नवी मुंबईतील प्रभात ट्रस्ट डोळ्यांचा फिरत्या दवाखान्यातून मोफत डोळे तपासणी, चष्मा, औषधे व कडधान्य वितरण, वार्षिक आरोग्य तपासणी अशा विविध उपक्रमातून नाका कामगार प्रभात कुटुंबाचा एक घटक झाले आहे. यासाठी कामगार दिनाच्या निमित्ताने, प्रभात ने नाका कामगारांसाठी ‘सन्मान कष्टाचा‘ अर्थात नाका कामगारांचा कुटुंब मेळावा रविवार 5 मे 2024 रोजी नवी मुंबई महानगरपालिका समाज मंदिर, सेक्टर 16, घणसोली नवी मुंबई येथे आयोजित केला होता.
या कार्यक्रमात कामगारांच्या जीवनावरती आधारित कवितांचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. कविता डॉट कॉमचे प्रा.रवींद्र पाटील सर, कवी जितेंद्र लाड यांच्या जोडीला याप्रसंगी बालकवी प्रसाद माळी, दक्षता लाड, अंकिता गोळे यांनी कामगारांच्या हृदयाला साथ घालणाऱ्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी शंकर गोपाळे यांनी केले.
श्रमाला मोल मिळो .. घामाला दाम मिळो…
या हातांना काम मिळो..
अन कामाला सन्मान मिळो..
या आशयाची मी नाका कामगार ही कविता कामगारांनी सादर केली.
या कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनात्मक खेळासाठी नाका कामगार बंधू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी अन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रा अजित मगदूम सर यांनी व्यसनमुक्तीसाठी नाका कामगारांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कामगारांसाठी आयोजित केलेल्या लकी ड्रॉ चे वितरण करण्यात आले. लकी ड्रॉ मध्ये पहिल्या क्रमांकाला विजेत्या ठरणाऱ्या कल्लू खान यांना सायकल बक्षीस देण्यात आली. यावेळी हातावरचे पोट असणारे कामगार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
— लेखन : डॉ. प्रशांत थोरात. नेत्ररोग तज्ञ.
अध्यक्ष प्रभात ट्रस्ट, नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800