Thursday, June 19, 2025
Homeसाहित्यनवी मुंबई :"प्रभात"मय स्नेह मिलन...

नवी मुंबई :”प्रभात”मय स्नेह मिलन…

नवी मुंबई परिसरातील नाका कामगारांच्या कल्याणासाठी, विशेषत: त्यांच्या डोळ्यांची मोफत तपासणी, मोफत चष्मे पुरविणे, वेळ प्रसंगी शस्त्रक्रिया करणे या साठी, ‘प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट’ ही सेवाभावी संस्था कार्यरत आहे. डोळ्यांची जागीच तपासणी करता यावी यासाठी संस्थेने फिरते नेत्रालय विकसित केले आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख डॉ प्रशांत थोरात यांनी नुकतीच न्यूजस्टोरीटुडे परिवाराच्या नवी मुंबई येथील स्नेह मिलन कार्यक्रमात दिली.

डॉ थोरात यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, आपल्या वाढदिवसाच्या किंवा अन्य प्रसंगाच्या निमित्ताने आपण जर “प्रभात” ला ५००/- रुपयांची देणगी दिली तर एका गरजू रोजंदारी कामगाराला चश्मा मिळू शकतो व तो त्याचे काम नीट करू शकतो.
अन्यथा नीट दिसत नाही, त्यामुळे डोळे तपासून घ्यावे, एव्हढीही जागृती या कामगारांमध्ये नसल्याने कुशल असलेले हे कामगार अकुशल काम करून आर्थिक खाईत लोटले जातात.

डॉ थोरात यांनी उपस्थितांना हे फिरते नेत्रालय कसे कार्य करते, हे प्रत्यक्ष दाखविले. या सर्व बाबींनी प्रभावित होऊन उपस्थितांनी “प्रभात“ला सर्वतोपरी मदत करण्याचा निश्चय केला.
प्रत्यक्ष फिरते नेत्रालय पहायला मिळणे, हे या स्नेह मिलन कार्यक्रमाचे वैशिष्ट्यच ठरले. असो…

या स्नेह मिलन कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या मंडळी च्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

१. अविस्मरणीय स्नेहमिलन
रात्री, सुमारे आठच्या दरम्यान माझा मोबाईल वाजला. मोबाईल उचलला नि समोरून आवाज आला. ‘उद्या संध्याकाळी चार वाजता यायचं आहे ! लक्षात आहे ना वर्षा ! ‘चटकन मला, दोन दिवसापूर्वीच अलकाच्या घरी, आमच्यात झालेला संवाद, मला आठवला. लगेच, ‘हो. हो. येते मी !’ असे म्हणाले. खरं तर माझ्या डोक्यातून ही गोष्ट निघून गेली होती. पण अलकाने मात्र न विसरता, चक्क मला फोन करून, माझ्या लक्षात आणून दिली होती. तिचा प्रत्येक दिवस प्रचंड व्यस्त असतो, तरीही आमच्या सारख्या नवोदित लेखकांनी, आवर्जून हया स्नेहमिलनात उपस्थित असावे, तिच्यात असलेली, माझ्या व सर्वांच्या विषयी असणारी तळमळ मला जाणवली. धन्यवाद अलका !

“न्यूज स्टोरी टुडेचे” संपादक मा.श्री.देवेंद्र भुजबळ उभयतांनी, नवी मुंबईतील लेखक व कवी यांच्यासाठी, भुजबळ सरांच्या घरी, दिनांक २८/०५/२०२२ रोजी स्नेह मिलनाचा बेत आखला होता. पोर्टलवर लेखन व काव्य रचनाकार, यांची एकमेकांशी प्रत्यक्ष भेट घडून यावी, त्यांच्यातील विचारांची देवाण – घेवाण व्हावी, असा सुप्त विचार मनी ठेवत, हया समाजसेवक उभयतांनी आखलेला हा स्नेहमिलनाचा बेत ! असा प्रेमळ ओलावा, फार कमी लोकांमध्ये आढळतो. तलावाचे पात्र तुडुंब भरून, जसे प्रेमळपणाने पाण्याने सतत वाहत राहावे. अशी हया उभयतांची समाज कार्य पद्धती आहे.

अलकाची हया दोन दिवसात तब्येतही बरी नव्हती. तरीही तिने आजाराचा विचार न करता, “नवी मुंबई स्नेह मिलन” घडवून आणले. माझ्यासाठी हे स्नेहमिलन फारच नवखे होते. त्यामुळे तिने मला त्याबद्दलची, अगोदरच बरीच माहिती करून दिली होती.

