Home बातम्या नव्या भारतासाठी नवे धोरण – डॉ.दिगंबर शिर्के

नव्या भारतासाठी नवे धोरण – डॉ.दिगंबर शिर्के

0

“विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे तर विविध कौशल्ये विकसित करून आर्थिक सक्षमता प्राप्त करून देण्यासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वाचे ठरेल, असे मत मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले. ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला- वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात काल दिवशी ‘नवे शैक्षणिक धोरण २०२०: अंमलबजावणी आणि पुढील वाटचाल’ या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे आयोजन रामानंद आर्य डी.ए.व्ही. स्वायत्त महाविद्यालय, आणि जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

डॉ.शिर्के पुढे म्हणाले, “या धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची,स्वायत्त महाविद्यालयांची भूमिका महत्वाची ठरणार असून हे धोरण विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायला हवे.

यावेळी बोलताना उपकुलगुरू डॉ.अजय भामरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणताही बाऊ न करता स्वीकारणे गरजेचे असल्याचे सांगत या धोरणाची अंमलबजाणी उत्तम होणार याची खात्री दिली.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी कृतीयुक्त शिक्षण देण्याचे आव्हान स्वीकारायला प्राध्यापकांनी तयार राहण्याची गरज असल्याचे सांगितले. यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आणि महात्मा गांधींच्या शिक्षणविषयक संकल्पनांची आवश्यकता असून नवीन शैक्षणिक धोरणात त्याचे प्रतिबिंब आपल्याला पहायला मिळेल, असे त्या म्हणाल्या.

या चर्चासत्रात बोलताना पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व सदर धोरण अंमलबजाणी समितीचे प्रमुख श्री. नितिन करमळकर यांनी उच्च शिक्षणाचे देशीकरण करण्याची गरज स्पष्ट करून विविध कौशल्ये, नीतिमूल्ये आणि मातृभाषेत शिक्षण या सर्व बाबींचा समावेश या धोरणात असल्याचे अधोरेखित केले. साचेबद्ध निकष बाजुला ठेवत प्रत्यक्ष कृती करून शिकण्यावर भर देणाऱ्या नवनविन आंतरशाखीय अभ्यासक्रमांचा आराखडा तयार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विद्या प्रसारक मंडळाचे डॉ.महेश बेडेकर यांनी यावेळी बोलताना, हे शैक्षणिक धोरण राबवताना अडचणी येणार पण त्या पार करून आपण चांगली अंमलबजावणी करू असा विश्वास दिला.

या प्रसंगी एस. एन. बोस मुलभुत विज्ञान केंद्राचे अध्यक्ष डॉ.बी. एन. जगताप, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.रविंद्र कुलकर्णी, श्री.आनंद मापुस्कर, प्रा.संतोष परुळेकर हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या वेळी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.रविंद्र कुलकर्णी, श्री.आनंद मापुस्कर, श्री.संतोष परुळेकर, विद्या प्रसारक मंडळाचे डॉ.विजय बेडेकर, जयंत कयाळ, डॉ.विजय जोशी तसेच अनेक शिक्षणतज्ञ, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version