Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्यनाचे मयुरी

नाचे मयुरी

आईचा हात घट्ट पकडलेला, वडिलांनी डोक्यावर हळुवारपणे हात ठेवलेला नि ती बघत राहिली वडिलांकडे, थिजलेल्या डोळ्यांनी, एकटक.

सारी सोळा वर्षाची पोर ! आई मान फिरवून रडतेय. वडिलांनी अश्रू कसेबसे थोपविलेले पण डोळ्यांत प्रचंड वेदना. तिच्या  डोळ्यांतील सारी प्रश्नचिन्हे वडिलांना समजत होती.
“होय बेटा, नियतीने फार क्रूरपणे घाव घातलाय. जीवन की पाय एवढाच पर्याय आपल्यासमोर आहे. नाईलाज आहे गं, नाईलाज आहे. फॉर्मवर सही करुनच आलोय. उद्या ऑपरेशन आहे”…………..
ऐकताच आईचा हात अधिकच घट्ट पकडला गेला नि खळकन्अश्रू पाझरले. चेहऱ्यावर प्रचंड वेदना. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. वडील डोक्यावर थोपटू लागले. थोड्याच वेळात नर्सने तिचा ताबा घेतला पण आई बाबा मात्र रात्रभर झोपून शकले नाहीत. तिच्या जन्मापासूनचे सारे प्रसंग, आठवणींनी त्यांच्याभोवती फेरच धरला होता.

साऱ्याच आई-वडिलांनी मुलांच्या बालपणीच्या आठवणी हृदयात जपून ठेवलेल्या असतात. त्यांनाही आठवू लागले…. दोन-अडीच वर्षांची असेल पण कुठेही नाच पाहिला की त्याची नक्कल करायचा प्रयत्न करायची. हळूहळू सर्वांच्याच लक्षात येऊ लागले आणि एवढीशी सोनुली, नाच… असे सांगितले की पाय थिरकायचे प्रयत्न करून सर्वांचे मन जिंकून घेऊ लागली.

तिची उपजत आवड पाहून आई-बाबांनी रीतसर क्लासची चौकशी करून, प्रत्यक्ष भेट घेतली आणि तीन-साडेतीन वर्षांच्या वयातच ती नृत्य वर्गासाठी जाऊ लागली. उपजत आवडीमुळे ती सहजपणे नृत्यकला आत्मसात करू लागली. शाळेत जायला लागल्यावर शाळा सुटल्यावर नृत्यवर्ग ! रात्री साडेनऊ वाजायचे परत यायला, पण रक्तातच नृत्य असल्यामुळे ती कधीच थकली नाही. शालेय जीवनातच तिने अनेक कार्यक्रमात भाग घेतला,इतकेच नव्हे तर कितीतरी वैयक्तिक कार्यक्रम  (stage shows) सादर केले. नृत्य सांभाळून तिने दहावीच्या परीक्षेत ८०% गुण प्राप्त केले पण इतर मैत्रिणींप्रमाणे सायन्स साठी प्रवेश न घेता आर्टस् निवडले कारण नृत्य हेच तिचे सर्वस्व होते. कॉलेज जीवन सुरू झाले.

अनेक स्वप्ने, विविध स्पर्धा खुणावत असताना ती काळरात्र आली. आई-वडिलांबरोबर त्रिचीहून बसने प्रवास करीत असताना, अचानक कर्कश्य ब्रेकचा आवाज घुमला, अन् बसला मोठाच अपघात झाला. प्रचंड हल्ल कल्लोळ! क्षणापूर्वी शांतपणे आपापल्या जागी बसलेले लोक प्रचंड वेदनांनी विव्हळत होते. माणसे जमली. छोटेसे हॉस्पिटल, रात्रीची वेळ, बेताचा स्टाफ ! तरीही न डगमगता अचानक आलेल्या संकटावर मात करीत सर्वांना  भराभर उपचार करू लागला. अर्थात जास्त प्रमाणात जखमी झालेल्यांवर डॉक्टर्स प्रथम उपचार करू लागले. बाकी स्टाफ इतरांकडे धावत होता.

