Friday, October 18, 2024
Homeसंस्कृतीनव्या परंपरा

नव्या परंपरा

अधिकस्य अधिकम् फलम् !
भारतीय व इंग्रजी सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. मात्र हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे वर्ष ३५५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. अधिक महिना असलेले वर्ष ३९६ दिवासांचे असते. इतर वर्षांत ३६५ दिवस ५ तास, ४५ मिनिट व १२ सेकंद असतात.

भारतीय पंचांगामध्ये  अधिकमासाला ‘तेरावा महिना’ म्हटले आहे. सूर्य बारा राशीत वर्षभर भ्रमण करत असतो. ३२ महिने, १६ दिवस व चार घटकांनंतर सूर्याला कोणतीही संक्रांत नसते. ज्या महिन्यात सूर्याची संक्रांत नसते, तो अधिक महिना मानला जातो व त्याला  ‘मलमास’ असे सुद्धा म्हटले जाते. त्याला पुढील चांद्रमासाचे नाव देतात.

सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो. चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. काहीवेळा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो.

ज्याचांद्रमासात दोन संक्रांती येतात, त्याला क्षयमास म्हणतात. उदा. कार्तिक या चांद्र महिन्यात वृश्‍चिक संक्रांत होऊन जाते आणि पुढच्या चांद्र महिन्यात धनू व मकर अशा दोन्ही संक्रांती आल्या तर धनू संक्रांतीचा मार्गशीर्ष या महिन्याचा क्षय समजतात. मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाहीत, क्षयमास येतात. ज्या वर्षी क्षयमास येतो त्याच्या आधी व नंतर ३-४ महिन्यांच्या अवधीत अधिक मास असतोच. त्यांपैकी अगोदर येणाऱ्या अधिक महिन्याला संसर्प व पुढे येणाऱ्या अधिक महिन्याला अंहस्पती अधिकमास म्हणतात. उदा. शके १८८५ मध्ये मार्गशीर्ष क्षयमास आलेला होता त्या वेळी आश्विन १८८५ हा संसर्प आणि पुढचा चैत्र १८८६ हा अंहस्पती हे अधिक-मास आले होते.

ज्यावर्षी चैत्र हा अधिकमास असतो, त्यावर्षी अधिकमासाच्या सुरुवातीलाच शकसंवत्सराचा आकडा एकने पुढे जातो, गुढी पाडवा मात्र लगेचच नंतर येणाऱ्या निज चैत्र महिन्यात येतो. म्हणजे त्यावर्षी पाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस नसतो. हिंदू पंचांगातल्या प्रत्येक महिन्यात दोन (वा अधिक) एकादश्या असतात; त्यांतल्या २४ एकादश्यांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना ‘कमला एकादशी’ हेच नाव असते. ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो. अधिक मासात निजमासांप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात.

एकदा आलेला अधिकमास पुन्हा १९ वर्षांनी येतो उदा. या वर्षी श्रावण हा अधिकमास आहे तो यापूर्वी १९८५, २००४ यावर्षी आला होता तसेच पुढील २०४२, २०६१…. याप्रमाणे असेल. तेच इतर महिन्याचे सर्वसाधारपणे. काही अपवाद असू शकतात.  वैदिक काळात अधिक महिन्याला मलीमलूच असे म्हटले गेले आहे. या महिन्यात शुभ कार्ये होत नाहीत तरीही धार्मिक कर्मकांडांसाठी मात्र हा महिना उत्तम मानला जातो.

हिरण्यकश्यपूला बारा महिन्यात कधीच मरणार नाहीस असे वरदान मिळाले होते म्हणून अधिक मासामध्ये श्रीविष्णूंनी श्रीनरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला त्यामुळे साहजिकच  हा मास त्यांच्या स्तवनाचा आहे. म्हणून त्यास पुरुषोत्तम मास असेही संबोधिले जाते. या महिन्यांत उपास, यज्ञ, याग, हवन करण्यांत येतात तसेच श्रीमतभगवद्गीता, भागवतपुराण, श्री विष्णूपुराण, पुरुषसुक्त, श्री सुक्त, हरिवंश पुराण, गुरुने दिलेल्या प्रदत्त मंत्राचा नियमित जप, श्री विष्णूसहस्रनाम यांचे  देवालयांत आणि घरोघरीही श्रद्धेने  पठण केले जाते. रोजच्या अध्यामिक वाचनाने मन:शांती ही प्राप्त होते.

