आई भवानी तुझ्या कृपेने तारिसी भक्ताला
अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला
आई कृपाकरी,आम्हांवरी, गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई
सत्तेची वाढते लालसा,पैसा झाला मोठा
जनतेचा तो खिसा रिकामा, सच्चा झाला खोटा
दांभिकांना धडा शिकविण्या आसूड फिरवित ये // आई कृपा.
भूमिपुत्र राहती उपाशी, दलाल खाती तुपाशी
फुका मारिती गमजा आणिक नेते भरल्या पोटी
नृसिंह होऊनि हाकेस आमुच्या सत्वर धावून ये // आई कृपा..
कोरोनाचा आला फेरा हादरूनि गेली जनता
डेंग्यू,पटकी, मलेरियाने संगत त्याची करीता
हतबल आम्ही तुला प्रार्थितो औषध होऊन ये //आई कृपा….
वादळवारे, अकाली पाऊस शेते ती रुसली
शेतक-यांच्या अपमृत्युंची काळोखी दाटली
चिंता,काळजी,व्यथा वाढती विघ्न हराया ये // आई कृपा…..
हातात पदवी उच्चशिक्षित नोकरी नाही त्यासी
मेजाखालून हात करी जो ओले बढती त्यासी
तोडण्यास त्या पापी हाता खड्ग घेऊनि ये // आई कृपा……
मराठमोळ्या महाराष्ट्राचा शिवशाही हा कणा
परी आज विसरले पुढारी शिवप्रभूंचा बाणा
उज्वल भवितव्यासाठी गे तेजे उजळीत ये // आई कृपा….
नक्षलवादी, आतंकवादी दुष्ट शक्ती माजल्या
शेजा-यांच्या घुसखोरीने सीमाही भंगल्या
चारीमुंड्या चीत कराया शस्त्रे परजित ये
महिषासूरमर्दिनी, कालिका पुनःश्र्च अवतरू दे // आई कृपा.
– उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे…

– रचना : स्वाती दामले
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूपच मस्त🙏🙏🙏
खूप सुंदर आणि सद्य परिस्थितीला अनुकूल जोशपूर्ण कविता
🌹खूपच छान 🌹
🌹जय भवानी 🌹