Wednesday, July 2, 2025
Homeसंस्कृतीनवरात्रोत्सवाचं औचित्य

नवरात्रोत्सवाचं औचित्य

अंबे – जगदंबे माते भवानी
आश्विन महिन्याची प्रतिपदा म्हणजेच शारदीय किंवा दुर्गादेवीच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात. गणेश चतुर्थी झाल्यानंतर पितृ पंधरवडा लागतो. आपल्या पितरांना जेऊ घालण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. ती प्रत्येकाची श्रद्धा आहे. त्यानुसार एकदा आपापल्या पितरांना अन्नदान दिल्यानंतर घराची स्वच्छता केली जाते. यामागेही एक सामाजिक स्वच्छतेचे परिमाण असावे.

पावसाळ्याची सांगता झालेली असते. पावसाला तेवढा जोर उरलेला नसतो. त्यामुळे पावसाळ्यात घराची पडझड होऊन घरात सर्वत्र केरकचरा साठलेला असतो. त्यामुळे घराची स्वच्छता करून रंगरंगोटी केली जाते. दुर्गादेवीच्या स्वागताची तयारी केली जाते. याचा अर्थ आपल्या संस्कृतीत स्वच्छता आणि पावित्र्य यांना अधिक महत्त्व दिले आहे.

दुर्गादेवी म्हणजे शक्ती. संसारावर आलेली संकटे निवारणासाठी पृथ्वीतलावरील सर्व प्राणिमात्र त्रिदेवांना शरण जातात. कोणी भगवान विष्णूंना तर कोणी ब्रह्मदेवांना आणि सर्वशेवटी शिवशंकराला शरण जातात. सर्व देव पृथ्वीतलावरील प्राणिमात्रांना अभय देतात. त्यांच्या संकटांना दूर करतात. त्यासाठी असुरांशी युद्ध करतात. त्यांचा विनाश करतात, अशी परंपरा आपल्याला सांगितली जाते.

अशक्त आणि दुर्बळांना देव साहाय्य करतात. परंतु त्यासाठी त्यांची परीक्षा घेतात, असेही सांगितले जाते. तेवढी सहनशीलता माणसांत नसते. त्यासाठी ते सतत धावा करीत असतात. त्यांच्या प्रार्थनेला सफलता येते.
जेव्हा त्रिदेवदेखील हतबल होतात, तेव्हा ते आदिशक्तीचे आवाहन करतात. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अंबा भवानी प्रकट होते. भवानी म्हणजे भव हानी. हा भवदुस्तर तारून नेणारी देवता म्हणजे भवानी. तुळजाभवानी असो की, महालक्ष्मी असो. वणीची सप्तशृंगी असो अथवा रेणुकामाता असो. आपण महिलांना अबला समजतो. त्यांना तुच्छ लेखतो. परंतु जगावर जेव्हा जेव्हा संकटे आली आणि देव देखील हतबल होतात तेव्हा ते अंबेला शरण जातात.

आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनी हो ।। या नवरात्रीच्या आरतीमध्ये देखील हेच सांगितले आहे. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या नवदुर्गेचे पूजन करतात प्रार्थना करतात. स्त्री ही प्राचीन काळीदेखील सबला आणि सक्षमच होती याचे उदाहरण म्हणजे नवरात्रीची आरती. या आरतीमध्ये देवीच्या अनेक रूपांचे वर्णन केलेले आहे.
देव त्यांचे उपदेव आणि सहदेव असतात तशीच देवीच्या चौसष्ठ योगिनी आहेत. कालिका, चंडिका आदि उपदेवता आहेत. परशुरामाची जननी असलेली रेणुका माता भाळावर मळवट भरून दुर्गादेवीची आराधना करते. दुर्गेची आरती चौसष्ठ योगिनी करतात.

नवरात्रात महिषासुर मर्दिनी हा अवतार दुर्गेने धारण केला आहे. प्रसंगी महिलादेखील दुर्गेचा अवतार धारण करतात. महिषासुर म्हणजे उन्मत्त झालेला पुरुषच. रेडा जसा अनेकवेळा अनावर होतो तेव्हा तो सर्वांवर चाल करून जातो. स्त्रियांवर अत्याचार करतो. त्यांचे लैगिक, शारीरिक व मानसिक शोषण करतो तेव्हा स्त्रीला महिषासुरमर्दिनीचा अवतारच धारण करावा लागतो. शस्त्रंदेखील हाती घ्यावी लागतात. तिच्या मदतीला स्त्री देवताच धावून जातात. रक्तबीज राक्षसाचे रक्त पिण्यासाठी चंडिका आणि काली मातेला अवतार घ्यावा लागतो. सतत छळ करणाऱ्या कोणत्याही पुरुषाला आवर घालण्यासाठीच स्त्री देवता अवतार घेतात. रणांगणावर युद्ध करतात.

नवरात्रीच्या आरतीत या सर्व देवतांचे दर्शन होते.
अष्टभुजेच्या रूपात ती प्रकट होते.
दुर्गेदुर्घट भारी तुजवीण संसारी
अनाथनाथे अंबे करुणाविस्तारी
वारी वारी जन्म मरणाते वारी
हारी पडलो आता संकट निवारी
अशी प्रार्थना करून देवीला प्रसन्न करून घ्यावे लागते. तेव्हा ती प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करते. अशी ही संकट निवारक अंबामाता. तिचे स्मरण करण्यासाठी हा नवरात्रोत्सव

प्रकाश क्षीरसागर

– लेखन : प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, गोवा
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४