ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने चिटणवीस सेंटर व चिटणवीस ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्याने “तिसरे अभ्युदय सेवा प्रदर्शन – २०२६” चे आयोजन २, ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी चिटणवीस सेंटर, ५६, टेंपल रोड, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे करण्यात आले आहे.
अभ्युदय सेवा प्रदर्शन हे वस्तू विक्रीचे प्रदर्शन नसून, महाराष्ट्रातील स्वयंसेवी व सेवाभावी संस्थांना आपल्या कार्याचा सामाजिक प्रभाव समाज, उद्योगजगत, CSR कंपन्या, देणगीदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे.

यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या दोन प्रदर्शनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. २०२४ मध्ये ४५ तर २०२५ मध्ये ६१ सेवा संस्थांनी सहभाग नोंदविला. या प्रदर्शनांमुळे अनेक संस्थांना नवीन संपर्क, सहकार्याच्या संधी आणि समाजापर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम उपलब्ध झाले.
यंदाच्या प्रदर्शनात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कृषी व ग्रामीण विकास, बालविकास, दिव्यांग सेवा, ज्येष्ठ नागरिक, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आदी विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक सेवा संस्थांना निःशुल्क स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रदर्शनादरम्यान कंपन्यांचे CSR प्रतिनिधी, उद्योगसमूह, देणगीदार, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांना सेवा संस्थांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यामुळे संस्थांना भविष्यातील सहकार्य, आर्थिक पाठबळ आणि नेटवर्किंगसाठी नवी दारे खुली होतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.
प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी सन २०२५–२६ चा वार्षिक अहवाल सादर करून Google Form द्वारे नोंदणी करावी. मर्यादित व निवडक संस्थांनाच सहभागाची संधी दिली जाणार आहे. या प्रदर्शनात वस्तूंची विक्री करता येणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे
अधिक माहितीसाठी संबंधित विभागनिहाय संपर्क प्रतिनिधींशी संपर्क साधावा किंवा gramayanpratishtan@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800