आर विमला
रिवाज मज भेदले किती
वाऱ्या संगे टोचल्या रिती
मान राखला माझाच मी
जीर्ण कात टाकली ती…
मृदू भाषी आणि चेहऱ्यावर प्रसन्न भाव असणाऱ्या आर विमला मॅडम यांनी आपल्या कृतीतून गाठलेली उंची ही महिला व मुली आणि संपूर्ण समाजासाठी निश्चितच एक आदर्श आहे.
माननीय आर विमला मॅडम यांची भेट घेतली असता त्यांच्या बाबत जी गोष्ट प्रथम दर्शनी अनुभवली ती म्हणजे, इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असताना देखील एक व्यक्ती म्हणून आपल्या समोर आलेल्या व्यक्तीला सन्मानाने वागवणं. त्यांचा हा गुण मला अतिशय भावला. जितका वेळ मी त्यांच्या सोबत होते, मॅडम ने मी मनमोकळेपणे त्यांच्याशी बोलू शकेल अशी एक वातावरण निर्मिती केली.
जे झाड गोड, रसाळ फळांनी नटलेलं असतं ते तेवढयाच नम्रतेने झुकलेलं असतं. माणूस जेवढा गुणी असतो जितका मोठा असतो त्याच्या ठायी तितकीच नम्रता असते. ही गोष्ट विमला मॅडम साठी अगदी तंतोतंत खरी आहे.आपल्या विभागात कार्य करणाऱ्या व्यक्ती सोबत कोणत्याही लहान मोठ्या पदाचा भेद न मानून त्यांना समान वागणूक देणं हे केवळ, विचारांनी आणि गुणांनी समृध्द आणि प्रगल्भ असणारी व्यक्तीच करू शकते, त्या म्हणजे विमला मॅडम.
मॅडम ने अतिशय मनमोकळे पणे आपला कार्य प्रवास उलगडला. एक स्त्री म्हणून जगताना एका मोठ्या आणि अतिशय जबाबदारीच्या पदावर कार्य करताना जे अनुभव त्यांना आले ते व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की, सर्वप्रथम म्हणजे स्त्री कडे एक माणूस म्हणून बघणं अत्यंत आवश्यक आहे. स्त्रीला तिच्या कुटुंबातून सहकार्य मिळालं तर तिचा कार्य प्रवास सोपा होऊ शकतो. कुटुंबाने तिची साथ दिली तर तिचा एक संघर्ष कमी होतो आणि तिची सर्व शक्ती विधायक कार्यात लागू शकते, असे विचार विमला मॅडम नी व्यक्त केले.
विमला मॅडम यांना त्यांच्या कुटुंबातून खूप छान पाठबळ मिळाले. आई वडील आणि पती यांचं प्रोत्साहन सातत्याने त्यांना मिळत आलं. त्यामुळे यशाची प्रत्येक पायरी त्या सक्षमतेने चढत गेल्या.त्यांना महाराष्ट्रातील शासनाच्या विविध विभागांमध्ये 30 वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी अनेक अनेक मोठी शिखर गाठली आहेत.
मूळच्या तामिळनाडू येथील आर. विमला यांचा जन्म महाराष्ट्रातील भुसावळ येथील आहे. त्या २००९ सालच्या आयएएस अधिकारी आहेत. बीए, एमएची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणूनही काम केले. कोकणात उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली. जलजीवन मिशन मध्येही त्यांनी काम केले आहे. ‘उमेद’, ‘यशोगाथा’सारखे उपक्रम राबविणाऱ्या आर. विमला यांनी महिला सक्षमीकरणावर काम केले आहे. मंत्रालयात उपसचिव पदाचाही अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. जलजीवन मिशनच्या संचालकपदी असलेल्या आर. विमला नागपूर जिल्हाधिकारी म्हणून सप्टेंबर २०२१मध्ये जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्या होत्या. आपल्या थोड्या कार्यकाळात देखील त्यांनी अनेक समाजोपयोगी आणि प्रामुख्याने महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम हाती घेतले. जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. ब्रेक द बायस या थीमसह त्यांनी महिला मॅरेथॉनचे आयोजन केले, ज्यामध्ये 30,000 पेक्षा जास्त महिला आणि मुलींनी भाग घेतला.
