शंकर काशिनाथ गर्गे उर्फ नाट्यछटाकार दिवाकर याची आज जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा वेध. नाट्यछटाकार दिवाकर यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
लेखक, नाटककार शंकर काशिनाथ गर्गे उर्फ नाट्यछटाकार दिवाकर यांचा जन्म पुणे येथे १८ जानेवारी १८८९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे हे दुसरे अपत्य. ते अडीच वर्षाचे असतांना त्यांना आजीस दत्तक देण्यात आले. हे दत्तक विधान नाममात्र होते. आपल्या लहानपणी झालेल्या दत्तक विधानाबद्दल दिवाकरांनी मोठेपणी नाखुषी व्यक्त केली होती.
शंकर काशिनाथ गर्गे हे दिवाकरांचे दत्तक घराण्याचे नाव होते. पुढे त्यांनी त्यांचे सर्व लिखाण दिवाकर या टोपण नावाने केले व त्याच नावाने ते सुप्रसिद्ध झाले.
दिवाकर यांचे शिक्षण पुणे येथील नूतन मराठी विद्यालयात झाले. ते शाळेतील शालान्त परीक्षा “स्कूल फायनल” १९०८ मध्ये उत्तीर्ण झाले. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. २४ जून १९१० रोजी कोल्हापूर च्या श्री विष्णू नरसिंह पाठक यांची कन्या सखू या मुलीशी दिवाकरांचा विवाह झाला. त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना नोकरीत स्थिरता लाभली नाही. त्यांनी पुणे येथील नूतन विद्यालयात शिक्षक म्हणून दीर्घकाळ नोकरी केली. त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते.
दिवाकरांनी इंग्रजी लेखकांच्या साहित्याचे वाचन खुप केले. त्यातूनच त्यांना लेखनाची प्रेरणा मिळाली. रंगेल रंगराव, पंडित विद्याधर, कारकून इत्यादी नाटके त्यांनी लिहिली. १९१३ साली त्यानी “शोकांत” हा नाटयाचा नवीन प्रकार विकसित केला. ब्राऊनींगच्या “ड्राम्याटिक मोनोलॉग” या लेखन प्रकारावरून त्यांनी नवीन लेखन प्रकार विकसित केला. दिवाकर यांचे मित्र वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी ह्या लेखन प्रकाराला “नाट्यछटा” हे नाव दिले.
दैनिक केसरी तसेच करमणूक, रत्नाकर ह्या मासिकातून दिवाकर यांचे साहित्य प्रकाशित होत असे. दिवाकरांच्या ५१ नाट्यछटांचा संग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशन तर्फे “दिवाकरांच्या नाट्यछटा” या नावाने प्रसिद्ध झाले .हे ११२ पानी पुस्तक १९३३ साली प्रकाशित झाले. त्याला प्रा .रा .क्रू. लागू यांनी प्रस्तावना लिहिली असून विजय तेंडुलकर यांनी नाट्यछटांचे रसग्रहण केले आहे.
दिवाकरांचे एकूण लेखन “संपूर्ण दिवाकर” या नावाने १९३३ साली प्रकाशित झाले. दिवाकर यांचे १ ऑक्टोबर १९३१ रोजी निधन झाले.
“नाट्यछटा”
नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे पण दुसऱ्या एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे, असा देखावा आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पध्दत. नाट्यछटा म्हणजे कमीत कमी शब्दांत एखाद्या प्रासंगिक वर्णनातून अधिक व्यापक सूत्र समोर मांडणारा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे . पूर्वी
“नेपथ्यपाठ” हा अशाच तर्हेचा साहित्य प्रकार थोड्या प्रमाणांत वापरला जात होता. परंतु दिवाकरांच्या “नाट्यछटेने” त्याची जागा घेतली .वाचकांनी “नेपथ्यपाठ” ह्या साहित्य प्रकाराकडे पाठ फिरवली.
दिवाकरांच्या हयातीत आणि त्यानंतर दहा पंधरा वर्ष नाट्यछटा या साहित्य प्रकाराला बहर आला होता. धनंजय, गोमागणेश (ग .कृ. फाटक), कटकटकर, वि. स .गोगटे, सी. ल. देवधर, कमतनूरकर इत्यादी लेखकांनी नाट्यछटा लेखनाचा प्रयत्न केला .परंतु वाचकांना दिवाकरांच्या तुलनेत इतर लेखकांच्या नाट्यछटाना वाचक मान्यता मिळाली नाही .मराठी नाट्यछटेचे इतर भाषिक वाचकांनी स्वागत केले नाही . वि. स .गोगटे यांनी त्यांच्या मराठी नाटयछटांचे गुजराती व हिंदी मध्ये भाषांतर केले परंतु त्या भाषिक वाचकांनी त्या साहित्य प्रकाराला स्विकारले नाही . कालांतराने नाट्यछटा लेखनाचे प्रमाण इतके कमी झाले की हा साहित्य प्रकाराकडे “नेपथ्यपाठ” प्रमाणे वाचक पाठ फिरवतात की काय ? असे वाटू लागले.
पुण्याच्या नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वतीने १९९२ पासून दिवाकर यांच्या स्मृती निमित ” नाट्यछटा” लेखन स्पर्धा आयोजित करून लेखकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे . तसेच नाट्यछटा कशी लिहायची यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यास येत आहेत . १३ वर्षानंतर म्हणजे १८ जानेवारी २०३९ साली दिवाकर यांची १५० वी जयंती तर ६ वर्षानंतर म्हणजे २०३१ साली दिवाकर यांची १०० वी पुण्यतिथी आहे . वाचकांनी, लेखकांनी ” नाटयसंस्कार कला अकादमीला ” सहकार्य केले तर ” नाट्यछटा ” ह्या साहित्य प्रकाराला बहर येईल .संस्थेने सध्या उपलब्ध असलेल्या सर्व लेखकांच्या नाट्यछटा एकत्र करून त्यांचे विविध भाषेत भाषांतर करण्याची स्पर्धा आयोजित करून इतर भाषिकांचे सुध्दा लक्ष वेधून घ्यावे ही नम्र विनंती.
— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत- रायगड
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800