भुजबळ सरांच्या इमारतीतील लिफ्टमध्ये शिरताच, एक दांपत्य मला भेटले. अगदी साधे जोडपे होते. शब्दातील उच्चार सतत ऐकत राहावे, असे शुद्ध आणि स्पष्ट होते. त्यांनी मला विचारले, ‘तुम्ही भुजबळांकडे जात आहात का ! मी, हो म्हटले.’ त्यांच्या बोलण्यावरुन हे जोडपे दिग्गज लेखक असावेत. आणि ते खरे ठरले.

दरवाजात पोहोचताच श्री. भुजबळ सरांनी केलेले आदरातिथ्य, स्वागत ! मला मात्र ओशाळल्यासारखे झाले. कारण मी एक लेखन करणारी नवखी व्यक्ती आहे. अष्टपैलू पत्रकार, अनेक पुरस्कारांनी सन्मानित असे व्यक्तिमत्व, अश्या असामान्य व्यक्तीकडून असे स्वागत ! सर, तुमच्या नम्र स्वभावास माझे नम्र अभिवादन ! सारे आसनस्थ झाल्यावर अलकाने, आपलेपणाने केलेले खानपान स्वागत ! अप्रतिम ! शब्दांपलिकडील !!!!!

अनेक देशात वाचनीय असणारे श्री.व सौ. भुजबळ उभयतांचे पोर्टल ! त्याचे हे संपादक ! असे हे दांपत्य दारात येणाऱ्यांचे आदरातिथ्य प्रेमाने व आपुलकीने स्वतः करतात, त्यांच्या या प्रेमळपणाला माझा मानाचा मुजरा ! भुजबळ सरांनी सर्वांची ओळख करून देण्यास सुरुवात केली. मी आज अश्या महान व्यक्तींच्या पंक्तीत बसले होते. ही सर्व मंडळी, ज्ञानव्यापी महान व्यक्ती होत्या.

श्री. शांतीलाल ननावरे एक उत्कृष्ट कवी ! त्यांनी आपली कविता वाचून दाखवली. त्यांनी आपल्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांची माहिती दिली.

श्री. प्रताप महाडिक, महाविद्यालयाचे प्राचार्य ! त्यांनी त्यांच्या ग्रंथपाल ते प्राचार्य या वाटचालीचा मागोवा सहजपणे सांगून त्यांना मदत, मार्गदर्शन केलेल्या व्यक्तींचे ऋण व्यक्त केले.

प्रा गजानन शेपाळ हे उत्तम चित्रकार व रंग चिकित्सक आहेत. रंग आणि नक्षत्र यांचा एकमेकांशी संबंध येऊन, प्रत्येकाच्या करियरसाठी होणारे फायदे त्यांनी पटवून दिले. त्यांनी आखलेला प्रकल्प कशाप्रकारे असेल, याची माहिती मिळाली. त्यांच्या हया पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !

श्री.सिद्धेश प्रधान पत्रकार आहेत. चेहऱ्यावर हास्य पण काहीतरी शोध घेण्याच्या भावना त्यांच्यामध्ये दिसल्या. त्यांनी पत्रकारिता करताना आलेले अनुभव कथन केले. पत्रकाराचे आयुष्य म्हणजे तारेवरची चाल, हे मला जाणवले.

प्रा डॉ अजित मगदूम सर साहित्य अभ्यासक आहेत तर त्यांच्या पत्नी प्रा सौ. वृषाली मगदूम सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी त्यांचे ‘स्वल्प’ हे पुस्तक आम्हाला भेट दिले.

सर्वच जेष्ठ व्यक्ती होत्या पण सर्वात श्रेष्ठ होत्या.
डॉ. प्रशांत थोरात यांच्या कार्याची तर गोष्टच वेगळी ! फिरता दवाखाना आणि तोही रोजगार मजुरांवर उपचार करण्यासाठी उचललेला विडा ! डॉ. अतिशय मन लावून हा कार्यभार चालवत आहेत. सर, तुमच्या कार्याला सलाम !

शोभा कोठावदे, एक उत्तम अभंग रचनात्मक कवयित्री ! त्यांनी आपल्या गोड आवाजात त्यांच्या अभंगाचे वाचन अगदी चालीवर गाऊन केले. खूप छान वाटले.

