पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, ज्यांनी स्वकर्तुत्वाने, आत्मविश्वासाने, जिद्दीने, स्वबळावर स्वतःचे वेगळे विश्व उभे केले असे श्री राजेंद्र अचलारे आहेत.
श्री राजेंद्र अचलारे यांचा जन्म १५, जून १९५६ रोजी झाला. आई सौ सुशिलाबाई व वडील जिनदत्त माणिकचंद अचलारे ह्यांचा पंढरपूर येथे शेती व होलसेल बांगडीचा अतिशय नावाजलेला असा व्यवसाय होता.
राजेंद्रजी ह्यांचे प्राथमिक शिक्षण पंढरपूर येथे झाले. पुढील शिक्षणाच्या दृष्टीकोणातून वडिलांनी त्यांना पुण्याला पाठविले.
राजेंद्रजींनी पुणे येथील प्रतिष्ठीत बीएमसीसी कॉलेजमधून बीकॉम व एमकॉम ची पदवी प्राप्त केली. पुढे आयएलएस कॉलेजमधून वकिलीची पदवी घेतली. त्यांनी सी ए करायचे ठरविले. त्यासाठी आर्टिकलशिप व इंटरमिडीएट पूर्ण केले मात्र सी ए पुर्ण करता आले नाही.
पालकांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही म्हणून ते खूप नाराज झाले, खचून गेले. पुन्हा पंढरपूरला जावे असे त्यांना वाटत होते. परंतु घरी परत न जाता पुन्हा लढायचे त्यांनी ठरवले.
आपली शैक्षणिक पात्रता लक्षात घेता त्यांनी सुरवातीला अकाऊंट रायटिंग व टॅक्सेशनचे काम चालू केले. मात्र फारशी कामं मिळत नव्हती.
त्यामुळे विचार करून, अनेकांचा सल्ला घेऊन राजेंद्रजी इस्टेट एजंट म्हणून काम करू लागले. हळूहळू माहिती मिळत गेली, प्रगती होऊ लागली. भांडवल मिळत गेले. त्यामुळे १९९१- १९९२ सालापासून नव्याने व जोमाने व्यवसायाची सुरवात केली. सुरवातीला ते एकटे सर्व काम करत होते .पुढे घरातील कामवाली मावशीच्या मुलाला हेल्पर म्हणून हाताशी घेतले. दत्ता जाधव असे त्याचे नाव होते जो हाताने अधू होता. त्याला नीट बोलताही येत नव्हते.
पुढे गावातील एक मुलगा हरिदास गुराडे ह्याला त्यांनी बोलवून घेतले. तो सुपरवायजर म्हणून काम पाहू लागला. त्यावेळी ते खूप कष्ट व चिकाटीने दिवसभरातील वीस वीस तास काम करत होते.
१९९२-९३ साली फडके हौद येथे आधी बांगडीचे दुकान होते तेथेच त्यांनी वडिलांच्या सम्मतीने स्वतःचे पहिले ऑफिस चालू केले.
एम ८० दुचाकीवर फिरून लोकांशी भेटून माहिती गोळा करणे, ग्राहकांच्या गरजा जाणून घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्या प्रमाणे त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, अशी कामे ते करीत होते. त्यामुळे व्यवसायात जम बसत गेला. त्याचे फळ म्हणून १९९५-९६ साली जंगली महाराज रोड येथे त्यांनी ऑफिससाठी जागा घेतली.
बाणेर, बालेवाडी येथे लँड डेव्हलपमेंट, बंगलो प्लॉटस, ओनरशीप फ्लॅट्स बांधायला त्यांनी सुरवात केली. कामाची सचोटी, उत्कृष्ट दर्जा पाहून चांगला प्रतिसाद मिळत गेला व ग्राहकांचा विश्वास संपादन केला.
कामातील आधुनिकता, उत्तम दर्जा, सर्व सुख सोयी मिळाल्यामुळे ग्राहकांची मागणी वाढत गेली व दिवसेंदिवस प्रगती होत गेली. बांधकाम व्यवसायातील कोणतीही कौटुंबिक परंपरा नसताना देखील अतिशय प्रामाणिकपणे, कौशल्याने अचलारे हे नाव ते वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले व त्यांनी यशाचे शिखर गाठले.
आज बांधकाम व्यवसायात अचलारे हे नाव अतिशय सन्मानाने घेतले जाते. ३५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्री राजेंद्रजी अचलारे ह्यांनी दोन हजार लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण केले असून तीन लाख चौरस फुटाचे बांधकाम आजपर्यत पूर्ण केले आहे.
