नागपूर शहरापासून 15 किमी अंतरावर असणारे नागपूरवासियांचे ग्रामदैवत म्हणजे कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मातेचे मंदिर. हे मंदिर 300 वर्षा पूर्वीचे आहे. मंदिर आजही दिमाखात उभे असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
महालक्ष्मी जगदंबा मातेचे अतिशय सुंदर रूप येथे पाहायला मिळते. कोराडी येथील हे महालक्ष्मी जगदंबा मातेचे मंदिर पाहायला देशभरातून भाविक येत असतात. विस्तीर्ण परिसरात उभे असलेले हे मंदिर 300 वर्षे पुरातन असून मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असल्याचे आढळते. या देवीचे रूप तीन प्रकारात पाहायला मिळते. सकाळी बालिका रुपात दुपारी तरुण रुपात तर संध्याकाळी वयस्कर रुपात देवीचे रूप पाहायला मिळते.

महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाने या मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असून, या मंदिराचा जिर्णोद्धार करून सभोवतालचा परिसर सुशोभित करण्यासाठी 220 कोटीचा निधी देऊन काम सुरू केले असल्याने, मंदिर पाहण्यासारखे झाले आहे. विद्युत रोषणाईने संध्याकाळी मंदिर खुलून दिसते.. मंदिर व्यवस्थापन समिती या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी धडपडताना दिसते. इथे आल्यावर मंदिराचे भव्य स्वरूप पाहून आणि मूर्ती पाहून मन प्रसन्न होते.
मंदिराच्या सुरुवातीला मंदिराचे भव्य द्वार पाहायला मिळते. मंदिरात येणारे भक्त देवीला कमळ वाहतात. तसेच मंदिराच्या परिसरात वर्षाचे 365 दिवस 24 तास अखंड ज्योत प्रज्वलित होत असते. मंदिराचा इतका भव्य परिसर असताना ही तो स्वच्छ पाहायला मिळतो.
मंदिराला पौराणिक इतिहास आहेच. या देवीच्या मंदिराला शक्ती पिठाची मान्यताही आहे. आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी ही देवी नागपूरकरांसाठीच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व च परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे.

मंदिराच्या ट्रस्ट चे अध्यक्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत. मंदिरात दूरवरून आलेल्या भाविकांसाठी अन्नछत्र चालवले जाते. अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकी व्यवस्था इथे करण्यात आली आहे. अवघ्या 30 रुपयात पोटभर जेवण मिळते.
मंदिराची रोषणाई सोलर सिस्टीम वर करण्यात आली असून विविध रंगांनी मंदिर रोषणाई सजवलेले आहे. याच मंदिराच्या परिसरात पर्यटकांसाठी भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र ही उभारण्यात आले आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते यावर्षी 5 जुलै रोजी या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आणि 8 जुलै पासून हे केंद्र लोकांसाठी खुले करण्यात आले.
या भव्य सांस्कृतिक केंद्रात एका दालनात रामायण दर्शनम हॉल याच्या 14,760 चौरस फूट परिसरात हे दालन पसरलेले असून, श्री रामाच्या जन्मा पासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंत 120 चित्रांच्या माध्यमातून रामायण कथा तर दुसऱ्या दालनात 1857 ते 1947 पर्यंतच्या स्वातंत्र्यसैनिकांची 115 चित्रे या दालनात ठेवण्यात आली असून, 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील विविध घटना दर्शवणारी 14 चित्रे आहेत. प्रत्येक चित्राखाली त्या चित्राचे इंग्रजी हिंदी मराठी भाषेत वर्णन केलेले आहे.

युवापिढी मध्ये देशभक्ती भावना जागृत करणे तसेच भारतीय संस्कृती बद्दल प्रेम वाढविण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राची स्थापना करण्यात आलेली पाहायला मिळते. 1.94 एकर परिसरात हे सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले आहे. यात भारत माता मंदिर ही उभारण्यात आले आहे.
या सांस्कृतिक केंद्र परिसरात वीर हनुमानाची 20 फूट उंचीची भव्य मूर्ती पाहायला मिळते. या वास्तू शिल्पाची आंतरिक सजावट चेन्नई येथील टी.भास्करदास यांनी केली आहे तर बाहेरील सजावट डॉ. श्री के. दक्षिणामूर्ती यांनी केली आहे. सकाळी 10 ते 5 यावेळेत हे केंद्र खुले असते.
कोराडी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तसेच पर्यटकांना दिवसभर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दालनामुळे इथे वेळ कुठे जातो तेच कळत नाही. या सांस्कृतिक केंद्रामुळे नागपूरच्या पर्यटनात मोठा हातभार लागेल यात शंका नाही.
मंदिराच्या परिसरात 160 खोल्यांचे भव्य भक्त निवास बांधण्यात आले असून भविष्यात याठिकाणी सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी मंदिर प्रशासन कमिटी प्रयत्न करत आहेत. नागपूर ला जाण्याचा योग आल्यास या परिसराला आवर्जून भेट द्यायला विसरू नका. किवा फिरता फिरता नक्कीच या परिसराला भेट देऊन या तुम्हालाही आवडेल.

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
नागपुरातील कोराडी देवी खुपच छान आहे मी ऑगस्ट मध्थे स्वतः देवळात जाऊन दर्शन घेतले आहे.देवी सकाळी दुपारी व संध्याकाळी रूप बदलते. खुप सुदंर दर्शन मिळाले. नवरात्रात भाविकांची खुप गर्दी असते असे म्हणतात. आजूबाजूचा परीसर भव्यदिव्य आणि हिरवाई ने सजलेला आहे.तिथे बाजूलाच सांस्कृतिक केंद्राला भेट दिली अप्रतिम असे चित्रमय रंगीत संपूर्ण रामायण मोठ्या दालनात आहे व खुप आकर्षित आहे.दुसऱ्या मजल्यावर 1857 ते 1947 चे सर्व स्वातंत्र्य सैनिकाचे तैलचित्र आहेत भव्यदिव्य असे हे दालन डोळ्यात किती सामावून घेऊ असे होते.प्रत्येकानी भेट द्यावी असेच हे ठिकाण आहे.