Friday, October 18, 2024
Homeलेखनवरात्रोत्सव : भान हवेच

नवरात्रोत्सव : भान हवेच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळ जवळ दीड वर्षांनी यंदा नवरात्रोत्सवाला शासनाने परवानगी दिली. पहिल्याच दिवशी (७ ऑक्टोबर) राज्यातील सर्व मंदिरांची दारे भाविकांना उघडी होणार असल्याने यावेळी भाविकात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

या उत्साहाबरोबरच कोरोनाचे नियम पाळून हा उत्सव साजरा करताना नियमांचा भंग न करण्याची, सुरक्षित अंतर ठेवून भक्तिपूर्वक दर्शन घेण्याची सर्वांवरच जबाबदारी आहे. हे भान सर्वांनी राखलेच पाहिजे.

ठाणे जिल्ह्यात कल्याणात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या दुर्गाडीवरील दुर्गादेवी मंदिर, भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरीमाता, विरार जवळील महालक्ष्मी मंदिर, मुंब्रा येथील मुंब्रादेवी अशा ठिकाणी नेहमी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.

कल्याणातील पूर्वेतील तिसाई मंदिरात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात. यंदा जवळ जवळ दीड दोन वर्षांनी हे सर्व भक्त एकत्र येणार आहेत.

कोरोना पासून संरक्षण मिळावे म्हणून या ठिकाणी गाभाऱ्यात जाण्यास तसेच मंदिरात एकाचवेळी पाचच लोकांनी जावे. भाविकांच्या सुरक्षिततेची मंदिर व्यवस्थापकांची जबाबदारी आहे. हे जरी मान्य केले तरी भाविकांनीही आरोग्याचे सर्व नियम पाळण्याची सर्वात मोठी जबाबदारी आहे हे दुर्लक्षून चालणार नाही.

कल्याणात टिळक चौकातील महालक्ष्मी मंदिरात अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. त्याला खुप मोठी गर्दी जमते. त्यावेळी अनेक भाविक महिलांच्या म्हणे देवी अंगात संचार करते. त्या घुमू लागतात. वास्तवात देवी वगेरे काही अंगात येत नसते. ते अंधश्रद्धेचे लक्षण आहे. तो एक मानसिक आजार आहे. मानसिक कमकुवतपणातून हा आजार होतो हे सिद्ध झाले आहे. असे वैदकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कल्याणातील या संबंधात एक बोलके उदाहरण आहे. एका महिलेच्या अंगात येत असे. ती घुमत असताना जे बोलते ते खरे होते अशी भाविकांची श्रद्धा होती. त्यामुळे तिला भाविकांकडून प्रश्न विचारले जात. एकदा असेच तिच्या अंगात आले असताना तिच्या पतीने सर्वांच्या देखतच तिला अपमानकारक बोलून पुन्हा जर तुझ्या अंगात आले तर घरात घेणार नाही असा दम भरला. काय आश्चर्य त्या बाईच्या पुन्हा कधीच अंगात आले नाही !

नवरात्रात सवाष्णीला (जिचा पती जिवंत आहे) जेवायला बोलावतात. लहान मूलीनाही कुमारिका म्हणून जेवायला बोलावून वस्तू भेट देतात. यावेळी केवळ आपल्या जाती-समाजातीलच महिलेला किंवा मुलीला न बोलावता श्रमजीवी, आर्थिकदृष्ट्या गरीब महिलेला जर बोलावले तर त्या नेहमी अर्धपोटी राहणाऱ्या महिलेला पोटभर जेवण दिल्याचे समाधान मिळेल.

सर्वात महत्वाचे म्हणजे देवीची ओटी भरताना जे हिरवेखण वापरले जातात ते बहुतेक वेळा इतके हलक्या कापडाचे असतात की त्याचा पोतेरे म्हणूनही कुणी उपयोग करू शकत नाही. अशावेळी हे खण चांगल्या दर्जाच्या कापडाचे व पातळही चांगले भारीपैकी घेतले तर (ते हिरवेच असले पाहिजे असे नाही) त्याचा काठ हिरवा असला तरी चालेल. ते गरीब महिलांना उपयोगी पडू शकेल. मंदिराच्या व्यवस्थापकांनी, पुजार्यांनी यासाठी जागृती करण्याची आवश्यकता आहे.

नवरात्राच्या काळात जर निवडणुका दृष्टीक्षेपात असतील तर अनेक इच्छुक उमेदवार, गरबा, टिपरी नृत्याचे आयोजन करतात. त्यात काही ठिकाणी देवीची प्रतिस्थापना करून त्याभोवती फेर धरून नाचतातही. यात भाविकतेपेक्षा अनेकांकडून शक्तीप्रदर्शन अधिक असते. कार्यक्रमाची जाहिरातबाजीही केली जाते. काही ठिकाणी तर मोठमोठे कलाकार निमंत्रित करून मोठी गर्दी जमवली जाते. हे सर्व टाळून कार्यक्रमात भाविकता आणण्याची अधिक गरज वाटते.

पूर्वी गणेशोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे. तसे नवरात्रोत्सवातही करता येईल.

महापालिका, पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी यांना बोलावुन शहरातील प्रश्न, कायदा सुव्यवस्था, आरोग्य, रस्ते यांची मुलाखतीच्या कार्यक्रमातून माहिती घेता येईल.

सध्या कोरोनाच्या नियमांचे बंधन असले तरी ते काही कायम रहाणारे नाही. काही भाविक आपल्या कुलस्वामिनी देवीला पुजार्याच्या नावे पैसे पाठवून धार्मिक विधी करून घेतात, त्यांच्या श्रद्धा लक्षात घेता हे त्यांनी करू नये असे म्हणता येणार नाही. पण त्या रकमेतला काही भाग त्यांनी गरीब विद्यार्थी किवा कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्यांना दिला तर त्यात खरे कार्य केल्याचे देवी उपासनेचे समाधान मिळेल.

यावेळी नवरात्रोत्सव साजरा करायला परवानगी मिळाल्याने आता फुल, नारळ, पूजा साहित्य विक्रेते यांना, त्यांचा बंद व्यवसाय सुरु करण्यास निश्चितच सहाय्य होईल. या प्रमाणे कोरोनाचा नुसता बाऊ न करता आरोग्याचे भान ठेऊन जर नवरात्रोत्सव साजरा केला तर तो अधिक चांगल्या प्रकारे साजरा केल्याचे समाधान सर्वांनाच मिळू शकेल.

– लेखन : विनायक बेटावदकर, जेष्ठ पत्रकार
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. *मित्रांनो, नवरात्रोत्सव असो वा कोणतेही उत्सव असो आजच्या कोरोनाच्या काळात आपण सर्व प्रकारची दक्षता व काळजी घेऊन हे सन साजरे केल्यास कोणतीही आपत्ती येणार नाही आणि सर्वांना आनंद घेता येईल हीच आमची मनोकामना आहे. त्यासाठी विनायक बेटावदकर यांनी सदर लेखात व्यक्त केलेल्या भावना व देवेंद्र भुजबळ साहेब यांनी केलेले लेखन व संपादन अतिशय समर्पकपणे सांडलेले विचार योग्य आहेत.

    आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

    राजाराम जाधव,
    सहसचिव सेवानिवृत्त
    महाराष्ट्र शासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन