डॉ कमलादेवी आवटे
“शिक्षणाची घेऊन पणती
उजळल्या अज्ञानाच्या राती ”
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन लेक शिकवा, आधुनिक सावित्री घडवा. हा मोलाचा संदेश देणाऱ्या, शैक्षणिक क्षेत्रात आपला अनोखा ठसा उमटविणाऱ्या शिक्षणतज्ञ, अभ्यासक आणि लेखिका-वक्त्या म्हणून सर्वज्ञात आहेत त्या म्हणजे डॉ कमलादेवी आवटे.डॉ कमला देवी या उपसंचालक पदावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांचा शांत, नम्र स्वभाव आणि त्याला स्पष्ट पणे आपले विचार मांडणे याची जोड ही गोष्ट मला खूप भावली.
पर्यावरणशास्त्र या विषयात एम.एस्सी. केल्यानंतर आवटे यांनी पुण्यातून एम.एड. पूर्ण केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्या यशस्वी झाल्यानंतर सोलापूर जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंधांचे लेखन- वाचन त्यांनी केले असून, आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे.
डॉ कमलादेवी यांनी आपल्या विचारांना स्वतःच्या कृतीतून व्यक्त केलं आहे. त्यांनी महिला व मुलींसाठी राबवलेले उपक्रम आणि योजना या कायम यशस्वी ठरल्या आहेत. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम पुनर्रचना मंडळावर त्या सदस्य असून, महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी राबवलेला “सावित्री सखी ज्योत पॅटर्न” राज्यभर लक्षवेधी ठरला आहे.
साहित्यात त्यांची विशेष रुची आहे. लहानपणापासून डायरी लिहिणे, अवांतर वाचन हे संस्कार त्यांना कुटुंबातून मिळाले. या संस्कारचा उत्तम परिणाम म्हणजे, त्यांनी विविध नियतकालिकांसाठी स्तंभलेखन केले तसेच डी एड अभ्यासक्रम आधारित पाठ्य पुस्तकांचे लेखन-सहलेखन त्यांनी केले आहे.
प्राचार्या आवटे अभ्यासपूर्ण व्याख्याने देत असतात. ‘सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण’ हा त्यांच्या आस्थेचा, अभ्यासाचा विषय आहे. “Development of Multimedia Instructional System on Environment Education for B.Ed Pupil Teachers” या विषयावर त्यांनी पीएच.डी. मिळवली आहे.
डॉ कमलादेवी यांनी अगदी अकराव्या वर्गा पासून शिक्षणासाठी घराबाहेर पाऊल टाकलं. आई वडील शिक्षक असल्यामुळे सुसंस्कृत आणि समृद्ध वातावरणात “बालपणातच शिक्षण” या संकल्पनेचा व्यापक अर्थ त्यांनी जाणला. आपल्या जडणघडणीत आई वडिलांइतकेच महत्वाचे स्थान त्या मोठे भाऊ डॉ प्रदीप आवटे यांना देतात. तसेच पत्रकारिता क्षेत्रातील यशस्वी धाकटे बंधू संजय आवटे यांचे प्रोत्साहन कमलादेवी यांच्यासाठी महत्वाचे ठरले आहे. लग्नानंतर पती डॉ प्रभाकर क्षीरसागर यांची खंबीर साथही कमलादेवी यांच्यासाठी खूप मोलाची ठरली. शासकीय सेवेत व्यस्त असताना कुटुंबातील सर्वांनी विशेषतः मुलगा, अमर्त्य याने समजून घेऊन दिलेली साथ त्यांना खूप महत्वाची वाटते.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची बैठक त्यांना
शासकीय सेवेत नवनवीन उपक्रमांशी जोडत गेली. मुलींना शिक्षणाची संधी अधिक प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी त्या कायमस्वरूपी प्रयत्नशील होत्याच.
“तू जिंदा हैं तो जिंदगी की जित पर यकिन कर अगर कही हैं स्वर्ग तो उतार ला जमीन पर” अश्या विश्वासाने स्त्रियांनी पुढे यायला हवं आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचं महत्त्वाचं स्थान त्यांनी निर्माण करायला हवं, आणि एक स्त्री म्हणून कोणत्याही यंत्रणेत कार्य करत असताना काही वेगळे अनुभव येणारच तरी त्याचं योग्य उत्तर शोधत आपला मार्ग आपण निश्चित करत जावा, निर्णय प्रक्रियेत स्त्रीने सामील होणं अत्यंत आवश्यक आहे, मग ते कुटुंब असो वा तिचे कार्यक्षेत्र असो असे विचार डॉ कमलादेवी यांनी व्यक्त करतात.
ज्या मुली शासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी जरूर शासकीय सेवेत यावं आणि मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून महिला व मुलींसाठी उत्कृष्ठ कार्य करावं, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी काम होणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून महिलांनी जास्तीत जास्त संख्येने अधिकारी पदावर असणं महत्त्वाचं आहे, निर्णय प्रक्रियेत येऊन महिलांनी महिलांसाठी उत्तम कार्य करावं ही काळाची गरज आहे असे त्यांना मनापासून वाटते.
डॉ कमलादेवी यांना महिला गौरव पुरस्कार आणि सर पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी अनेक योजनांची आखणी त्यांनी केली आहे. त्या योजना निश्चितच यशस्वी होतील आणि त्याचा लाभ अनेक बालिकांना होईल यात काही शंकाच नाही. त्यांच्या कार्याला मनापासून नमन आणि शुभेच्छा.

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Respcted mam hat’s off we are proud of you !..🙏👏
Resp.Awate Madam hat’s off and we are proud off you.🙏👏
सुंदर मांडणी