Home बातम्या सानपाडा नानानानी पार्क, ५० लाख रुपये देणार – सौ. मंदाताई म्हात्रे

सानपाडा नानानानी पार्क, ५० लाख रुपये देणार – सौ. मंदाताई म्हात्रे

0

नवी मुंबईतील सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी आणि सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सिताराम मास्तर उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क बनविण्यासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये निधी दिला जाईल, असे स्पष्ट आश्वासन बेलापूर विधान मतदार संघाच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिले. सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ३१ जुलै २०२६ रोजी आनंद मेळावा झाला. या आनंद मेळाव्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री मारुती विश्वासराव हे होते.

या आनंद मेळाव्यात जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या १०८ मानकऱ्यांना, ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पुष्पगुच्छ, पेन व गुलाब देऊन गौरविण्यात आले.

मेळाव्याला आमदार सौ मंदाताई म्हात्रे या ज्येष्ठ नागरिकांच्या आणि सानपाडा वासियांच्या समस्या जाणून घेण्यासाठी “आमदार आपल्या भेटीला” या कार्यक्रमांतर्गत आल्या होत्या. सुरुवातीला त्यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी सानपाडा येथील सिताराम मास्तर उद्यानात ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयासमोर नाना नानी पार्क उद्यान असावे, अशी मागणी केल्यानंतर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी तात्काळ नानानानी पार्कसाठी आमदार निधीतून ५० लाख रुपयांची देणगी जाहीर केली. या घोषणेने सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांना खूप आनंद झाला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्या वाजवून या घोषणेचे स्वागत केले.
या व्यतिरिक्त सिताराम मास्तर उद्यानात क्रिकेट खेळणाऱ्याचे चेंडू ज्येष्ठांना लागून ते जखमी झाल्याच्या घटना लक्षात घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी जाळी लावावी, ज्येष्ट नागरिक संघाची सभासद संख्या १२५० असल्यामुळे आता संघाचे सभागृह, कार्यालय अपूर्ण पडत आहे. त्यामुळे पुढच्या शेडला स्लॅप असावा. बस स्टॉपला शेड असावे, सानपाडा येथे रस्त्याच्या रोडला दोन्ही बाजूला पार्किंग मुळे निर्माण होणार्‍या समस्या ज्येष्ठ नागरिकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडे मांडल्या.

मंदाताई म्हात्रे यांनी जेष्ठांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोना काळात अनेकांना आपण सहकार्य केले. बेलापूर येथे मोठे रुग्णालय होणार असून, सानपाडामध्ये ग्रंथालयाची इमारत उभी राहत आहे. आपण जागा दिल्यास योग केंद्र बांधून देईल.
ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी तत्पर आहे. आपण आपल्या समस्या घेऊन माझ्या पर्यंत येऊ नका, तर मी आपल्यापर्यंत येऊन, या समस्या सोडवत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

कर्जत येथील पिकनिकमध्ये झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये प्रथम तीन स्पर्धक महिलांचा आमदारांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, श्री मारूती विश्वासराव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तर नागरिक संघाच्या कार्याचा आढावा घेऊन संघाचे सचिव जगदीश एकावडे यांनी प्रास्ताविक केले. मनोरंजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाच्या उपाध्यक्षा सौ. सीमा बोराडे यांनी केले.

आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना २५० छत्रीचे वाटप केले. या आनंद मेळाव्यात माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना नाष्टा दिला.

याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त माहिती संचालक आणि न्यूज स्टोरी टुडेचे संपादक देवेंद्र भुजबळ, निर्मात्या सौ. अलका भुजबळ, भाजपा नेते निलेश म्हात्रे, समाजसेवक पांडुरंग आमले, रूपेश मढवी, भार्गव मढवी त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष राम काजरोलकर, मारुती कदम, माजी उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, बळवंतराव पाटील, सुभाष बारवाल, शिवसेनेचे शाखाप्रमुख दत्तात्रय कुरळे, साहित्यिक गजानन लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, खजिनदार महादेव पाटील, सहसचिव राजेंद्र कदम, सहखजिनदार नाना शिंदे, मंगला मानधने, जगन्नाथ देसाई, राजाराम घोलप, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात, पांडुरंग वाजे, ज्ञानेश्वर जाधव, अधिकराव पवार, नारायण साखरे इत्यादींनी विशेष सहकार्य केले.

आनंद मेळाव्याला ज्येष्ठ नागरिक पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version