मलाही माझ्या कविता वाचन करण्यास संधी मिळाली. ‘माझ्या कोकणचो राजा’ ही कविता मी माझ्या मालवणी भाषेत सादर केली. त्यानंतर आमच्या सेवानिवृत्तीच्या वेळी मी केलेली कविता, ‘आठवण तुझी येत राहील’ ही कविता मी वाचन केली. ज्ञानसागर व्यक्तींनी मला दिलेली कौतुकाची टाळी, माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे.

मा. श्री. देवेंद्र भुजबळ सर, न्यूजस्टोरीटुडे चे संपादक व सौ. अलका भुजबळ मॅडम न्यूजस्टोरीटुडे च्या सहसंपादिका, उभयतांच्या कार्याची महती, आज जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली आहे. माणुसकी म्हणजे काय ? तर ‘आदरणीय भुजबळ दांपत्य’ हे माझे उत्तर असेल. हे स्नेहमिलन प्रेमाच्या धाग्यात ओवून ठेवण्यासारखे झाले. खूप खूप धन्यवाद !

वर्षा भाबल.

–  लेखन – सौ. वर्षा भाबल.

२. फारच छान स्नेहमेळावा झाला. उत्तम नियोजन आणि अनौपचारिक वातावरणामुळे फार फ्रेश वाटले…..👌🏽👌🏽🌹🌹👍🙏🏽😊

गजानन शेपाळ

– प्रा गजानन शेपाळ. बेलापूर

३. सर, खूप आनंद वाटला आपल्या या छोटेखानी स्नेह संमेलनात सहभागी होऊन. अनेकांना भेटता आले. त्यांचे विचार ऐकता आले. अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या. आपण मला बोलावले त्याबद्दल धन्यवाद.

सिद्धेश प्रधान

– सिद्धेश प्रधान. नेरूळ.

४. संमेलन सोहळा

दिव्यत्वाची आली प्रचिती
देवेंद्र नामे तयांसी वदिती

मिलेनियम वसाहती सोहळा
जमविला ज्ञानवंती गोतावळा

पती पत्नी अलका साथ अशी देई
नागमोडी वळणातून एक्स्प्रेस येई

मुर्ती सान कीर्ती तयांची छान
दिव्य दृष्टीचा उपासक महान

प्रशांतसर नेत्री घाली जना अंजन
मोफत सेवा दुबळ्यास दे व्हिजन

काम न मिळे हिंडती दारोदारी
याचकासी काम देई सेवाच न्यारी

ज्योतिबांना दिधले जिवंत रूप
तैलरंगा प्रतिमा केली सुस्वरूप

राष्ट्रपती पुरस्काराचा मानकरी
स्वप्न होय साकार निरखला श्रीहरी

कवी कवयित्री भरले संमेलन
काव्य ऐकूनी क्षूधा तृप्ती मनोमन

वार्ताहर मुर्ती असो किती सान
गोंडस भाव तव मुखी भाव छान

नित्य वाटे मनी येणार संमेलनी
पराक्रमी सांगे नवनीत घुसळोनी

असा सोहळा वाटे व्हावा वारंवार
भासे मनी भरला देवेंद्राचे द्वार

मगदूम माऊली सुंदरता पारखली
वेस्टमधून बेस्ट शिकवी खतावली (खत)

शोभा कोठावदे

– सौ शोभा कोठावदे. सानपाडा

५. 💢 खूप दिवसांनी अकृत्रिम, अनौपचारिक, अभिनिवेषहिन वातावरणात, साहित्य-संस्कृती विषयी गप्पांच्या कार्यक्रमात सहभागी होता आले.
आपले आम्ही अत्यंत आभारी आहोत.🙏🏼

प्रा डॉ अजित मगदूम

– प्रा डॉ अजित मगदूम. वाशी.

६. मी दिल्लीत आहे. त्यामुळे या शुभ कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही. त्याबद्दल दिलगीर आहे.
इथे असतो तर नक्की ह्या प्रोग्रामला आलो असतो. नक्कीच आनंद झाला असता.

सुधीर थोरवे.

– सुधीर थोरवे, पर्यावरण तज्ज्ञ. सानपाडा.

७. आम्हीं बंगलोर येथे आहे, स्नेहमिलनासाठी हार्दिक शुभेच्छा.

श्री व सौ विभूते

– शाम विभूते. वाशी.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments