलॉजीमध्ये एम.एस्सी. केल्यानंतर समाजशास्त्रामध्ये, पितृसत्ता व जातिव्यवस्थेमधील ‘इभ्रत’ या संकल्पनेवर त्यांनी पीएच.डी. केली आहे.
पस्तीस वर्षांपूर्वी खेड्यात राहून आरोग्य शिक्षणाचं काम करताना त्यांच्या असं निदर्शनास आलं की भरमसाठ चक्रीव्याजावर घेतली जाणारी अनेक कर्जे वैद्यकीय कारणांसाठी होती. बिकटसमयी तारांबळ उडाल्यावर, गावातील प्राथमिक केंद्र अनेकदा निष्क्रीय असल्याकारणाने भाड्याची जीप करून रुग्णाला दूरवर उपचारासाठी घेऊन जावं लागायचं. कर्जाचे दुष्टचक्र वंचित घटकातील स्त्रियांच्या नेतृत्वाने मोडण्यासाठी १९९० साली डॉ रमेश अवस्थी यांनी मासूम तर्फे ‘“स्त्रीधन विकास प्रकल्प’” सुरु केला. आज स्त्रीधन प्रकल्प पाच ते सहा हजार महिलांपर्यंत पोहोचला आहे. आज बायका केवळ सक्षम होऊन पंधरा-वीस हजार रुपये घरी घेऊन जात नाहीत, तर दीडशे-दोनशे महिला ग्रामसभेत जाऊन आपले प्रश्न मांडत आहेत, सत्ताधारी पुरुषांना प्रश्न विचारत आहेत. काही गावात तर पुरुष कमी आणि बायका जास्त असं चित्र ग्रामसभेत दिसतं. एवढं राजकीय बळ आर्थिक हक्क प्रकल्पाने निर्माण केलं. मासूमच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये सबलीकरण हे मुख्य सूत्र असते.
स्वत:च्या शरीरावरील असलेलं समाजाचं, शासनाचं, धर्माचं, संस्कृतीचं, पितृसत्तेचं, वर्णव्यवस्थेचं व भांडवलशाहीचं नियंत्रण ओळखून, ‘‘माझ्या शरीरावरती माझा हक्क आहे’’ अशी मांडणी स्त्रीवादी चळवळींमध्ये झाली त्यात मनीषाताई सक्रिय होत्या आणि आहेत. मासूमच्या अंतर्गत स्त्रियांना आपल्या शरीराच्याबद्दल संकोच वाटू नये आणि शरीराची ओळख व्हावी म्हणुन १९९४ साली सासवड मध्ये स्त्रीवादी आरोग्य केंद्र स्थापित केले आणि त्यामार्फत ‘सदाफुली’ प्रकल्प सुरू केला. बाईने स्पेक्युलम, आरसा आणि टॉर्च घेऊन स्वत:चा योनीमार्ग, गर्भाशयाचं मुख बघायला शिकणं, मासिकपाळी व अंगावरून लाल-पांढरं पाणी जाण्याबद्दल समजून घेणं, छातीची नियमित तपासणी करणं व केव्हा औषधोपचार करणं आवश्यक असतं या विषयांचे दीड वर्षांचे प्रशिक्षण स्त्रीवादी दृष्टिकोनातून गावातल्या स्त्रियांना देण्यात आलं.
यामागचा उद्देश सरकारने केलेल्या कामाशी स्पर्धा किंवा पुनरावृत्ती करणं हा नसून, योग्यवेळी तपासणी झाली तर भविष्यात दुर्धर आजार किंवा कॅन्सर होऊ नये, कोणतीही स्त्री अकाली मरु नये हा होता. प्राथमिक उपचार (एलोपॅथिक आणि स्थानिक वनौषधींपासूनचे) गावपातळीवर केले जातात. मासूमच्या आरोग्यप्रकल्पामधून स्त्रियांना खाजगी दवाखान्यांमध्ये पाठवले जात नसून हक्काधारी दृष्टिकोनातून सरकारी रुग्णालयात पाठवलं जातं ही जमेची बाब आहे.
