नमस्कार मंडळी.
आज आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारात स्वागत करू या कवयित्री सौ क्रांती उपरे यांचे.
त्या गृहिणी असून त्यांच्या काही कविता वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये त्या सहभागी होत असतात.
— संपादक
१. शब्दांचे खेळ
शब्दांच्या खेळाच्या
आहेत तऱ्हा निराळ्या
काहीं उमलतात तर काहीं
कोमेजतात मनाच्या कळ्या
ज्या मार्मिक शब्दांनी
ज्ञानेश्वरी लिहिली
त्याच शब्दांनी
रामायण, महाभारत रचली
काही शब्द मनाला
कठोर भासतात
पण त्यातले मर्म ओळखून
कार्य सिद्धीस नेणारे असतात
प्रत्येक कठोर शब्द
हा नसतो दुखावणारा
तर जीवनात प्रगतीच्या
वाटेवर असतो नेणारा
शब्दांची मांडणी
आहे छान कला
पाठबल व हिम्मत
वाढवण्याची ही लिला
शब्दांनीच मनाच्या जखमेवर
मायेची फुंकर घालता येते
शब्दांनीच मग नवजीवन
सफलतेची प्राप्ती होते
शब्दांच्या ठिपक्यांची
सुरेख योग्य मांडणी असावी
त्यांना जोडूनच मग
योग्य रांगोळी रेखावी
काही शब्द असतात
गोड मेवा जून साखरेचा
तर काही शब्द असतात
कडू पण गुणकारी औषधाचा
मनाची समजूत काढणारे
ही शब्दच असतात
प्रेमाने कवेत घेणारे व
दूर लोटणारे ही तेच असतात
मनाला मनापर्यंत जाण्यासाठी
साथ लागते शब्दांचीच
मनाच्या कवाडांसाठी
सोबत लागते शब्दांचीच
शब्दांच्या दुनियेची सफर
असते भारी
शब्दच नाचतात सुंदर
जसे मन मयूर आभाळी
२. अत्तर
अत्तराचा सुगंध आहे
प्रत्येकाच्या जीवनातला दुवा
सुखी जीवनासाठी मिळाला
आहे जणू मेवा
योग्य व्यक्तीचा सहवास
आयुष्य दरवाळून टाकतो
अत्तरा समान हा
सुखी जीवनासाठी हवा असतो
मैत्री चे अत्तर जीवन
सुगंधित करते सारे
हाच तर आहे सुखी
जीवनाचा अर्थ खरे
जीवनसाथी ही असते
जणू कुपी अत्तराची
जीवनगाणी गात पाहावी
स्वप्ने सोबत सुखी संसाराची
अत्तर संपले तरी कुपी
ठेवावी वाटते जपून
यानेच टाकलेले असते
आपले आयुष्य दरवळून
काही व्यक्ती असतात
जणु कुपी अत्तराची
जागा घेतलेली असते
आठवणींनी मनाची
असो सण वार
वा आनंद प्रसंगी
दरवळत राहतो सुगंध
याचा सर्वांच्या अंगी
अत्तराची कुपी ठेवायची
असते सांभाळून
आठवणींचे मोती त्यात
ठेवायचे असतात साठवुन
अखंड दरवळत राहतो
प्रेमाचा हा सुगंध
यात जपून ठेवलेला
असतो नात्याचा गंध
३. स्त्री
स्त्री ची आहेत
पाहा रूपे नऊ
मने मात्र आहेत
कशी सर्वांचीच मऊ
स्त्री ला म्हणतात सारे तू
आहेस मृदू तू कोमल
तू आहेस त्यागाची मूर्ती
पण तू आहेस दुर्बल
या झाल्या साऱ्या
आता जुन्या गोष्टी
का राहावं तिने आता
सदा दुःखी व कष्टी
स्त्री ही स्वतःच झाली
पाहिजे स्वतःची रक्षक
न करू शकेल
कोणी तिला भक्षक
आत्मसंरक्षणाचे धडे घ्यावे
लागतील तिला स्वतःला
ना कुडत राहावे दोष
देते स्वतःच्या नशिबाला
वर्षाचा एकच दिवस का
मिळावा तिला सन्मान
रोजच मिळावा तिला
महिला दिनाचा मान
बैल पोळ्याच्या बैला सारखी
नको तिची अवस्था
एक दिवस कौतुकाची झूल
नंतर खाव्या खास्ता
मिळत नाही तिच्या
सुरक्षेची अजून तिला हमी
का असावी तिच्या नशिबी
या गोष्टीची कमी
झुगारून टाकावे लागेल
तिला अवहेलनेच जिणं
तरच पडेल पदरी
तिच्या सन्मानाच जिणं
ध्येय गाठण्यासाठी झगडावे
लागेल, करावे लागतील तिला कष्ट
तरच साकार होईल तिच्या
मनाची हर एक गोष्ट
जिजामाता, राणीलक्ष्मी बाई
यान सारखी डोळ्यात ठेवावी
लागेल करारी तेव्हाच घेऊ
शकेल अवकाशात उंच भरारी
रोजच व्हावा लागेल
स्त्री चा योग्य सन्मान
तेव्हाच राखला जाईल
सर्व स्त्री जातीचा मान
स्त्री आहे खरे
तर स्वरूप नवदुर्गाचे
अन्याया विरुद्ध लढून सार्थक
करावे लागेल जीवनाचे
४. प्रगत शेतकरी
जुन्या आठवणींना उजाळा
देऊन का खचवायचा मानाचा धीर
दुःख व निराशेचा आता
नको मनावर तीर
तो ही आता सुधारलाय,
नवीन तंत्रज्ञान शिकून
कष्टासोबत ज्ञानाची
मशाल हाती धरून
संकट समयी जिवन समाप्ती
हा नको ध्यास
त्याच्या या विचारांनाच
लावावा आता फास
कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर
घेतली आहे उंच भरारी
पडल्या शिवाय राहणार नाही
समाधानाचे दान त्याच्या पदरी
नैराश्य व उदासीच्या गोष्टी
दिल्या आहे त्याने भिरकावूनी
हिरवे सोने पिकवण्याची
आस आहे त्याच्या नयनी
ऊन असो वा पावसाच्या सरी
झेलायची आहेत त्याच्यात धमक
आल्या संकटांना दोन हात
करण्याची आहे त्याच्यात हिम्मत
असो सुट्टी वा कोणता सण
याचे नाही त्याला भान
हिरवं सोन पिकवणे हेच
एक असते त्याचे ध्यान
प्रगत शेती करण्याची
घेतली आहे त्याने आन
त्यासाठी करतोय तो
आपल्या जीवाचे रान
शेती अन्न उत्पादनाचे
क्षेत्र जरी मानले जाई
ती मात्र असते आपल्या
शेतकऱ्याची आई
न हारता न डरता
लढायला शिकवलं नियतीने
आत्मविश्वासाच्या बळावर
लढण्याचे घेतले आता मनाने
शेतकरी हा राजाच होता
तो राजाच राहणार
डोळ्यात साठवलेली
तो स्वप्ने साकारणार
शेतीच असणार आहे सोबत
गाठायला यशाचे शिखर
सर्व जगताला पोसायला
हाच तर आहे भक्कम आधार.

— रचना : सौ. क्रांती उपरे. अंबाजोगाई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800