शब्दांना मिळालेली सुरांची साथ, गझलेच्या विश्वातील दिग्गज व्यक्तींची उपस्थिती आणि नवोदित कवींच्या प्रतिभेचा उन्मेष… अशा चैतन्यमयी वातावरणात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेचा ‘संगीत मैफील आणि कवी संमेलन’ हा सोहळा नुकताच वाशी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने ही संध्याकाळ खऱ्या अर्थाने ‘काव्यमयी’ ठरली.
गझलेचा राजेशाही थाट :
कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू ठरली ती ज्येष्ठ गझलकार पंडित रघुवीर थत्ते यांच्या शब्दांतून साकारलेली गझल मैफील. थत्ते यांच्या अनुभवी लेखणीतून उतरलेले शेर आणि मिर्झा गालिब यांच्या गझलेतील मिश्किलपणा व भावुकता यांनी रसिकांना खिळवून ठेवले. “गझल म्हणजे केवळ शब्द जुळवणी नव्हे, तर तो काळजाचा हुंकार आहे” याची प्रचिती त्यांच्या सादरीकरणातून आली.
कवी संमेलन :
या वेळी झालेल्या कवी संमेलनात प्रीती राणी जुवेकर, रुपाली लटके, ऋतुजा गवस्, धनंजय पाटील, अनघा तांबोळी आणि सिंगापूरच्या नीला बर्वे आदींनी आपल्या कविता सादर केल्या. या कवींनी सामाजिक भान, प्रेम आणि निसर्ग अशा विविध विषयांवर आपल्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींच्या मांदियाळीत या नवोदितांचे शब्दही आत्मविश्वासाने उमटले.

जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी सहज-सुंदर शैलीत कवितेच्या सादरीकरणातून संमेलनाची रंगत वाढवली.

सुर, शब्दांची जुगलबंदी :
केवळ कविता वाचनच नव्हे, तर ही एक सांगीतिक मेजवानीही होती. सुरांच्या साथीने जेव्हा शब्दांनी लय पकडली, तेव्हा सभागृहात एक वेगळीच संमोहन स्थिती निर्माण झाली होती. कोमसाप नवी मुंबई शाखेने आयोजित केलेला हा उपक्रम साहित्याची ओढ असणाऱ्या तरुणांसाठी आणि जुन्या जाणत्या रसिकांसाठी एक पर्वणीच ठरला.

कोकण मराठी साहित्य परिषद ही एक चळवळ असून साहित्याचे हे रोपटं आपण आता पुन्हा एकदा नव्याने रुजवत आहोत. हे रोपटं जगवणं आणि वाढवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मला अभिमान वाटतो की, दमयंती, प्रतीक, मोहन भोईर परिवार आणि मुकुंद महाले यांसारखी मंडळी यासाठी रात्रंदिवस झटत आहेत, असे विचार जेष्ठ रसिक डॉ अशोक पाटील यांनी व्यक्त केले.
वर्षाची सुरुवात ही संगीतमय झाली पाहिजे, असा उद्देश ठेवून संगीत मैफील आणि कवी संमेलननाचे आयोजन केले असून कोमसाप चे मोठे कार्य नवी मुंबईत व्हावे ही, संस्थापक पद्मश्री मंगेश कर्णिक यांची इच्छा आहे. त्यासाठी लवकरच नवी मुंबई जिल्हा स्तरांवर एकदिवसीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येईल असे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवी मुंबई जिल्हा शाखेचे अध्यक्ष मोहन भोईर यांनी सांगितले.
यावेळी निवृत्त पुराभिलेख संचालक डॉ भास्कर धाटावकर, दूरदर्शन निर्माते श्री मोहनदास मुंगळे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.


देवेंद्र भुजबळ यांचा सत्कार :
संगीत आणि साहित्य विश्वातील कार्यक्रम, उपक्रम, व्यक्तिंना सातत्याने प्रसिद्धी देत असल्याबद्दल निवृत्त माहिती संचालक तथा www.newsstorytoday.com या पोर्टल चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमास नवी मुंबई जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र पाटील, न्यूज स्टोरी टुडे च्या निर्मात्या, प्रकाशिका, मुलाखतकार सौ अलका भुजबळ, स्मिता वाजेकर, सर्जेराव कुइगडे, फुलचंद भगत आणि संगीत, साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
