आजपासून सुरू होत असलेल्या नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने सादर करीत आहे, काही कविता….
— संपादक
१) “मरणारे वर्ष मी…”
थोर कवी मंगेश पाडगांवकर यांच्या “सरणारे वर्ष मी” या सुंदर कवितेचे हे विडंबन … अर्थात मंगेश पाडगांवकरांची क्षमा याचना करून…
मीच उद्या असणार आहे
नसणार कोणी दूसरे
मित्रहो सदैव राहो
रडके तुमचे चेहरे
झाले असेल चांगले
किंवा काही वाईट
मी माझे काम करत नाही
नेहमीच असतो टाईट
माना अथवा नका मानु
तुमची माझी नाळ नाही
भले होवो, बुरे होवो
मी काही “बाळ” नाही
उपकारही नका मानू
दोषही नका देऊ
निरोप माझा नका घेऊ
दारापर्यन्तही नका येऊ
उगवत्याला “नमस्कार”
हीच रित येथली
बघा नवे वर्ष
होईल काही चमत्कार
धुंद नसेल जग आज
उतरली असेल रात्रीची
वर्षाच्या स्वागताला
मला साथ नको कुणाची
शिव्या, शाप, लोभ, माया
याचा असतो धनी मी
मी माझे काम करत नाही
यात माझा काही दोष नाही
निघताना “पुन्हा भेटु”
असे मी म्हणणार नाही
“वचन” देतो तुम्हा
जे मी कधीच पाळणार नाही
मी कोण ? नाही सांगणार
“शुभ आशिष” नका देऊ
“मरणारे वर्ष मी”
माझा पुतळा कधी उभारणार ?
— विडंबन : ☺️ देवेंद्र भुजबळ.
२) ‘उणे-अधिक‘
आयुष्याचे सिंहावलोकन
करायला हवे असते
उणे किती अधिक किती
तपासून घ्यायचे असते ||
प्रत्येक दिवस नवा असतो
नवे काही शिकवून जातो
असे वर्ष संपता संपता
अनुभव संपन्न करतो ||
वैर द्वेष वजा करुनी
भागाकार दुःखाचा केला
बेरीज ही आप्तजनांची
गुणाकार हा आनंदाचा ||
शेवटी राहिली झोळीत
सुख वैभवाची शिल्लक
यश फारसे दूर नाही
इरादा असताना नेक ||
नवीन गोष्टी शिकताना
आनंदी क्षणांनी सुखावले
जिवलगांच्या विरहाने
अंतरी व्याकूळ बनले ||
नवीन नातीही जोडली
मनास श्रीमंती मिळाली
आप्तजनांच्या संगतीत
नवीन ऊर्जाही लाभली ||
शब्दांनी लळा लावलाय
शब्द साधनेत रमते
सृजनाच्या शब्दवैभवे
परमानंदे झोळी भरते ||
–– रचना : ज्योत्स्ना तानवडे. पुणे
३) वर्ष सरताना
वर्ष हेचि सरताना
गतकाळात रमले
आठवणी जपताना
क्षण तेचि अनुभवले …
आपले अन् परके
भेदाभेद ते कळले
सरते वर्ष जाताना
बरेच काही शिकले …
भले बुरे ते अनुभव
सुख दुःखही भोगले
येत्या नविन वर्षात
नको काही असले …
मोह, लोभ कित्येक
गतकाळात आले,
नच भुलूनी तयास
जीवनी सामोरे गेले ..
मनी येई दाटूनी हुरहूर
गेले सरले वर्ष भरभर
डोळी दिसे गतकाळ
मनी स्मृतीची ओंजळ…
नव वर्ष करू स्वागत
नवी दिशा नवे विचार
नवी प्रेरणा व संकल्प
जावू यश शिखरावर ….
— रचना : मीना घोडविंदे. ठाणे
४) स्वागत
स्वागत तुझे हे नवीन वर्षा l
सवे घेऊन ये समृद्धी हर्षा ll
यश सप्रेमाची होऊ दे वर्षा l
विज्ञान सद्धर्म सद्धर्माचा करी उत्कर्षा ll
जनी मनी नित प्रेम वसु दे l
बळी राजा ही पुरवी आस ll
हवा तेव्हा हवा तेवढा l
येवो पर्जन्य खास ll
अधिक धान्य जगी पिकू दे l
चराचर हे सुखी असू दे ll
नको दुःख कोणा हृदया l
जगी वसु दे सुख शांती दया ll
नव वर्षा आज तुजकडून l
हीच अपेक्षा असे हृदय भरून ll
स्वागत ! स्वागत ! स्वागत
पूर्ण करी नव वर्ष आमचे मनोगत ll
–– रचना : अलका रामचंद्र मोहोळकर. पंढरपूर
५) वर्ष अपेक्षा ..
