फार पूर्वी म्हणण्यापेक्षा आपल्याच लहानपणी आपण रोज आपल्या मित्र मैत्रिणींना भेटत असू. मस्त गप्पा गोष्टी, दंगा मस्ती ही करत असू. सुख दुःखही सहज व्यक्त होत असे. त्यामुळे मनावर कोणतेही दडपण नसे. मस्त आयुष्य होते ते.
मात्र आज …….? कामाचे व्याप इतके वाढले आहेत की मनुष्याला स्वतःसाठी देखील वेळ नाही ! पद, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यात तो एवढा गुरफटला आहे की स्वतःनेच निर्माण केलेल्या या आभासी दुनियेत जणू हरवून गेला आहे. या चक्रव्यूहात फसला आहे, अडकला आहे.
आपले कुटुंब, मित्र मैत्रिणी अथवा नातेवाईक यांच्यापासून माणूस खूप दूर चालला आहे. स्वतःच्या धुंदीत, स्वतःच्याच विश्वात तो एकटा पडत चालला आहे. पण त्याला याची जराही जाणीव नाही. त्याला कोणाशी बोलायला अथवा भेटायलाही वेळ नाही.
खरे तर ही सर्व आभासी दुनिया आहे कारण आपण हे सर्व येथेच ठेवून जाणार आहोत. सोबत देणारीं, आपली ही जोडलेली माणसं, आपली नाती गोती, आपला मित्र परिवार त्या भेटी, त्या अविस्मरणीय आठवणी शेवटच्या क्षणी आपल्या बरोबर असणार आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
आजकाल निरपेक्ष भेट दुर्लभ होत चालली आहे. पण हे कुठे तरी थांबले पाहिजे. खरे समाधान खरा, आनंद हा आपल्या माणसांशी बोलण्यात भेटण्यात आहे. जगण्यातील जिवंतपणा म्हणजे ही आपली माणसं आहेत.
आपण काम केलेच पाहिजे. आपल्या जबाबदाऱ्या चोख निभावण्यासाठी पैसा लागतो हे सर्व मान्य आहे पण किती व कोठे थांबले पाहिजे ? हे कळायला फार उशीर होऊ नये इतकेच ! नाहीतर वेळ निघून जाईल मग मात्र पश्चाताप करण्याची वेळ येईल ! आपल्या माणसांना न भेटल्याची खंत अस्वस्थ करेल.
सण, समारंभ, लग्न, वाढदिवस या निमित्ताने भेटी होत असतात. हाच तर कार्यक्रमांचा प्रमुख उद्देश असतो. मात्र आजकाल हेही कमी होत आहे. त्यात आणखी कोरोनाची भर पडली आहे !
साधा फोन करून, “तू कसा आहेस ? काळजी करू नको मी आहे ना” हे ही बोलायला अनेकांकडे वेळ नाही. मनुष्य भावनाहिन होत चालला आहे. खूपच प्रॅक्टिकल विचार करत आहे. स्वतःपुरता स्वार्थी, फायदा पहाणारा होत चालला आहे.
हे खूप घातक आहे. याचे परिणाम ही खूप वाईट आहेत. यामुळे मनुष्य अनेक मानसिक आजारांना बळी पडत आहे कारण आपल्या मनातील गोष्टी सांगायला त्याला कोणीही नाही. याला कारणीभूत तो स्वतःच आहे.
आज एकमेकांच्या सुख दुःखात जायलाही वेळ नाही. आज भेटू, उद्या भेटू करत तो मनुष्य खूप दूर गेलेला असेल कारण जीवनाची काहीच शाश्वती नाही. म्हणजे आपली दशा अशी झाली की कळतंय पण वळत नाही.
तसे पाहिले तर कोण कधी केव्हा भेटेल हे कोणीही सांगू शकत नाही. अनोळखी म्हणता म्हणता ती कधी आपले होऊन जातात हे ही कळत नाही. रक्ताच्या पलीकडची ही नाती म्हणजे प्रमेश्वराने दिलेली सुंदर भेट आहे.
काही गोष्टी विधिलिखित असतात. जणू तीच परमेश्वराची इच्छा असेल. नाहीतर तुम्ही सांगा ना, एवढ्या लाखो करोडो लोकांमध्ये अमुकच एका व्यक्तीची भेट होते व ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते हे बहुदा विधिलिखित असेल नाही का ….?
काही लोकांशी भेटल्यावर आनंद द्विगुणित होतो. समाधान वाटते. जणू काही पूर्व जन्मीचे ऋणानुबंध असावे.
काही लोकांच्या भेटीमुळे जीवनाचा अर्थ बदलून जातो. जगण्यात जिवंतपणा येतो. आयुष्य पुन्हा सुंदर वाटू लागते. अशा लोकांना बोलण्यामुळे भेटल्यामुळे मनावरचा ताण कमी होतो.
रोजच भेटले पाहिजे असेही काही नाही. अगदी प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणार असत…
पैश्यांची श्रीमंती अनेकांकडे असते. पण मनाची श्रीमंती फार कमी पहायला मिळते. जीवनाच्या वाटेवर अशी माणसं भेटली की ती जपा. त्यांची मनं सांभाळा. त्यांची काळजी घ्या. बोलून व भेटून ही नात्यांची वीण घट्ट केली पाहिजे.
जी नाती तयार होतात ती जीवापाड जपली पाहिजेत. आपल्या जगण्याला ज्या प्राणवायुची गरज असते तो प्राणवायु म्हणजे आपली माणसं. नाही का ?

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
Meaningful & true
ए दुनिया एक नाटक है,
ऊस नाटकमें हम सब काम करते है,
परदा गिरते ही हम सब को सलाम करते है…
वक्त रहतेही रिस्ते निभाना सीखो…
खूप छान लेख आणि त्यातून दिलेला संदेश…
धन्यवाद सौ.हेडे मॅडम