या महिन्यात दानाचे ही विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथांमध्ये तिथीनुसार अन्न, वस्त्र ,जडजवाहीर इ . चे दान करण्यास सांगितले आहे. हिंदू पद्धतीत, मुलगी जावयाला लक्ष्मी -नारायण समजले जाते म्हणून अधिक मासामध्ये त्यांना भोजनास आमंत्रित करून ३३च्या पटीत {३३ च का तर हिदुधर्मांत ३३ कोटी ( कोटी संख्या नसून निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपविले आहेत. ८ वसू, ११ रुद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती)} अनारसे, मैसूरपाक, बत्तासे असे जाळीदार पदार्थ वाण म्हणून दिले जातांत. याला धोंड्याचा महिना असेही संबोधिले आहे कारण अधिकमासाच्या पंगतीत धोंड्याला महत्व आहे. पुरण घालून केलेल्या चौकोनी पदार्थाला दिंड म्हणतात, तर त्याला गोल आकार दिला की धोंडा म्हणतात. हा धोंडा वाफेवर उकडून, गरम गरम वाढला जातो नि मधोमध फोडून मोदकाप्रमाणे साजूक तूप घालून खाल्ला जातो.

या अधिकमासाचेही कोणत्याही गोष्टीसारखे मार्केटिंग झाले आहे. आज बाजारात, अनारसे, मैसूरपाक, बत्तासे ३३च्या पटीत आकर्षित पॅकमध्ये सजून बसले आहेत. कपडे, भांडी या दुकानांबरोबर सुवर्णपेढ्याही विविध भेटवस्तूंनी सजल्या आहेत. आधुनिक काळांत पुराणकाळातील दानमहात्म्य फक्त जावयाला वाण देण्यापर्यंत संकुचित झाले आहे. लक्ष्मीनारायण जोडा वगैरे ठीक आहे पण ही पद्धत कां असावी याची मिमांसा माझ्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करीत आहे, पटते कां बघा.

लहान वयांत लग्न झालेल्या मुली एकदा कां सासरी गेल्या की रांधा वाढा, उष्टी काढा या सासरच्या एकत्र कुटुंबाच्या रगाड्याला जुंपल्या जात. बाराही महिने घरचे सण, परंपरा, आन्हिके यांतच गुरफटून जात. सारा कारभार स्वयंपाकघर, परसदार आणि कधीतरी वेशीपर्यंतचे देऊळ ! हा एकच महिना असा की शुभकार्ये वर्ज्य. त्यामुळे मुलीला माहेरी जायची परवानगी. घरोघरच्या माहेरवाशिणी माहेरी येऊन आजच्या भाषेत रिलॅक्स होत असणार. आई वडीलही कोणती कार्ये नाहीत, म्हणून त्यांचे लाड करण्यास थोडेफार मोकळे असणार आणि मग महिना संपताना, जावईबापू येणार.

त्यांच्यासाठी ऐपतीप्रमाणे पक्वान्नाचे भोजन, म्हणून धोंडा… सर्वात सोप्पा. पुरण आणि घरचे दूधदुभते म्हणून तुपास कमतरता नाही.  तेव्हां अनारसेच विशेष करून वाण  स्वरूपांत दिले जात कारण आधी करून ठेवता येणारी ही मिठाई.  शिवाय  प्रवासांत (त्याकाळी बैलगाडी) तुटणार नाही आणि  हवेने खराब होणार नाही. हे कारण मीच ठरवित आहे, कारण वाचनांत कुठेही काही आढळले नाही. पण त्यांवर खूप विचार करीत होते की जाळीदारच पदार्थ कां ?  तेव्हां या उत्तरावर शिक्कामोर्तब करण्याआधी इतर  काही मजेशीर कल्पना सुचल्या, एक सांगते. मिठाया खूप प्रकारच्या आहेत, प्रतिकात्मक गोड पदार्थ देण्याची परंपरा, की अशीच गोडी संसारात राहो. तर हे जाळीदार पदार्थ गोड आहेतच पण मधेमधे हवा असूनही सर्व अणुरेणू एकमेकांना जोडून आहेत आणि अतिशय खुसखुशीत आहेत. सर्वसाधारण गोड पदार्थांसाखे, मऊ, चिकट व पाणीदार नाहीत. तर हे पदार्थच वाण देतांना त्यांना असे सांगावयाचे आहे कां, की अशी हवा …आताच्या भाषेत स्पेस.. जर पत्नीलाही मिळाली तर संसार गोड तर होईलच पण खुसखुशीतही होईल अनारश्यासारखा !! असो…

बाकी वस्त्रे, दागिने ऐपतीनुसार. तीन वर्षांतून एकदाच !!  पुन्हां पोरगी तीन वर्षांनीं दिसणार ! ती सुद्धा त्यावेळी तिच्या घरी कांही अडचण नसेल तर! परत जातांना मुलीच्या भावना काय असतील !! 
आजच्या काळांत यांतील काय शिल्लक आहे ? मुली आजकाल तीस -पस्तीस वयांपर्यंत लग्न करीत नाहीत. तोंवर आर्थिकदृष्ट्या सबल असतात. (इथे मी मध्यमवर्ग आणि त्या वरचे वर्ग यांबद्दल विचार मांडत आहे की जे या वाण  प्रकारचे स्तोम माजवितात. आजच्या भाषेत show !) त्यांची निवड, आवड यांप्रमाणे सारे वॉर्डरोब, अगदी बुटांपासून केसांच्या रंगापर्यंत सारे कांही. जावई ही तसेच. लग्न झाल्यावर एका गावांत असतील तर वारंवार भेटी होतात, न पेक्षा रोज फोन /विडिओ कॉल आहेच. सासरीही अतोनात जबाबदारी, केवळ  घरकाम, व्रतवैकल्य यांत दमणूक असले प्रकार नाहीत. तर अशा दोघांना वाण देणे हे परंपरा उर्फ हौस या लेबलखाली येऊ शकेल.

हौस करा बापडे पण जर थोडी सामाजिक जबाबदारी उचलली तर ? शिवाय जेवढा जावई प्रिय तेवढीच सूनही. जशी आपली मुलगी सून म्हणून तिच्या सासरच्यांनी कदर करते तशीच दुसऱ्यांची मुलगी आपली सून, आपल्यावर ही प्रेम करते. माझ्यामते, सून -मुलगा, जावई -मुलगी सारे समान. वर्षभर कसले कसले डेज  साजरे होतांत,  शिवाय वाढदिवस, विवाहदिन असे खास दिवस !! त्यामुळे देवाणघेवाण सतत सुरु असतेच नाही कां ?
मग या निमित्ताने थोडीफार सामाजिक बांधिलकी निभावली तर ? कोणत्याही नवीन विचाराची सुरुवात आपल्या घरांपासून करावी असे माझे वडील म्हणत आणि आचरणात ही आणत असत. उदा. आजकाल लग्नांत अहेर नको हे सहजपणे स्वीकारले गेले आहे पण माझे लग्न हे मुंबईतील प्रथम लग्न की ज्या निमंत्रणपत्रिकेत, “अहेर नको” हे सर्वप्रथम लिहिले आणि पाळले गेले ते माझ्या वडिलांचाआग्रह म्हणून. त्या काळांत यांवर वादविवाद झाले, अग्रगण्य वर्तमानपत्रांतून चर्चा रंगली.

तर अशा वडिलांची मुलगी म्हणून यावर्षी अधिकमास म्हणून लाभलेल्या श्रावणमासात मी माझ्या मुली जावयाला वाण दिलंच शिवाय मुलगे, आणि ते हे की, ‘आव्हान पालक संघ, मुंबई’ ही संस्था भारतांतील सीमारेषांवर तैनात असलेल्या जवानांसाठी राखी, मिठाई, दिवाळी फराळ पाठविण्याचा उपक्रम करते. या उपक्रमाद्वारे माझ्या मुलां, सुनां, जावई आणि नातींतर्फे दुर्गम भागातील काश्मीर खोऱ्याच्या उत्तरेकडील भागात भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर कुपवाडा येथे कार्यस्थित असलेल्या सैनिक बांधवांसाठी, ज्यांचे आम्ही शतश: ऋणी आहोत, रक्षाबंधनासाठी राख्या आणि फराळ पाठविला. माझे हे वाण या सर्वांना मनापासून आवडले.
मी हे केले, आपणही सामील झालांत तर ? अधिकस्य अधिकम्  फलम्  !!

नीला बर्वे

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन