देशातील कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या पाहता आणि त्यामुळे मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन एक चांगले सुसज्ज रुग्णालय असावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी काही प्लॅनही आखले आणि विदर्भातील कॅन्सर रुग्णांना दूर कुठेही न जाता इथेच काही सोय होईल, तर ते उत्तम होईल, असे त्यांना वाटत होते.
नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर असून महाराष्ट्राची उपराजधानी आहे. त्यामुळे याठिकाणी कॅन्सर रुग्णालय उभारायचे असे ठरले. आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने 2012 रोजी याची घोषणाही करण्यात आली. हे रुग्णालय उभारण्यासाठी शैलेश जोगळेकर आणि डॉ.आनंद पाठक यांना मदतीला घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी या रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवली आणि भव्यदिव्य असे रुग्णालय उभे राहिले.
नागपूरच्या जामठा परिसरातील 25 एकर जागेवर 470 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभे राहिले. डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था संचलित ‘ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट’ उभे राहिले. सर्व प्रकारच्या कॅन्सरवर याठिकाणी उपचार केले जातात. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात आल्या. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार सुरू झाले. 24 तास या तत्त्वावर इथे काम केले जाते. याठिकाणी येणाऱ्या रुग्णाला कॅन्सरच्या उपचाराकरिता सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्याची सोय करण्यात आली आहे.
मुळातच रुग्णालय म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते ती एक विचित्र वास असलेली इमारत.अशा रुग्णालयात रुग्ण, रुग्णांना भेटायला येणारे नातलगही कंटाळतात. याला अपवाद हे नागपूर मधील कॅन्सर रुग्णालय म्हणावे लागेल. येथे रुग्णालयाच्या परिसरात येताच आपल्याला भली मोठी गार्डन्स पाहायला मिळतात. विस्तीर्ण पसरलेले हिरवेगार लॉन्स इथे बघायला मिळतात. रुग्णालयाच्या भव्य इमारतीचे दर्शन नेत्रसुख देऊन जाते. इमारतीची रचना खूप विचार करून केलेली आहे, हे बघताक्षणीच लक्षात येते. इमारतीच्या आत प्रवेश केल्यावर सुखद धक्का बसतो, कारण आपण एक मिनिट उभेच राहून विचार करतो की मी नक्की रुग्णालयात आहे की एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे! पण आपण रुग्णालयात आहोत, हे आठवावे लागते. समोरच एका भिंतीवर विविध भाषांमध्ये लिहिलेले पाहायला मिळते ते म्हणजे “मी कर्क योद्धा आहे” हे. तिथूनच कॅन्सर रुग्णाचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न सुरू झालेला दिसतो. समोरच येणाऱ्या रुग्णांची विचारपूस करणारे सेवक येतात. रुग्णांना नक्की काय मदत हवी त्याप्रमाणे त्यांना योग्य मार्गदर्शन इथे करण्यात येते. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठीही प्रत्येक वेळी तिथले कर्मचारी प्रत्यक्ष झटताना दिसतात.

रुग्णालयातील स्वच्छ वातावरण पाहून मन प्रसन्न होते. जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सर्व सुविधा या रुग्णालयात देण्यात आल्या आहेत. तब्बल साडेसात लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेली 10 मजली इमारत पाहताना मन थक्क होते. रुग्णालयात फिरताना कुठेही कसलाही वास नाही, की कचऱ्याचा पत्ता नाही. येणारा रुग्ण हे वातावरण पाहूनच अर्धा बरा होणार, हे नक्की. या रुग्णालयात जागतिक दर्जाचे उपचार मिळतात.

महत्वाचे म्हणजे रुग्णालयात लहान मुलांसाठी खास पेडियाट्रिक वॉर्ड तयार केला आहे. धर्मादाय पद्धतीने कार्य करणारे हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय आहे. रेडिएशन थेरेपीसाठी उभारण्यात आलेली यंत्रणा जगातील अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित आहे. नियमित केमोथेरपी घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचे वॉर्ड प्रशस्त आहेत. तर इथे येणाऱ्या रुग्णासोबत एका नातलगालाही याठिकाणी राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय केली आहे. जेवण उत्तम आहे. त्यासाठी रुग्णालयात भव्य किचनही उभारण्यात आले असून, ते नेटके ठेवलेले आहे. रुग्णालय पाहायला, विविध वॉर्ड फिरायला कमीतकमी 8 तास लागतात.
आम्ही हे रुग्णालय पाहायला गेलो, तेव्हा एक गोष्ट पाहिली की रुग्णालय उभारताना पुढील 25 वर्षाचा अभ्यास करून मांडणी केली आहे. तसेच जी मशिनरी आणली आहे तीही अद्ययावत असून खूप नवनवीन टेक्निकल गोष्टी उभारण्यात आल्या आहेत. जनरल वॉर्डही खूप मोठे आणि स्वच्छ आहेत. एका वॉर्डमध्ये पाहिले रुग्णाच्या काही टेस्ट केल्या तर त्या एका capsul मध्ये ठेवल्या जातात आणि काही सेकंदात त्या पँथॉलॉजीत जातात आणि तातडीने टेस्ट होऊन त्याचा रिपोर्ट संबधित विभागात दिला जातो.
रुग्णालय पाहताना खूप गोष्टी मनाला भावल्या आणि नकळत देवेंद्रजींचे कौतुकही वाटले. एखादा प्रोजेक्ट कसा करावा हे याचे उदाहरण आहे. सध्या याठिकाणी 470 बेडची व्यवस्था असली, तरी भविष्यात 800 बेड होतील, अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. यात 10 अद्ययावत ऑपरेशन थिएटरर्स आहेत.
विदर्भासह मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यातील कॅन्सर रुग्णांसाठी येथे सोय झाली आहे. हे रुग्णालय म्हणजे कॅन्सर रुग्णासाठी आरोग्य मंदिरच ठरणार आहे. 27 एप्रिल 2023 रोजी या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
या प्रोजेक्टने देवेंद्रजींनी सगळ्यांच्या मनात घर केले हे खरे. देवेंद्रजींचा हा प्रोजेक्ट संपूर्ण भारतात आदर्श देणारा ठरेल, हेच खरे.

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800