नागपूरचे जिल्हाधिकारी झाल्यानंतर मॅडम आता
महाराष्ट्राच्या महिला व बालविकास आयुक्तपदी कार्यरत आहेत. मनरेगा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, उद्योगांचा विकास आणि फिल्मसिटी यांसारख्या सामाजिक कल्याणकारी योजनांमध्ये तिने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
महिला आणि तरुणांचे सबलीकरण ही त्यांची आवड आणि प्रमुख आहे
महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी 50 लाखांहून अधिक कुटुंबांना जोडून सुमारे पाच लाख बचत गट आणि समुदाय आधारित संस्था तयार केल्या आहेत. प्रबंध गटांनी 18 लाखांहून अधिक कुटुंबांमध्ये शाश्वत उपजीविका निर्माण केली आहे, ज्यामध्ये 14 लाख महिला शेतकरी शाश्वत शेतीचा सराव करत आहेत ज्याची उलाढाल रु. 1100 कोटी रुपये इतकी आहे. भारत सरकारच्या DDUGKY योजनेंतर्गत 50,000 हून अधिक लाभार्थींना त्यांनी कौशल्य प्रदान केले आहे.
जल जीवन मिशनच्या मिशन डायरेक्टर या नात्याने त्यांनी घरकुल दिले चाळीस लाखांहून अधिक घरांना नळ दिले.ग्रामीण भागातील महिलांना जेव्हा पाणी आणायला बाहेर जावं लागत नाही तेंव्हा त्याचं आयुष्य किती सकारात्मक रीतीने बदलून जातं.तिचे कष्ट आणि वेळ वाचतो हे विमला मॅडम यांनी महिलांशी बोलून जाणून घेतलं.
स्त्री मन जाणणाऱ्या आणि स्त्रियांच्या भावना आत्मीयतेने समजून घेताना त्यांना असं जाणवलं की, स्त्रियांनी आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.आणि कुठलाही अपराधी भाव आपल्या मनात ठेऊ नये.स्त्रिया आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांशी एकरूप असतात आणि कधीतरी काही गोष्टी कर्तव्य त्यांच्या कडून पूर्ण होऊ शकले नाही तर त्याची खंत त्या मनाशी बाळगतात, त्याचा भार न घेता स्त्रियांनी सुपर विमन होण्याच्या प्रयत्नात आपलं मानसिक स्वास्थ्य गमावता कामा नये.याची काळजी प्रत्येक स्त्रीने घ्यावी हा मोलाचा संदेश विमला मॅडम ने दिला आहे.
स्त्रीला देवी म्हणून पुजण्या पेक्षा तिच्या कडे एक माणूस म्हणून बघणं आणि ते अधिकार तिला मिळणं हे जास्त महत्त्वाचं आहे आपल्या या विचारावर कृती योजना आखताना विमला मॅडम यांनी नागपूरला जिल्हाधिकारी असताना, ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेवर काम करताना सात बारा वर कुटुंबातील स्त्रीचे नाव असावे यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.
गेली तीस वर्षे प्रतिभासंपन्न विमला मॅडम ने अद्वितीय असं कार्य केलं आहे. त्यांची ही दैदिप्यमान कारकीर्द अनेक अनेक महिला व मुली साठी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.
विमला मॅडम हिंदी कवयित्री, ब्लॉगर असून Tedx स्पीकर आहेत. महाराष्ट्र सरकारच्या प्रतिष्ठित अरुण बोंगीरवार सार्वजनिक सेवा उत्कृष्टता पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. त्या आता पीएच. डी साठी “परित्यक्ता स्त्रियांच्या प्रश्न” असा विषय घेऊन अभ्यास करत आहेत. स्त्री सक्षमीकरण या दिशेने त्यांचं प्रत्येक पाऊल यशस्वी ठरलं आहे. पुढे देखील त्यांच्या योजना सफल होणारच आहेत. त्यासाठी मनापासून शुभेच्छा.

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800