इतरांच्या मानाने तिला कमी प्रमाणात जखमा झाल्या होत्या. तिच्यावर शिकाऊ डॉक्टर्स उपचार करीत होते. ते छोटेसे हॉस्पिटल कधी नव्हे ते इतक्या जखमी लोकांनी भरून गेले होते. त्यांना भरभर उपचार करताना, तिच्या उजव्या पायाच्या घोट्याला गेलेली चीर कदाचित त्यांच्या लक्षात आली नाही, त्यामुळे रक्ताळलेला घोटा स्वच्छ करून बँडेजने बांधून ते पुढच्या जखमी व्यक्तीकडे वळले. अपघाताच्या गांभीर्याची दखल घेऊन नंतर जखमींना मद्रास (आताचे चेन्नई) येथील विजया हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, त्यात तीही होती. इथे स्टाफ पुरेसा होता, तत्पर होता पण दुर्दैवाने तोपर्यंत तिच्या पायाची अवस्था फार वाईट झाली होती व सर्व तपासण्याअंती डॉक्टरांनी सांगितले की, त्यात झाले आहे आणि निष्कर्ष एकच निघाला, गँगरिन अधिक पसरण्याआधी पाय कापावा !

अंगावर वीज कोसळणे म्हणजे काय,याचा अनुभव तिच्या आई-वडिलांनी घेतला. नृत्य ही एकमेव आवड असलेल्या तिचा पाय कापायचा ? डॉक्टर म्हणाले,  जगायला हवे तर पाय कापायलाच हवा, पण पाय कापल्यावर तिचे जीवन उरेल तरी का ? तिला याची अजून पुसटशी कल्पनाही नव्हती आणि कोणत्या तोंडाने सांगायचे तिला? पण जगायचे तर………… हृदयावर दगड ठेवूनच दोघे गेले तिच्यापाशी.

रात्रभर सुन्न मनाने बसलेले दोघेजण आता ऑपरेशन थिएटरबाहेर आले काय विचार करत असेल पोरगी नि कसे सहन करील ? विचार, विचार फक्त असह्य विचार.

शुद्धीवर आल्या पासून एकच विचार, हे काय झाले? मलाच का? जिवंत राहून मी काय करू? पण आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील सततच्या वेदनांनी ती सजग झाली.”मी येईन यातून बाहेर”… हा विचार प्रबळ झाला आणि नर्स, डॉक्टर्स, फिजिओथेरपिस्ट  यांच्याशी बोलून, सारे काही नीट समजावून घेत हळूहळू हालचाल सुरु केली. कितीतरी दिवस लागले नुसते पडल्या पडल्या हालचाल करायला परंतु नेटाने प्रयत्न करीत काही महिन्यात ती उभी राहिलीच. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जयपूर फूटची मदत घेतली आणि चालण्याचा प्रयत्न करू लागली.

चार महिने लागले तिला नुसते सरळ चालण्यासाठी. त्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन अभ्यासही सुरू केला. जयपूर फूट आणि फिजिओथेरपी यांच्या सहाय्याने अडीच वर्षे चालण्याचा, साध्यासुध्या हालचाली करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सहजता आली. जयपूर फूट शरीराचाच एक भाग झाला नि आत्मविश्वास वाढला. लोक यायचे, सहानुभूती दाखवायचे, “किती वाईट, आता तू पुन्हा नृत्य करू शकणार नाहीस”!, वगैरे, वगैरे.

पण तिला नृत्याची जबरदस्त ओढ स्वस्थ बसून देत नव्हती. एकच जाणीव…… नृत्य हा माझा श्वास आहे. दुःख, राग, असहाय्यता……. साऱ्यांमधून मीच वाट काढायला हवी. सतत विचार करून हे मनावर घेतले आणि एकदा नृत्याची स्टेप करून पाहिली. प्रचंड वेदना झाल्या, पण पुन्हा पुन्हा प्रयत्नाने जमले तेव्हा तितकाच आनंदही झाला. खरोखरीच मोठा संघर्ष होता पण मनाने पक्के ठरविल्यावर शरीर साथ देऊ लागले आणि एके दिवशी ती वडिलांकडे गेली नि म्हणाली ,”अण्णा, मी पुन्हा नृत्य सादर करू शकते”. आश्चर्याचा धक्का बसलेले वडील अतिशय आनंदित झाले आणि एका रविवारी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये तिचा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्यादिवशी च्या पेपरची हेडलाईन होती, “Loses a Foot, Walks a mile“,
आणि कार्यक्रमाची सर्व तिकिटे विकल्या गेल्याची बातमी आली. स्टेजवर जातांना तिला खूपच दडपण जाणवले, ते ओळखून तिची आजी म्हणाली,
“घाबरू नको. देव तुझ्याबरोबर आहे, यशस्वी होशील” .
त्यावेळी खूप राग येऊन ती म्हणाली , “मला नाही वाटत तसे. देव माझ्या बरोबर असता तर त्याने माझ्यावर ही वेळ येऊच दिले नसती.”

