सणांचा, उत्सवांचा राजा मानल्या जाणाऱ्या निसर्गाचे रूप बदलून, जीव .. संजीवन देणारा सर्व प्राणिमात्रांना संतुष्ट करून उत्साह भरणाऱ्या अशा या श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पहिला सण !
नागपंचमी हा महत्वाचा हिंदू सण, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जातो. या सणाला पौराणिक महात्म्य आहे. यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला.
हिंदू धर्मामध्ये नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात. नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत. भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग, तर भगवान विष्णू शेषनागा वरती विसावतात. यामुळे नागांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे.
श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांचाही आशीर्वाद मिळतो अशी भविकांची श्रद्धा आहे. म्हणून या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा आहे.
या शिवाय दुसरे सामाजिक कारण सुद्धा या नागाची पूजा करण्यामागे आहे बर कां ! नागांना शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. कारण ते पिकांचे नुकसान करणारे उंदीर खातात. काही लोकांचा असा विश्वास आहे की नागपंचमीच्या पूजेने सर्पदंशापासून संरक्षण मिळते.
नागपंचमी हा महाराष्ट्रात साजरा केला जाणारा एक महत्वाचा सण आहे. या सणात स्त्रिया आणि पुरुष दोघेही उत्साहाने भाग घेतात.
या दिवशी विशेषतः गावांमध्ये घराच्या दारावर किंवा भिंतीवर शेणाने किंवा रंगवून नागाची चित्रे काढली जातात. मनोभावे मातीच्या किंवा धातूच्या नागाची पूजा केली जाते.काही वेळा तर गारुडी जिवंत नाग घेऊन येतात आणि मुली, सुवासिनी त्याची हळदी कुंकू, अक्षता, दुर्वा, फुले, दूध, लाह्या वाहून मनोभावे पुजा करतात. त्या नागाला भाऊ मानतात त्याच्यासाठी उपवास करून त्याला रक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात. नवीन कपडे, दागिने घालून हाताना मेंदी काढून एकत्र जमून खूप खेळ खेळतात. उंच झोके घेतात.
“चल ग सखे वारुळाला, वारुळाला..
नागोबाला पूजायला, पूजायला..”
अशी गाणीही गातात. फेर धरतात. झिम्मा, फुगड्या असे पारंपारीक खेळ खेळतात.

नागपंचमीच्या दिवशी तव्यावर भाजलेले, कापलेले, चिरलेले असे पदार्थ खात नाहीत. म्हणजेच तवा, चाकू, विळी, सुरा या धार असलेल्या गोष्टी वापरत नाहीत. शेतकरी कोयता, नांगर या गोष्टी वापरत नाहीत. यामुळे नागाना इजा पोहोचु शकते ही त्यामागची भावना !
आपले पूर्वज खरोखरच खूप विचारी होते. प्रत्येक सण, उत्सव, परंपरा बनवताना त्यासाठी काही खास गोष्टी योजल्या आहेत. त्यांचे पालन करताना आधी आपण त्या नीट समजून घेणे महत्वाचे आहे. शिवाय त्यात काळानुरूप बदल करण्याचीही गरज आहे.
अगदी ऋतुतील हवामानानुसार खानपान, वेशभूषा योजल्या आहेत. जसे उन्हाळ्यात पांढरे किंवा हलक्या रंगाचे, सूती कपडे घालावेत म्हणूनच पाडव्याला, होळीला पांढरे वस्त्र घालतात. बाळाला सुद्धा शीतल शिमगा म्हणून पांढरे, सूती झबले घालून केशर शिंपडतात. थंड वाटावे, हवेतील उष्णता बाधू नये हाच त्यामागे उद्देश असावा. थंड साखरेच्या गाठी.. हार घालतात म्हणजे नववर्षाची सुरुवातच गोडाने करून उष्णताही सुसह्य होते. तर थंडीत याच्या अगदी उलट म्हणजे संक्रांतीचेच घ्याना ! काळे कपडे घालायचे, उष्णता निर्माण होणारे तीळ, गूळाचे पदार्थ खायचे. फक्त इतकेच नाही तर आताचे शेअरिंग सुद्धा त्यांनी एकमेकांना तिळगुळ देणे, वाण देण्यातून सांगितले आहे. देवाच्या पूजे बरोबर धनधान्य, प्राणीमात्र, निसर्ग यांच्या पूजेलाही तितकेच महत्व दिले आहे. नारळी पौर्णिमेला निसर्गातील सागराची पूजा, वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा, आवळीभोजन, गोमाता पूजन, चतुर्मासात गरुड पूजन, पोळ्याला बैलाची पुजा, तर नागपंचमीला नागपूजा !
अशा निसर्गातील सर्व रूपांच्या पूजा करण्यामागे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा मुख्य उद्देश !
