आज नाग पंचमी आहे. त्या निमित्ताने काही कविता सादर करीत आहे. नागपंचमी च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
१. नागपंचमी
सण श्रावणातला,
नागपंचमी सण आला,
सख्या त्या भेटतील,
मजला माहेराला… ॥धृ॥
श्रावण पंचमीला, नागोबालाच मान,
पूजा-अर्चा करून, करतात गुणगान,
लाह्या, फुटाणे, दूध घेऊन
जाऊ वारुळाला ! ॥१॥
मनोभावे पूजा, करून घेऊ दर्शन,
सुखावेल हृदय, मिळेल सहर्षण,
उधाण येणार,
सख्यांच्या या आनंदाला !॥२॥
चला चला,
बांधूया झोपाळा बाभळीला,
खेळू हिंदोळ्यावर,
मनसोक्त होऊ झुला,
नंदू, अक्षू, दिल, शबाना
चला गं, चला! ॥३॥
मैत्रिणी रात्रभर, धरू आपण फेर,
गाणी गाऊ, फुगडी खेळू, करू जागर,
बहिणी-मैत्रिणींना,
भेटण्याचा सण आला ! ॥४॥
— रचना : अनिसा सिकंदर. पुणे
२. नागपंचमी
सण येता नागपंचमी
येते किती खुमखुमी
पकडा धरावे नागांना
सुरु जोरात धामधुमी
दूधपीत नसतो साप
बळजबरी करे आम्ही
म्हणे नाग डूख धरतो
कसे विचित्र पुरोगामी
पुंगी डान्स करवितो
कृत्ये सगळी जुलमी
स्टंटबाजी मारे बाजी
कार्यक्रम एक कलमी
नागासह हवी सेल्फी
प्रसिद्धी हाव न कमी
डसतील नाग चिडून
फुकाचे याल रे कामी
कुणी चुंबतो नागांना
स्टंटबाजी खुम खुमी
नागा देवता म्हणे तरी
छळवादां सदैव हमी
सगळे प्रसिद्धी भुकेले
इव्हेंट हो नाग पंचमी
कमाऊन घेतात पैसा
सुसंधी मिळाली नामी
घेतो पंगा येता रंगा
सुरक्षेची नाही हमी
नागाहूनी भयंकारी
माणूस ना असे कृमी
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
३. “नागपंचमी”
भारताचे असती नागराजे ख्यात प्राचीन
पराक्रमी नागवंशीय राजे कर्तृत्ववान ।।धृ।।
सर्वात मोठा होता नागराज अनंत
जम्मू काश्मीरांतील अनंत नाग प्रसिद्ध
राजाच्या कर्तुत्वाची साक्ष देते पटवून ।।1।।
नागराजा वासुकी उत्तर प्रदेश नृप
नागराजा तक्षक होता जगप्रसिद्ध
तक्षशिला विश्वविद्यापीठ केले स्थापन ।।2।।
नागराजा कर्कोटक रावी प्रदेश नृप
भंडारा प्रांत प्रमुख नागराजा ऐरावत
पाचही राज्यांच्या सीमा एकमेका लगत ।।3।।
पुजा होते पाच नागराजांच्या स्मृती प्रित्यर्थ
प्रतिवर्षी साजरी होत नागपंचमी तिथ
प्रजा नागराजांचे सदैव करिते स्मरण ।।4।।
नागोबाचे शय्येवर विराजले नारायण
सात फडा उभारून सांभाळती धरा तोलून
दूध लाह्या वाहू त्याला करू त्याचे पूजन II5II
कृषीवलांचा मित्र आहे भूमी रक्षक नाग
शिवाच्या गळ्यांत नागाला मानाचे स्थान
गजाननाचे कटीवर राहे विलसून ।।6।।
शेष पद्म कंबल अश्वतर धृतराष्ट्र
शंखपाल कालीय तक्षक पिंगलादी नाग
बारा महिन्यांची प्रतीके करावे पूजन II7II
— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
४. नागपंचमी
सण नागपंचमीचा
नागराजे पुजनास
रेलचेल भव्य असे
राजा तो श्रावणमास |१|
हिंदोळ्यात बसोनिया
गाऊ नागोबाला गाणी
गारोड्याची पूंगी सांगे
नका करू मन मानी |२|
काय कलियुग असे
काॅंक्रिटचे वन आले
नाही बिळ कपारीला
नेत्री आठवते झाले |३|
श्रावणात जलधारा
लपंडाव पावसाचा
हिरवळी अनुग्रह
असे शिव शंकराचा |४|
सण मुक्यांच्या पुजना
भारतीय प्रभंजन
हिंदोळ्यात बसोनिया
नारी हो मनोरंजन |५|
कालियाच्या मर्दनात
गोकुळाचे संरक्षण
नच कापणे चिरणे
उकडीचे हो भोजन |६|
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
“नागपंचमी” वर सौ. शोभा कोठावदे यांनी रचलेली कविता शब्दबद्ध आहे. खूप छान रचना.