आला आला नवरात्रौत्सव
गुढी सौख्याची उभारा रे
मंगल भावना मंगल विचार
मनी सर्वांच्याच आणा रे !!धॄवपद!!
पहिला मान जन्मभूमिला
जिथे अस्तित्वी जीव आला
भरण पोषण तिनेच केले
बिजाचा तू महावॄक्ष झाला
वंदन करतो मातॄभूमिला
तिच्यासाठी प्राण अर्पा रे !!१!!
दुसरा मान मातेला माझ्या
जिच्या कुशीतून मी आलो
तिच्या प्रेमाने तिच्या मायेने
खरोखरच खूप धन्य झालो
तिची करा जन्मभर सेवा
मिळेल संपन्नतेचा मेवा रे !!२!!
तिसरे वंदन करतो माझ्या
प्राण प्रिय आजीला रे
धरी सावली मायेची ती
करी सदैव ती कौतुक रे
तिच्या चरणी ठेवूनी माथा
वर्णू तिची गुण गाथा रे !!३!!
चौथे वंदन प्रिय बहिणीला
जिच्यामुळे आली सार्थकता
माया, ममता, प्रेम, काळजी
एकरूप झाली मानवता
बांधून घेऊ राखी मनगटी
रक्षण तिचे करण्या रे !!४!!
पाचवे वंदन आत्याला माझ्या
जिला माझा आहे अभिमान
तिच दुवा दोन्हीही घरची
आम्ही ठेवू तिचा खूप मान
स्वप्न पाहिले जिने उराशी
म्हने हो आकाशाएवढा मोठा रे !!५!!
सहावे वंदन करू मावशीला
आईचीच ती आहे प्रतिरूप
आई आहे गोड पुरणपोळी
ती तिच्यावरील साजूक तूप
अडीअडचणीला आपण घेतो
तिच्याकडेच धावा रे !!६!!
सातवा प्रणाम मुलीला माझ्या
जी जीवनबागेतील सुगंधी कूप
विशाल महासागर ती प्रीतीचा
ईश्वरानंतरचे दुसरे अस्सल रूप
जिच्यामुळे आला अर्थ जिवनी
ती माझा अनमोल हिरा रे !!७!!
आठवे वंदन जिजामातेला
जिने पेटविले स्फुल्लिंग
दिला स्वाभिमान दिली प्रेरणा
आत्मभानाची दिली झिंग
लोकांच्या कल्याणासाठी
दिला पोटचा गोळा रे !!८!!
नववे वंदन क्रांतीज्योतीला
दिला शिक्षणाचा अधिकार
सोसले दगड माती धोंडे
केला समाजात चमत्कार
तिचे ऋण फेडाया आपण
चालवू तिचा वसा रे !!९!!
दसऱ्याचा तो दिवस दहावा
ती जीवनसंगिनीची आठवण
असते सोबतीण जन्मभराची
तीच सुख दु:खाची साठवण
सोन्यासारख्या सखीला त्या
प्राणापलीकडे जपा रे !!१०!!
– रचना : प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे