कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा सर्वांनाच बसला. त्यात पुन्हा लॉकडाऊन लागल्याने नागरिकांचे हाल झाले. मात्र या संकटातही नवी मुंबईतील नेरुळमधील तरुणांच्या क्रिएटिव्ह फाउंडेशन कृतिशील समाजसेवा करीत आहेत.
स्वतः विद्यार्थी व नोकरदार असलेल्या या तरुणांनी स्वतःच्या पैशातून जवळपास दोन महिने स्वतः अन्न शिजवून नेरुळमधील गरिबांना वाटप केले आहे.
नेरुळमधील तरुणांनी समाजसेवेच्या हेतूने ही संघटना सुरू केली आहे. संघटनेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. लॉकडाऊनमध्ये गरीबांबाबत संवेदनशीलता दाखवत संघटनेने अन्नदानाचे कार्य करण्याचे ठरवले. त्यानुसार तरुणांनी इतरांकडून कोणताही आर्थिक आधार न घेता स्वतः पैसे उभे केले. जेवण बनवण्यासाठी सेक्टर १२ येथील गावदेवी मंदिराची जागा घेण्यात आली.
गावदेवी मंदिर ट्रस्टने या तरुणांचा समाजाप्रती असलेला उदात्त हेतू पाहत आपली जागा जेवण बनवण्यासाठी दिली.
त्यानुसार तरुणांनी दररोज अन्न शिवण्यास सुरुवात केली. सकाळी मार्केटमधून ताजी भाजी आणायची व ती निवडायची असा दिनक्रम सुरू झाला. हे तरुण आपली नोकरी, शिक्षण व व्यवसाय सांभाळून दररोज आळीपाळीने अन्न शिजवायचे.
नेरुळ जिमखान्यासमोरील झोपडपट्टीत व गावदेवी मंदिरासमोरील झोपडपट्टी तसेच आमराईनगर सेक्टर ९ येथील गरीब नागरिकांना दररोज कंटेनरमध्ये अन्न भरून ते वाटले जायचे. दररोज २०० कंटेनर किंवा त्यापेक्षा जास्त अन्न वाटप केले जात होते. मे ते जून महिना अशी एकूण ५५ दिवस सलग ही मोहीम सुरू ठेवण्यात आली. या मोहिमेत तब्बल ७ हजार ४०० लोकांना अन्नवाटप करण्यात आले.
सुरुवातीचे काही दिवस कमी प्रमाणात अन्न शिजवण्यात येत होते. मात्र गरिबांचा वाढता प्रतिसाद पाहता जास्त कंटेनर शिजवण्यास सुरुवात करण्यात आली. या तरुणांकडून न चुकता व थकता अथक परिश्रम घेत हे अन्न वाटप करण्यात आले. मुख्य म्हणजे या तरुणांची संवेदनशीलता पाहत अनेक लोकप्रतिनिशी, उद्योजक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या तरुणांना विविध रुपात मदत करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या तरुणांना हुरूप येऊन दररोज नव्या जोमाने हे तरुण अन्न शिजवून त्याचे वाटप करत होते.
नुसते अन्न वाटप करून हे तरुण थांबले नाहीत. तर या झोपडपट्टीतील नागरिकांशी दररोज हे तरुण आपुलकीचा संवाद साधत होते. या नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यांच्या व्यथा शासनापर्यंय पोहीचवण्याचा निर्णय या तरुणांनी घेतला आहे. तर कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करत त्याबाबत सुरक्षिततेचे कोणते नियम पाळणे गरजेचे आहेत ? मास्क वापरणे हात वारंवार धुणे, सुरक्षित अंतर राखणे हे नियम दररोज अन्न वाटप करताना या नागरिकांना सांगितले जात होते.
समाजसेवेचे अनेक उपक्रम संघटनेमार्फत उपक्रम राबवले जातात. तरुणांच्या या क्रिएटिव्ह समाजसेवेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
– टीम एनएसटी 9869484800.