नातं.. आयुष्याच्या वेलीवर आलेले सुंदर फुल…
जीवनात आपण अनेक नाती निभवतो. आपण समाजात राहतो. आणि परस्परांशी आपले एक नातं असते.
मुळात एका देशाचे दुसऱ्या देशाशी असलेले नाते. त्यांचे संबंध, विश्वबंधुत्व जपणारे नाते राज्याराज्यचे नाते संबंध. मग गावगाडे येते त्यांचे संबंध. पशू पक्षाशी असलेले नाते. मग मित्र, नातलग, ह्यांचे नातेबंध. त्याही पुढे परमेश्वराशी असलेले आपले नाते. ते अनुबंध फार वेगळे. आपण नात्यानं वेढलो गेलो असतो.
आई मुलाचे, मुलीचे प्रेमळ नातं, बहिण भावाच्या नात्याची सुंदर विण तर फार मनोरम असते. वडील आणि लेक, ह्यांचे भाव मधुर नाते किती सुंदर असते हे आपण अनुभवलं आहे. पती पत्नीच्या नात्याचे मधुर क्षण आपण उपभोगले असतात.

प्रियकर प्रेयसीच्या नात्यातील गोडवा, लटका रुसवा आपण बघतो. पुढे सासूसून, दिरजावा, सासू सासरे, मामा, काकाकाकु मावशी, आजी आजोबा अशी अनेक नाती आपण अनुभवतो. त्या प्रेमाची अनुभूती घेतो. प्रेमाचा गोडवा चाखतो. कधी दुरावा, कधी अबोला तर कधी हेवेदावे ही आपल्या वाटेला येतात.
सुखा सोबत दुःख, प्रेमा सोबत वेदना आनंदा सोबत अवहेलना आपण झेलत असतो.
विचार, विकार आणि अहंकार ह्याच्या फेऱ्यात कधी कधी माणूस फसतो आणि दुःख वाट्याला येते.
कधी कधी पैसा, पद, प्राप्ती, पदोनती, माणसाला नात्या पासून दूर नेते. मग फलश्रूती केवळ दुःख.

म्हणून माणूस आणि परमेश्वराचे नाते फार उत्कट आहे. सुखदायी आहे. नामस्मरण माणसाला नवी ऊर्जा देते.
पुस्तक व माणसाचे नाते तर माणसाला वाचवते. जगायला आधार देते..
पशू ही आपले नाते जपतात. चिमणी पिलाला भरवते. नाते जपते. गाई आपले पोट भरले तरी कळपातील गाई चे पोट भरल्या शिवाय जंगल सोडत नाहीत. आपण नाते जगत असतो, जगवत असतो. म्हणून आपण सुखदुःखात नात्याची भागीदारी निभावत असतो.
जीवनाची नाव नात्याच्या जळात तरंगत असते. बरेचदा नात्यातील भेदभाव खूप मोठे तांडव घडवतात. लोभ, मोह, माया, मद, वासना, ह्यात माणूस अडकतो आणि कधी कधी हे दुष्टचक्र फार भयंकर रूप धारण करते. ह्यातून कधी खून, चोरी, बलात्कार अश्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडतात. माई मधील मंथरा नकळत जागृत होते. कलह आणि काली, ह्यानी ममतेची जागा पुसून टाकली जाते.

कधी कधी स्त्रीच स्त्री ची शत्रू बनते. आणि मानवतेला काळीमा फासते. माया, प्रेम, ममता कुठे हरवते कळत नाही.
सर्वधिक स्पर्धा, हाव, हव्यास, अपेक्षा ह्या कमी करायला हवे. जसजसे आपण पाश्चात्यकरण करतो आहे, वाढती स्पर्धा, येणारा खूप पैसां आपल्या सोबत नात्यातील गोडवा, प्रेम घालवतो आहे. व्यसन, असमाधान वाढत जात आहे. आज पुन्हा ज्ञानेश्र्वर आणि त्यांचे पसायदान हवे. जुने तेच सोने ही जाणीव होत आहे.
साधे भोळे निरागस जीवन पुन्हा यावे. मनमाती मधील दुरावा कटुता सरावी. सत विचाराच्या नात्याचे कोंब पुन्हा फुलावेत.
या धरतीवर आनंदमय विश्वबंधुता नांदावी. जग एक सुत्रतेत गुंफले जावे. म्हणजे सारी अराजकता, दुष्टता, क्रूरता सरेल.

उठवते खेळातून
आपलीच ओलीसुकी
सगळ्याच मुली आपल्या
असतात सूना लेकी.
एक असते माय
त्यातली दुधाची साय
लेकीस हात देता
नको सूनेस अपाय
लेक मायेचे मंदिर
सून मायेस अधीर
तिला जपा पदरात
मग उजाडेल रात.
सून लेक जपा दोन्ही
जसे तळव्यातले पाणी
दोन दिवे दोन वाती
सूना लेकीची कहाणी.

— लेखन : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800