“त्रिकोण”
आमच्या घराशेजारीच एक शाळा आहे. शाळेची घंटा, वर्गातले बोलणे, मुलांचे पाढे असं दिवसभर काही न काही ऐकू येत असतं. फार मजा येते ऐकायला. असच एकदा बाई वर्गात त्रिकोण म्हणजे काय ते शिकवत होत्या.
त्रिकोणास तीन बाजू, तीन कोन वगैरे.
त्रिकोण म्हटला की तो निरोधचाच त्रिकोण लक्षात येतो. न कळत्या वयात त्यातलं काही कळत नव्हतं पण शाळेत शिकवल्या प्रमाणे त्रिकोण तेवढा लक्षात असे.
ती त्यावेळची गरज असेल कदाचित पण आजकाल शिकल्यासवरल्या माणसांचा कल मात्र पार बदलत चाललाय. आपण दोघं आणि एकच मुल किंवा नाहीच. कदाचित मुलाच्या जागी एखादा पाळीव प्राणी इतकाच काय तो त्रिकोणाचा फरक.
मधल्या काही वर्षात अस काय घडलं ते निरोध च्या त्रिकोणावरून थेट या त्रिकोणावर गाडी आली. तुम्ही म्हणाल महागाई किती वाढलीय, मुल जन्माला घालणं, त्याला वाढवणं, शिकवणं हे किती खर्चिक झालय. पण व्यवहारिक पातळीवरून सर्वच नाही न बघता येत.
एकच मुल असेल तर त्याला मिळणारं पूर्ण लक्ष, सोयी सुविधा याने ते मुल एककल्ली, आत्मकेंद्री नाही का होणार ? आपण आपल्या लहानपणात हरवून जातो तेव्हा कोणत्या गोष्टी समोर येतात ? आजोळी भावंडांसोबत मजेत घालवलेले दिवस, मामानी केलेले लाड, मावशीचे प्रेम असे कितीतरी सुखाचे ठेवे नक्कीच मनात तरळतात. काही ठिकाणी तर काकूलाच आई म्हणण्याची पद्धत.
आता जर एकच मुल असेल किंवा नसेलच तर ही सर्व नाती, त्याची आत्मियता कशी समजणार ?
सर्व दिवस सारखे नसतात. माणूस एकटा पडतो तेव्हा येणारं रितेपण भयंकर असतं. अशावेळी आपल्या कुटूंबाचा आधार मिळणं फार महत्वाचं असतं. मित्र मैत्रिणी असतातच पण एका मर्यादेपर्यंत. शेवटी तुमचं कुटूंबच मुख्य आधार असतं.
या पिढीत जी मुलं एकटी वाढली त्यांच तरी ठिक आहे. मामे, चुलत अशी नाती तरी त्यांना आहेत पण त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं काय ? सर्व नाती फक्त तक्ते काढून शिकवायची वेळ येईल. जशी अभयारण्य किंवा प्राणीसंग्रहालयं ओस पडल्यावर डीजीटल ॲनिमल्स दाखवायची वेळ येईल तशी.
माणसाला पैसा, मानमरातब, नोकरी/व्यवसाय सर्व महत्वाचं असलं तरी त्याबरोबरच भावनिक आधाराची, भावनिक रित्या फुलण्याची खूप गरज असते. पैसा हेच सर्वस्व होऊ शकत नाही. भावनिक गरज पैशानी विकत घेता येत नाही. एखादा संकटात असेल तर दादा, काका, मामा यांनी पाठीवरून फिरवलेला हात प्रचंड उभारी देऊन जातो. तो त्यांनी देऊ केलेल्या आर्थिक पाठबळापेक्षाही फार मोलाचा ठरतो. हिंमत गमावलेल्याला उभारी देतो.
काका म्हणजे कोण, मामा म्हणजे कोण, मावशी म्हणजे काय हे डोळ्यासमोरच आलं नाही तर काय उपयोग ? कशी त्या नात्यांबद्दल ओढ वाटणार ? मुळात ओढ काय असते हे कळलं तर ती वाटणार ना.
आजकालच्या काळात कुटूंब संस्थेचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. या क्षेत्रात अधिकाधिक संशोधन होण्याची गरज आहे. व्यक्तीस्वातंत्र्याला पूर्ण महत्व असताना आत्ता जी तरूण उच्चभ्रू सुशिक्षित जोडपी आहेत त्यांनी स्वतःपलिकडे जाऊन एका नव्या समाजाचं भवितव्य या दृष्टीकोनातून निश्चितच विचार करायला हवाय. आज चीनची जी परिस्थिती झालीय ती होऊ द्यायची नसेल तर वेळीच त्रिकोणाबद्द्ल विचार करायला हवा. याचवेळी समाजाचा एक भाग असा आहे तिथे लेकुरे उदंड जाहली असा प्रकार आहे. ज्याचा समाजातील इतर माणसांवरच भार येतो. अशिक्षित संस्कारहीन समाज वाढण्यापेक्षा सुशिक्षित संस्कारक्षम पिढी वाढली तर त्याचा सर्वानाच उपयोग होईल.
आपल्या कडच्या कितीतरी रूढी अशा आहेत की ज्यात सर्व नाती सामावून घेतली आहेत. त्यामागे निश्चितच काही विचार असेल ना ? उष्टावणाला मामा हवा, जावळाला आत्या हवी, व्याहीभेटीला काका, मामा, आजोबा सर्व हवे. यापैकी कोणतं नातं निर्माणच झालं नाही तर काय ? रजिस्टर लग्न केलं झाल. यात सांस्कृतिक देवाणघेवाण तरी कशी होणार ? नव्या नवरीची मामी, काकू, बहिणी यांनी प्रेमळपणे केलेली गंमत, नवरदेवाची त्याच्या भावांनी काकांनी केलेली अशीच लटकी मस्करी. या साऱ्यानी रंगत येते. नुसत्या आई वडीलांनी एकुलत्या एक मुलाचे लाड करायचे यात काय अर्थ आहे. निदान सख्खी बहिण वा भाऊ असावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
Man is a social animal असं मारे आपण म्हणतो पण ते सर्व सोशल असायला काही आधार हवा ना ?
व्यक्ती तितक्या प्रकृती हे ही मान्य आहे. काहींचे मत याच्या पेक्षा पूर्ण वेगळे असेल पण केवळ पैशाचा विचार करून एकच एक मूल किंवा नाहीच असा निर्णय घेतला असेल तर तरूण पिढींनी जरूर पुनर्विचार करावा. वैद्यकियादृष्ट्या काही अडचणी असतात किंवा काहींचा इलाजच नसतो त्यांच्याविषयी पूर्ण सहानभूतीच वाटते. जे सक्षम आहेत त्यांनी विचार करायलाच हवा इतकंच म्हणणं आहे.

— लेखन : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800