नव्यावर्षा कडूनचं
करी किती अपेक्षा
उत्कृष्ट असो सारे
मागच्या वर्षा पेक्षा
मागल्या वर्षात पहा
करे कर्तृत्वसमिक्षा
भूतकाळ प्रशिक्षक
देई वाटचाल दिक्षा
जाणा कालनिर्णय
दूर सरतीलं उपेक्षा
रे कालाय् तस्मैनमः
कालचक्र घे परिक्षा
प्रयास करा सुसूत्रते
अंतरीजर आकांक्षा
समजू घ्यावे आयुष्य
विस्तृत होतील कंक्षा
कळे आपली मर्यादा
संकटा नसे व्यपेक्षा
आपत्तीपरतून जाई
स्वताचं करी सुरक्षा
नव वर्षाचा संकल्प
आधीचं समग्र नक्षा
परिपूर्णहोई प्रकल्प
सत्यात यावी नुपेक्षा
मुक्ती मिळेलं त्यांस
ज्यांना खरी मुमुक्षा
भुक्ती मिळेल त्यांस
ज्यांना तीव्र बुबुक्षा
–– रचना : हेमंत मुसरिफ. पुणे
६) स्वागत नववर्षाचे
हे वर्ष नवे, सुख घेऊनि यावे,
वर्ष नवे, हे वर्ष नवे
बरसू देत अमृतधारा
स्वच्छंद वाहू दे वारा
ते बीज धरित्रीपोटी
येऊं दे तरारून आता
आळसाला न द्यावा थारा
ये समृध्दी बहारा
हातांस मिळू द्या कामे,
चैतन्य नवे खेळावे
नवविज्ञानाच्या योगे
क्रान्तीस मिळावी साथ
आसेतू-हिमाचल प्रान्ती
गंगौघ वाहू दे नित्य
गंगा, यमुना, सिंधू
कावेरी जला जोडावे
हे प्रांतभेद नि वैर
जलधारांतूनी संपावे
जन्मा येता प्राणी
जगण्याचा हो अधिकारी
तुम्ही जगा, जगू द्या,
त्याला माणुसकी जागवा खरी
द्या अस्त्रशस्त्र टाकून
जोडू या बंध नात्याचे
संदेश शांतीदूताचा,
माणसापरी वागावे
वाढू द्या प्रेम सर्वांचे,
या भारत देशावरचे
उसळोत भारती हृदयी
राष्ट्रप्रेम लहरी लहरी
या विविधरंगी देशाचा
आनंद लुटावा खास
मुक्तांगणी विहरत राहो,
हा पक्षी मम राष्ट्राचा
— रचना : स्वाती दामले.
७) नववर्ष स्वागत
कधी चटका देणारे ऊन
कधी डोळ्यात आनंदाचे पाणी.
सुख दुःखाचे क्षण शिकून गेले
खऱ्या खोट्याची कहाणी
जुन्या आठवणींचा ठेवा
उद्याच्या स्वप्नांसाठी आहे नवा
31डिसेंबर हा शेवट नसून
पुढील प्रवासातील विसावा.
सरत्या वर्षे
खूप काही शिकून गेले
कोण आपले कोण परके
स्पष्ट ते दाखवून गेले.
काही स्वप्ने तुटली
काही पूर्ण झाली
नवीन वर्षाची चाहूल
आनंद घेऊन आली
काय गमावले आहे
सारे विसरून जाऊ
काय कमावले आहे
ते स्वप्न रूपात पाहू
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी
हो माणसा जागा
माणुसकी आणि प्रेमाने
जपून ठेव आपुलकीचा धागा
नवीन वर्षाच्या शुभ क्षणी
स्वप्ने सर्वांची पुर्ण व्हावी
हस्याच्या गुलकंदात
नेहमीच ती बहरत रहावी
प्रयत्नांच्या यशाला
किनारा नसावा
आयुष्यातील प्रत्येक क्षण
आनंदाचा असावा
पुर्ण व्हाव्या सर्वांच्या
सर्व ईच्छा नवीन वर्षाच्या
सर्वांना खुप खुप शुभेच्छा
नवीन वर्षाच्या सुरुवातीला
आपणच आपल्या मनाला सांगावं
जे होतं ते चांगल्यासाठी होतं
आलेल दुःख जगण्याचं सार शिकून जातं.
— रचना : भारती वसंत वाघमारे. आंबेगाव, जिल्हा पुणे
८) एक पान उलटताना
एक पान उलटताना,
नवी सुरुवात,
होती नवी पहाट, प्रकाशवाट,
वळणे रस्त्यात,
नवे स्वप्न खुणावते,
नवा आहे जोश,
आनंदाचे वर्ष आहे,
करू या जल्लोष
ठरवावे ध्येय,
नक्की गाठायचे काय,
काय नवे शिकायचे,
काय नवी सोय,
जग बदलते आहे,
शोध हो नवीन,
नूतन आव्हान येते,
रूप बदलून,
अनेक आहेत संधी,
नीट निवडावे,
कार्यगती, कौशल्याचे
भानही ठेवावे
हवे आहे जोशपूर्ण,
सुहास्य बोलणे,
आप्त, मित्र, नातलग, सुखात जगणे…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