पण आपण त्यांना समजून न घेता काहीजण प्रथा या नावाखाली तंतोतंत पाळतात तर काहीजण थोतांड मानून सोयीस्करपणे ते टाळतात.
आजच्या नागपंचमीच्या सणाचेच उदाहरण घेऊया ना !
पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती, त्यातून आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान! त्यामुळे स्त्रियांना सणासुदीलाच गोडाधोडाचे खायला मिळायचे. नटूनथटून पूजेच्या, हळदीकुंकवाच्या निमित्तानेच घराबाहेर पडून मैत्रिणींना भेटता यायचे. म्हणून नागाच्या पूजेच्या निमित्ताने हे साध्य व्हायचे.
दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांना माहेर, माहेरची माणसे खूप प्रिय असतात. मग नागाला भाऊ मानुन त्याला पूजायच्या निमित्ताने त्याची भीती जाऊन उलट जवळीक निर्माण होते. खरे तर साप, नाग हे आपल्या खुप उपयोगी असतात. सापाच्या कातीला (त्वचेला) तर खुप किंमत आहे. त्या पासून अनेक प्रकाराची औषधे बनवली जातात. वीज येण्यापूर्वी रात्री घरात अंधार असायचा. श्रावणात तर पावसाचे काळे ढग असल्याने काही वेळा दिवसाही अंधार असायचा. मग त्यामुळे घरातसुद्धा जास्तच अंधार असायचा. तापलेली जमीन पावसाच्या शिडकाव्यामुळे थोडीशी शांत, थंड होते आणि आतील साप, नाग बाहेर पडतात. हे लोकांच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी अंधारात जास्त राहतात. स्वयंपाक करताना नकळतपणे विळी, सुरी किंवा काळ्या लोखंडाच्या तव्यावर असतील तर त्यांना अग्नीपासून धोका होऊ नये म्हणून भाजणे, कापणे असे या दिवशी करत नसत. आता लाईट्स भरपूर असल्यामुळे खरेतर याची गरज नाही. हे बदलले जाऊ शकते.
नाग खरेतर दूध पित नाही. तरीही विनाकारण केवळ प्रथा म्हणून त्याला हळदी, कुंकू, दूध, लाह्या वाहून एकप्रकारे आपण त्याला त्रासच देत असतो. उलट या दिवशी त्याला दुखवू नये, त्रास देऊ नये. उलट त्याचे रक्षण करावे.
सणाचा मुख्य उद्देश एकत्र येणे, एकीची भावना निर्माण करणे हाच असतो. म्हणून या दिवशी आवर्जून नातलग किंवा मित्र, मैत्रिणींच्या भेटी घेतल्या, तर या सणाचा हा उद्देश छान सुफळ होईल. सध्याच्या धावपळीच्या काळात आपल्या शेजारील लोकांकडे पहायला देखील आपल्याला सवड नसते तर नातलगांना भेटणे तर दूरचीच गोष्ट ! या निमित्ताने भेटलो तर प्रेम, जवळीक,आपुलकी नक्कीच वाढेल.
आता मोठ्या शहरात बरेच ठिकाणी सर्पोद्याने खास बनवली आहेत. तिथे विविध प्रकारचे साप, नाग, अजगर पहायला मिळतात. शक़्य असेल तर मुलांना तिथे घेऊन जाऊन दाखवून त्यांची माहिती सांगावी. साप पकडण्याचे खास प्रशिक्षण दिले जाते. सर्पमित्रांचे खास नंबर सुद्धा असतात. त्यामुळे कोणाला साप दिसले तर घाबरून न जाता या सर्पमित्राना बोलावावे. ते व्यवस्थित साप पकडून त्यांना सुरक्षित जागी सोडतात.
सगळेच साप विषारी नसतात त्यामुळे विनाकरण त्यांची भीती बाळगु नये. ते मानवाचे मित्रच असतात. विनाकारण त्यांना त्रास दिला तरच ते हानी पोहोचवतात. नाग खरेतर दूध पित नाही, लाह्याही खात नाही.त्यामुळे नागाला पाजायच्या ऐवजी तेच दूध एखाद्या गरजू, भुकेल्या मुलाला प्यायला दिले, खाऊ दिला तर जास्त पुण्य लाभेल.
जिवंत नागाच्या ऐवजी मातीचा नाग बनवून त्याची पूजा करावी. तशीही आपल्या हिंदू संस्कृतीत मूर्तीची पूजा केली जातेच. दुसऱ्या दिवशी कुंडीत किंवा जमिनीत त्याचे विसर्जन करून त्यात आठवण म्हणून हवे तर एखादे छानसे रोप लावावे. त्यामुळे निसर्गाचे ही आभार मानले जातील आणि आपल्यालाही शुद्ध हवा, सुंदर निसर्ग पहायला मिळेल आणि सामाजिक बांधिलकीही जपणे होईल. काळानुसार आपणही बदल करणे गरजेचेच आहे असे मला वाटते.

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800