पाच हजार वर्षापूर्वीचे आयुर्वेदातील नाडीशास्त्र आणि संगणकीय सूक्ष्म संवेदनविज्ञान (सेंसॉर टेक्नॉलॉजी) यांची सांगड घालून वैद्यक क्षेत्रात प्रत्यक्ष रुग्ण, वैद्य, डॉक्टर आणि स्वत:च्या प्रकृती विशेष काळजी घेणारे लोक यांना उपयुक्त असे उपकरण तयार करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंट मिळालेल्या ‘नाडी तरंगिणी’ या उपकरणाचा दि.15 जानेवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील ‘नॅशनल स्टार्ट-अप अवॉर्डीज’ मध्ये समावेश आहे. या ‘नाडी तरंगिणी’ मुळे देशात वैद्यक संबंंधित ‘जी 5’ लाही आरंभ होत आहे.
स्टार्ट-अप म्हणजे स्वत:च्या कल्पकतेने आणि संशोधनाने देशाच्या व्यावसायिक क्षेत्रात भर घालण्याची क्षमता असलेला प्राथमिक उद्योग. गेल्या वर्षीपासून अशा उद्योगशील तरुणांना राष्ट्रीय पातळीवरील सन्मान देण्यास प्रारंभ झाला आहे.
यावर्षी 46 जणांना हे पारितोषिक मिळाले आहे.
‘नाडी तरंगिणी’ चे संशोधक व निर्माते पुण्यातील डॉ अनिरुद्ध ज्येष्ठराज जोशी यांनी सांगितले की, या उपकरणाद्वारे एक लाख तीस हजार लोकांची नाडी तपासली आहे. जगातील बारा देशातील पाचशे डॉक्टर्सनी त्याचा वापर केला आहे.

‘ऑटो कार’ हा त्यातील पहिला टप्पा असेल. याचा वैद्यकाशी संबंध असा वाटतो की, चरक, वाग्भट, सुश्रुत, पतंजली यांनी यातील मूलभूत सिद्धांताची एवढी अचूक रचना केली आहे की. ते त्या ज्ञानाला फाईव्ह-जी तंत्रज्ञानच प्रत्यक्षात आणेल. ‘नाडी तरंगिणी’ ची अनेक उपकरणे तयार होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
‘तुरीय’ या उपकरणाबाबत डॉ जोशी म्हणतात, अलिकडच्या काळात पॅथॉलॉजीच्या विविध उपकरणाप्रमाणेच हे उपकरण असून ते डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट यांना तर उपयोगी पडतेच पण त्यांनी तयार केलेल्या ‘तुरीय’ या उपकरणाचा घरोघरी आपापली प्रकृती रोजच्या रोज ठीक ठेवण्यासाठी सल्ला देणारीही ठरू शकते. त्यातील परिभाषा ही आयुर्वेदातील त्रिदोषसिद्धांत (वात, पित्त, कफ) याच्या आधारे व्यक्त होते आणि सामान्य माणसाच्या शरीरातील त्रास समजायला सुलभ म्हणजे सोपीही असते. आपले शरीरातील दोष कमी करून आहार, विहार आणि व्यायाम (योगाभ्यास) यांचाही सल्ला त्यात असतो.
‘तुरीय‘ हे उपकरण हे त्या त्या व्यक्तीची नाडी तर घेतेच पण त्याच बरोबर भौगोलिक व ऋतुचर्येनुसार होणारे बदल यांचीही माहिती देते. कोणत्याही घरातील सर्व मंडळींच्या प्रकृतीतील छोटे छोटे फरकही आणि त्यानुसार सल्ले ‘तुरीय’ हे उपकरण देत राहाते. कोणतीही आयुर्वेदीय परीक्षा ही रुग्णाचे दिसणे, स्पर्श आणि प्रश्र्न यावर आधारित असते. या बाबींचाही ‘तुरीय’ या उपकरणात वापर केला आहे.
यातील ‘नाडी तरंगिणी’ ची व्याप्ती मोठी आहे. त्याची ती प्रामुख्याने डॉक्टर आणि वैद्य मंडळीसाठी आहे. त्याची परिभाषा आयुर्वेदीय आणि संस्कृतवर आधारित असली तरी ऍलोपॅथी डॉक्टर्सही त्याचा अर्थ समजू शकतात. त्यामध्ये कफ, पित्त व वात या मार्गदर्शक घटकाच्या आधारे शरीरातील विविध प्रक्रियांचे गतिमान ग्राफ दाखविण्यात आले आहेत. त्या प्रक्रियांबाबत आयुर्वेद ग्रंथातील श्लोकही उद्धृत केले असल्याने तज्ञ वैद्यांनाही तो विषय समजण्यास सोपा होतो. त्यात आयुर्वेद पद्धतीने चिकित्सा केली जाते आणि वैद्य वर्गाबरोबर डॉक्टरांनाही ती चिकित्सा समजू शकेल, अशी सुलभता त्यात आणली आहे.
नाडी तरंगिणी हे उपकरण डॉक्टर आणि वैद्य मंडळींना यातील सल्ला नाडी परीक्षेतील ग्राफ या स्वरुपात असतो व त्याच्या आधारे त्यांना सुलभपणे चिकित्सा करता येते.
यावर्षी स्टार्टअप पुरस्कारासाठी 2177 अर्ज आले होते. त्यातील 46 तरुणांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा सन्मान दि.16 जानेवारी रोजी जाहीर झाला आणि यापुढे दरवर्षी दि.16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्टअप डे’ म्हणून पाळण्यात येईल, असेही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.
या पुरस्कारधारकांना विविध प्रकारचे सहकार्य मिळू शकणार आहे. त्यात गुंतवणूक स्वीकारण्यास सहकार्य, मार्गदर्शन, शासकीय व्यवहारात शक्य त्या ठिकाणी प्रवेश, क्षमता विकास, अधिकाधिक ठिकाणी प्रदर्शनास मान्यता आणि बहुराष्ट्रीय मोठ्या कंपन्यांशी करार क्षमता यांचा त्यात समावेश आहे.
– लेखन : मोरेश्वर जोशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
छान माहिती