ती होतीच तशी .. सगळयांपेक्षा वेगळी.. गोरी, शेलाटी, लांब केसांची अन नकटी.. खरं तर नकटी नव्हती पण मी तिला म्हणायचो नकटी.. उगाच..!
कधी कशी सुरुवात झाली आठवत नाही पण मला आवडू लागली होती.. अगदी जवळचे मित्र सोडले तर कुणालाच माहित नव्हते. शपथ दिलेली मी कुणाला सांगू नका म्हणून.. आता हसू येतंय अशा बालिशपणाचं…
शपथ म्हणजे ठाम विश्वास.. घट्ट बांधलेली गाठ कधीही न सुटणारी .. जीव गेला तरी न तुटणारी..
दिवस पलटत होते तसे आमचे प्रेमही बहरत होतं.. महाविद्यालयाचे नावीन्य संपताच नोकरी सोबत लग्नाचेही वेध लागले .. तेही दोघांच्या घरातल्यांना.. कारण आमच्या प्रेमाची गोष्ट घरात माहित होती.. त्यांनाही काही अडचण नव्हती.
जीवनाची गाडी रुळावर धावतेय असे वाटत असतानाच ते अघटित घडले.. हो ना ! काळाला काही गोष्टी मान्य नसतात.. खरचं ? खरचं काळाला काही गोष्टी मान्य नसतात की आजही माझं मन कचरतंय.. सत्य कबूल करायला.. हो ! शेवटी पुरुषी अहंकार.. जो तेव्हाही आड आला नि आज ही येतोय..
नोकरीनंतर घरात लग्नाची बोलणी सुरु झाली .. पण त्याने संशयाचे बीज माझ्या मनात पेरले.. जो माझा चांगला मित्र होता.. का ? तर त्यालाही ती आवडत होती..पण ही गोष्ट स्पष्ट होण्याआधीच वेळ निघून गेली होती.. संशयाचा वृक्ष चांगलाच फोफावला होता .
काय म्हणाला ? आज कशी आठवण आली ? काय सांगू..
आज सकासकाळी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली.. एक तपस्वीनी अनंतात विलीन झाली.
तिला खात्री होती मी तिच्यावर विश्वास ठेवेन.. पण मीच अव्हेरल्यावर ती जीवन संपवायला गेलेली .. एका सद्गृहस्थाने वाचवले नि तेव्हापासून तिची जीवनाची दिशा बदलली.
मी माझ्या संसाराची चिंता वाहत होतो अन ती अवघ्या विश्वाची चिंता वाहत होती.. समाजसेविका बनून.. संपूर्ण जीवन वाहून घेतले होते तीने.. दीन दुबळ्याच्या सेवेसाठी.
हो !हो !! तिनेच ! माझ्या नकटीने.
माझी ? मला हक्क आहे तिला माझी म्हणायची ? माझी होती.. पण मी तिचा होऊ शकलो नाही.. अविश्वास दाखवून आजन्म साथ राहण्याची तिला दिलेली शपथ मीच मोडली.
माझ्या चुकीचे ओझे वाहता वाहता मी खरचं थकलोय.. मला कबूल करायलाच हवयं.. पण.. पण आता काही काही उपयोग नाही..
उशीरा का होईना एक गोष्ट मात्र पटली.. जे काही असेल ते माणूस असेपर्यंतच. तो का एकदा गेला की कशा कशाचाही उपयोग नसतो.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800