नमस्कार मंडळी.
आज पासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे. त्यानिमित्ताने काही रचना वाचू या. आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा — संपादक
१. अभ्यर्थना ..
नव रात्र महोत्सवांत
उंचळू येई सद्भावना
शुचिर्भूत तन न् मना
जमे भक्त अभ्यर्थना
खेळे दांडिया गरभा
मुक्त निर्मळ कामना
नारीपुरुष भाव गळे
पावित्र्य स्पर्शे सुमना
रोज नवीन देवी रुपे
सांगे लोभस लोचना
अर्थ कळो रुपा मागे
कथा ऐका विवेचना
रात्रीजागर सुखदाई
आब वेगळासंमेलना
अंतर्बाह्य शुध्द होती
उपवास करी ललना
लक्ष्मीकृपा समानता
सामीलकरावे निर्धना
भरभरू आशीष देई
पूर्ण समर्पित साधना
भावयुक्तफक्तअर्चना
यथा शक्ती संसाधना
माता धावे आर्त हाके
सुसज्ज असूर मर्दना
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
२. नवरात्र
आला उत्सव मोठा
नऊ दिवस नवरात्र
चला साजरा करुया
करु जागर नऊ रात्र
शारदीय नवरात्रीला
देवी उपासना भक्तीभाव
कर नाश असूर शक्तीचा
विणवू भक्ताला पाव
अस्त्र शस्त्र भुजा धारी
नऊ माळा नऊ मंत्र
आबालवृद्ध रक्षणास
घे तू हाती सारे सुत्र
करूया घटस्थापना
आई देवीचे पूजन
भक्ती भावे आनंदाने
गाऊ आरत्या भजन
वस्त्र नेसवू नवरंगी
करू श्रृंगार सोळा
रास गरबा खेळूनी
आनंदे उत्सव सोहळा
— रचना : चंद्रशेखर कासार. धुळे.
३. आरती
“जय तुळजामाई” (वृत्त-परिलीना ६+६+६+४)
जय देवी जय देवी जय तुळजामाई
भवदुस्तर वाराया अवतरली आई ||ध्रु||
वरदाने मत्तांधे त्रैलोक्ये जितता
त्राहि त्राहि देवांना महिषासुर करता
हरिहर अन् वेधाला पडलीसे भ्रांता
म्हणून तुजला देवी उपजविले चित्ता
जय देवी जय देवी जय तुळजा माई
भवदुस्तर वाराया अवतरली आई ||१||
सिंहावर बैसोनी येशी युद्धाला
अष्टाभुज स्वरुपा तू दावी जगताला
चाप बाण त्रिशूळ करि घेऊनिया भाला
दैत्यांना काळ जणू वाटतसे आला
जय देवी जय देवी जय तुळजा माई
भवदुस्तर वाराया अवतरली आई ||२||
नऊ दिनी नऊ रात्र याम अष्ट लढसी
चिक्षुर चामर बाष्कल सेनापती वधसी
हुंकारे चीत्कारे रणसंगर करिसी
महिषासुर मर्दुनिया देवां तोषविसी
जय देवी जय देवी जय तुळजा माई
भवदुस्तर वाराया अवतरली आई ||३||
दौर्बल्या हारोनी शक्ती दे माते
प्रपंचादि आसक्ती सोडवी देहाते
मुमुक्षु माझी वाचा रत हो स्तवनाते
हेमंतासी तुझिया रिघवी चरणाते
जय देवी जय देवी जय तुळजा माई
भवदुस्तर वाराया अवतरली आई ||४||
— रचना : हेमंत कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800