अचलारे यांच्या बाणेर व बालेवाडी मध्ये अनेक कमर्शियल व रेसिडेंशीयल स्कीम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत.
त्यांनी हिंजवडी येथे १५२ फ्लॅटचा प्रोजेक्ट नुकताच पूर्ण केला आहे. तर पिरंगुट येथे २०० फ्लॅट्सचा, मोशी येथे ४०० फ्लॅट्सचा प्रोजेक्ट चालू आहे.
हिंजवडी व लवासा रोड येथे त्यांची बंगलो प्लॉटची स्कीम सध्या चालू आहे. अतिशय प्राइम लोकेशन म्हणजे मुंबई पुणे हायवेला बाणेर येथे १४ मजली ‘ऑलिंपिया’ ही कमर्शियल स्कीम पूर्ण झाली आहे. बाणेर येथेच ५० हजार चौरस फुटाचे ‘अचलारे हाऊस’ या नावाने प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे सिंगापूर येथील जग प्रसिद्ध आर्किटेक्ट डॅनियल ह्यांचे त्यांना मार्गदर्शन आहे. १२ हजार चौरस फुटाचे त्यांचे अतिशय आधुनिक व भव्य असे कॉर्पोरेट ऑफिस आहे. त्याचे पूर्ण डिझाइन डॅनियल यांच्या सल्ल्यानुसार झाले आहे.
श्री अचलारे यांच्याकडे सध्या शंभर लोक काम करत आहेत. त्यात सी ए, वकील, आर्किटेक्ट, इंजिनिअर, सल्लागार यांचा समावेश आहे.
संतुष्ट व समाधानी ग्राहक हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. पारदर्शी व्यवहार व कोणताही खोटेपणा अथवा फसवेगिरीच्या ते पूर्ण विरोधात आहे. कोणतेही चुकीचे काम करायला त्यांना अजिबात आवडत नाही. म्हणूनच ते पुण्यातील लोकप्रिय व विश्वासू बांधकाम व्यावसायिक होऊ शकले आहेत.
राजेंद्रजी यांचे वडील पंढरपूर येथे मध्यवर्तीचे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत.
राजेंद्रजीना समाज सेवेचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळाले आहे असे ते आवर्जून सांगतात. सामाजिक बांधिलकी जपत समाज बांधवांना सवलतीच्या दरात ते घर बांधून देतात. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा व समाजाविषयी असलेले प्रेम दिसून येते.
१९९७ साली कालिका देवी संस्था, पुणे येथे त्यांचे पॅनल एकमताने निवडून आले.समाजात त्यांचा सक्रिय सहभाग असतो व सर्वांच्या सहकार्याने त्यांनी विविध उपक्रम जसे की वधू वर मेळावा, महिला मेळावा, युवकांसाठी मार्गदर्शन शिबीर, जेष्ठांसाठी आरोग्य, सांस्कृतिक, धार्मिक मेळाव्याचे उत्तम नियोजन केले व ते यशस्वीही झाले आहेत.
केवळ व्यवसायातच नव्हे तर समाजातदेखील त्यांची प्रेरणादायी व उल्लेखनीय कामगिरी आहे. उद्योग भरारी कार्यक्रम पुणे येथे युवकांसाठी आयोजित करण्यात आला होता त्यावेळी यशस्वी लोकांचे मार्गदर्शन युवकांना लाभले. त्याचे उद्घाटन अतिशय दिमाखात माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते.
कालिका देवी संस्था, पुणे येथे लवकरच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होणार आहे. हे सर्व समाज बांधवांनी पाहिलेले स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी अनेकांचे सहकार्य देखील लाभले आहे. या कामात जवळपास ३०० कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आहे. देवीच्या मंदिराच्या बांधकामाचे प्रमुख अचलारे सर आहेत. या कामी पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष माननीय हेमंतजी रासने ह्यांचे देखील सहकार्य आहे, तसेच ऍड बाळासाहेब सुपेकर व मामा रासने ह्यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले असे ते सांगतात. कालिका मंदिराचे बांधकाम ही अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. एकीचे बळ खूप मोठे असते हे ह्या उदाहरणावरून स्पष्ट दिसून येते.