मासूमच्या माध्यमातून गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची तपासणी करायला सरकारी ‘आशां’ना आणि नर्सेसना शिकवलं गेलं. अर्थातच, लोकांची देखरेख असेल तर सरकारी आरोग्य सेवा अधिक सक्षम होतात, म्हणूनच मासूमतर्फे गावपातळीवरती ‘‘जागृत समिती’’ निर्माण झालेल्या आहेत, शेकडोंच्या पटीत लोकांच्या जनसुनवाया घडवून आणल्या गेल्या, व राष्ट्रीय मानव अधिकार आयोगापुढे ‘जन स्वास्थ अभियाना’मार्फत प्रश्न मांडण्यात आले आहेत. भारतामध्ये आरोग्याचा मूलभूत हक्क असावा यासाठीही मासूम कार्यरत आहे.
‘मासूम’च्या विविध गटांमधल्या अनेक स्त्रिया ग्रामपंचायतीच्या सभासद झाल्या आहेत. इतकंच नव्हे तर प्रामाणिक आणि माहितगार नेतृत्वाचा एक आदर्शच त्यांनी ग्रामीण भागात उभा केला आहे. होणार्या विरोधाला न जुमानता स्त्रियांच्या हक्कांचं उल्लंघन होण्याविषयीचे अवघड प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत आणि उपेक्षित गटातल्या स्त्रियांना निर्णयप्रक्रियेत आणि शासनप्रक्रियेत सहभागी व्हायला उत्तेजन दिलं आहे.
महाराष्ट्र सरकारच्या २००३ च्या परिपत्रकानुसार गावातली घरे नवरा-बायकोच्या संयुक्त नावांवर असली पाहिजेत, असे होते. ‘बायकोच्या नावावर घर केले तर ती नवऱ्याला घराबाहेर काढून टाकेल,’ अशी भ्रामक कारणे स्थानिक यंत्रणेमधले पुरुष त्या वेळी द्यायला लागले. खूप परिश्रम करून हे परिपत्रक हाती लागल्यावर ग्रामसेवकांच्या बैठकींमध्ये मांडणी केली की, ‘‘शासनाचे हे धोरण तुम्ही पुरंदर तालुक्यात राबविले तर महाराष्ट्रातला पहिला मान तुम्हाला मिळेल.’’ बीडीओंनी उत्साह दाखवल्यावर महाविद्यालयीन मुले, कार्यकर्त्यांचे गट तयार केले आणि त्यांनी गावोगावी फिरून लोकांना माहिती देऊन, ग्रामसेवकांकडून घरांची नोंद दोघांच्या नावावर करून घेतली. अभियानाला ‘घर दोघांचं’ नाव देऊन, स्त्रियांचा मालमत्तेवर हक्क असावा, या हेतूने तालुक्यातली जवळपास पंचाहत्तर टक्के घरे संयुक्त नावाने केली. यानंतर महाराष्ट्रभर बऱ्याच संस्थांनी पितृसत्तेला टक्का देणारी ही मोहीम उचलली.
सध्या ‘शेत दोघांचे’ असं एक अभियान मासूम ने हाती घेतलं आहे बाईचे नाव जमिनीच्या सात बऱ्यावर लावायची मोठी मोहीम पुरंदर तालुक्यात सुरू केली आहे.
समाजामध्ये लोकशाही, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, बुद्धीप्रामाण्यवाद, सदसद्विवेकबुद्धी, प्रेम, आपुलकी, समजूतदारपणा व सहिष्णुता जोपासल्या, सर्वाना सन्मानाने जगण्याचा हक्क जर अबाधित ठेवला तर एक नवे, सुंदर जग आपण आपल्या पुढील पिढय़ांसाठी अजूनही निर्माण करू शकतो अशा आशावाद आणि सकारात्मक विचारांची बांधनी मनीषा ताईंनी आपल्या कार्यातून केली आहे.
डॉ मनीषा ताईंना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी मनपूर्वक शुभेच्छा.

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800