नवरंग (वृत्त~अनलज्वाला.)
नवरात्रींचा उत्सव चाले नवरंगांचा
दुर्गा काली जगदंबेच्या पराक्रमाचा
राखाडी तो रंग दावितो जयविजयाचा
विनाश केला देवीमाने असुरगणांचा
रंग केशरी तेजोमय तो ज्ञान दर्शवी
नाश करोनी घनतिमिराचा प्रकाश दावी
शुभ्रावस्त्रा शैलसुता तू अवताराने
सदा लाभते शांती तृप्ती तुझ्या कृपेने
मळवट भरला कुंकूमाचा भाळावरती
रक्त वर्णात कोपायमान भासविताती
नील रंग तव प्रतीक आहे ह्या ऊर्जेचे
वधुनी असुरा रक्षण केले तू देवांचे
उत्साहाने जागर चाले तव नामाचा
पीत अंबरे लेउनी मंत्र जयघोषाचा
हरित कांकणे शालू हिरवा नथ पाचूची
सजली देवी शाकंभरीच समृद्धीची
नवरात्रीचा रंग जांभळा विश्वासाचा
तेज मुखावर विलसत आहे जगजननीच्या
गुलाबमाला कंठी शोभे अंबाबाई
प्रेम बरसते भक्तांवरती अमुची आई
चला चला हो सारे आपण रंगी न्हाऊ
नवरात्रीच्या नवरंगांची गाणी गाऊ

– रचना : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800