राजेंद्रजी ह्यांना, आपले अजून कोणते स्वप्न आहे ? हे विचारले असताना ते म्हणाले, आताच दोन वर्षांपूर्वी पाषाण येथे आधुनिक सोयी सुविधांनी बांधलेला बंगला हे एक स्वप्न पूर्ण झाले, तर पुणे कालिका देवीच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे दुसरे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे व तिसरे स्वप्न म्हणजे कारव्हान म्हणजे हाऊस ऑन व्हील. ह्यामधून कुटुंबाला व मित्र परिवाराला घेऊन भारत देश बघायचा आहे. त्यांचे अनेक विदेश दौरे झाले आहे. आता आपला संपूर्ण देश बघायचे स्वप्न ही लवकरच पूर्ण करण्याची त्यांची इच्छा आहे.
राजेंद्रजी अचलारे हे पुणे जिल्हा विकास समितीचे संस्थापकीय अध्यक्ष आहेत, तर कालिका देवी संस्था, पुणे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा विकास समिती कोअर कमिटीचे प्रमुख व रोटरीचे ही प्रमुख आहेत. क्रीडाई व मराठी बांधकाम व्यवसायिक असोसिएशनचे सभासद आहेत.
राजेंद्रजी ह्यांना निसर्गरम्य वातावरणात फिरायला, चालायला गाणी ऐकायला व वाचायला आवडते. व्यायाम, योग व ध्यानधारणा ही ते नियमितपणे करतात. त्यांना माणसं जोडायला आवडतात.
त्यांचा मोठा मुलगा रोहित हा बी ई असून अमेरिकेतील सेरीकूस युनिव्हर्सिटीतुन त्याने एमबीए पूर्ण केले आहे. तो आता बांधकाम व्यवसायातील मार्केटिंग व सेल्स हे क्षेत्र पाहत आहे. मुलगी ऋतुजा हीने भरतनाट्यम मध्ये पदवी घेतली असून तिनेही अमेरिकेतून एमबीए पूर्ण केले आहे. ती देखील त्यांच्या व्यवसायात मदत करत आहे. दोन्हीही मुलं अतिशय हुशार असून ह्याचे श्रेय ते आपल्या अर्धांगिनी सौ विद्याताई यांना देतात. तिने कौटुंबिक बाजू सक्षमपणे सांभाळली म्हणून त्यांना स्वतःच्या व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करता आले. त्यांच्या यशात पत्नीचा मोलाचा वाटा आहे असे त्यांना वाटते.
पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाईचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशिर्वाद, त्यांनी केलेले संस्कार तसेच कुटुंब व मित्र परिवाराची साथ असल्याने आपण यशाचे शिखर गाठू शकलो असे ते म्हणतात.
युवा पिढीला ते असे सांगतात की, “अशक्यही शक्य करण्याचे सामर्थ्य हे आपण निश्चित केलेल्या ध्येयावर अवलंबून असते, मग वाटेत कितीही अडचणी आल्या तरी त्यावर हिमतीने व धीराने मात केली तर यश तुमचेच आहे. मोठे स्वप्न पहा व ते पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के द्या. तसेच नोकरी करण्यापेक्षा स्वतः उद्योजक होऊन अनेकांना नोकरी देण्याची संधी तुमच्या व्यवसायामार्फत उपलब्ध करा. जीवन हा संघर्ष आहे, त्याचा आत्मविश्वासाने सामना करा.”
असे हे अतिशय हुशार, प्रभावशाली, प्रेरणादायी, अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले श्री राजेंद्रजी अचलारे हे युवकांसाठी आदर्श आहेत. त्यांच्या ह्या कार्याला सलाम व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
सन्मा. राजेंद्रजी अचलारे यांची , ” नवी वाट ” आजच्या तरूण पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी प्रवास आहे. रश्मी हेडे मॅडमच्या लेखणीतून प्रसवलेल्या विचारांची शृंखला राजेंद्रजी अचलारे यांची व्यावसायिक संघर्ष करून पुण्यातील एक यशस्वी बांधकाम उद्योजक म्हणून निर्माण केलेले ब्रॅंड ही फार अचंबित करणारी गोष्ट आहे. कारण, या क्षेत्रात परिवारातील काहीही वारसा नसतांनाही केवळ स्वतःच्या जिद्दीने, चिकाटीने , कष्टाने प्रतिकूल परिस्थितीतही या क्षेत्रात आपले नाव केले आहे. ही अभिनंदनीय बाब आहे. “ब्रेव्हो ब्रेव्हो राजेंद्रजी अचलारे ब्रेव्हो”!!
राजाराम जाधव,
सहसचिव (सेवानिवृत्त)
महाराष्ट्र शासन,
जिद्द चिकाटी व कष्ट
त्यामुळे उत्तुंग भरारी
अभिनंदन
डॉ टकले