स्टेज वर गेल्यावर मात्र ती सारे काही विसरली व अतिशय सहजपणे वरन्यम सादर केले आणि भारावून गेलेला प्रेक्षक वर्ग Standing Ovation देत  पुन्हा पुन्हा म्हणत होता,
“सुधा , सुधा, सुधा” !!
होय, नंतर साऱ्या जगभर प्रसिद्ध झालेली जिद्दी नृत्यांगना सुधा चंद्रनचीच गोष्ट मी सांगतेय. अथक प्रयत्नांनी प्राप्त झालेल्या यशामुळे आनंदाच्या लहरींवर आई-बाबांबरोबर सुधा घरी गेली. बाबा तिच्या जवळ गेले नि तिच्या पायाला स्पर्श करून म्हणाले, “मी देवी सरस्वतीच्या पाया पडत आहे. अगं, तू अशक्य ते शक्य करून दाखविलेस.”
अत्यंत हृदय स्पर्शी असा हा क्षण ! पुढच्या क्षणी ती वडिलांच्या गळ्यात पडली. तिघांचेही डोळे या क्षणी पाणावले, पण आनंदाश्रूंनी !!

या पहिल्या stage show  नंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. १९८१ मध्ये अपघात, पायच गमाविणे आणि १९८४ मध्ये जिद्दीने पुन्हा नृत्याला सुरुवात! खरोखरच कौतुकास्पद.

त्याच वर्षी  तिच्यावर तेलुगु भाषेत मयूरी हा चित्रपट प्रदर्शित झाला. नंतर तमिळ व मल्याळम मध्ये तो डब झाला व १८८६ मध्ये त्याचा हिंदी रिमेक  “नाचे मयूरी“  (शेखर सुमन, अरुणा इराणी  व दिना पाठक  या सहकलाकारांबरोबर) प्रदर्शित झाला. दोन्हीमध्ये तिची भूमिका तिनेच केली होती. मयूरीतील  भूमिकेसाठी तिला National Film Awards मध्ये Special Jury Award  प्राप्त झाले.

१९९४ मधील “अंजाम” (शाहरूख खान, माधुरी दिक्षित यांबरोबर) मधील तिच्या भूमिकेपासून ती सिनेमा जगतात प्रसिद्धीच्या झोतात आली. नृत्याचे कार्यक्रम सादर करीत तिने तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि हिंदी सिनेमात विविध भूमिका  सादर केल्या.

सप्टेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला  Sammy square (तमिळ) व  krishna (हिंदी) या  दोन सिनेमात तिच्या भूमिका आहेत. एकता कपूरच्या “कही किसी रोज” या मालिकेतील  रमोलाच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली. भारतीय टेलिव्हिजन जगतात ती अतिशय उत्तम कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे. खलनायिकेची भूमिकाही इतकी उत्तम करते की लोक त्या पात्राचा प्रचंड तिरस्कार करतात. तितकीच सज्जन  पात्राची ही भूमिका अशी करते की लोक त्यास नावाजतात.

एकीकडे शिक्षण पुरे करत, ती मिठीबाई कॉलेज, मुंबई मधून B .A. उत्तीर्ण झालीच, परंतु इकॉनॉमिक्समध्ये M.A. ही  पदव्युत्तर पदवी संपादित केली. त्याच सुमारास तिने भारतातील विविध राज्य, सौदी अरेबिया, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, कतार, कुवेत, बहरिन  इत्यादी अनेक देशात  नृत्याचे कार्यक्रम सादर केले. Invertis University, बरेलीने तिला डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले.
१९९४ मध्ये असिस्टंट डायरेक्टर रवी डांग यांच्याशी विवाह करून उत्तम रित्या वैवाहिक जीवन जगणाऱ्या सुधा चंद्रन फक्त भरतनाट्यम सादर करणाऱ्या  कलाकार म्हणून प्रसिद्ध नसून बॉलिवूड फिल्म व टीव्ही कलाकार, आत्मविश्वास देणारी कुशल वक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची कथा शालेय पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. उल्लेखनीय… नागिन मधील भूमिकेसाठी २०१७ मध्ये मिळालेले  Colors Golden Petal Award for Best Actor in a comic role! अजूनही  स्टेज परफॉर्मन्स देणाऱ्या सुधा चंद्रन मुंबई येथे  “नाचे मयूरी सुधा चंद्रन डान्स ॲकॅडमी” ही संस्था यशस्वीरित्या चालवितात. शेकडो विद्यार्थी येथे नृत्य शिक्षण घेत आहेत.
“स्वप्ने पहा आणि कितीही मोठी समस्या उभी ठाकली, अगदी विकलांग झालात तरी जिद्दीने उभे राहून ती पुरी करा” हे स्वतःच्या अलौकिक उदाहरणावरून सांगणाऱ्या सुधा चंद्रन  यांस शतशः प्रणाम !

नीला बर्वे

– लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी