“अती परिचयात अवद्या” अशी एक म्हण आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. मग त्यात मानवी संबंध देखील आले. जेव्हा दोन व्यक्ती खूप जवळ येतात, त्यांना एकमेकाचे स्वभाव, गुण दोष माहिती होतात, आतले उणे दुणे उसळून बाहेर येते तेव्हा आपोआप संबंधात दऱ्या पडायला लागतात. कुटुंबातील प्रत्येक नाते जवळीक वाढली की काळानुसार उसवत जाते. अगदी नवरा बायकोचे संबंध देखील सुरुवातीचे गुलाबी दिवस संपले की मूळ पदावर येतात. आपल्या अपेक्षा वेगळ्याच असतात. समोर वेगळेच दिसते. जे दिसले भासले ते मृगजळ होते याची सल तीव्र होत जाते. लग्नाआधी जे भासले, दिसले किंवा आपण कल्पिले ते खोटे होते, प्रत्यक्षात समोर काही वेगळेच वास्तव दिसते, हा भ्रमनिरास माणसाला आतून पोखरत जातो.
बाहेर समाजात मित्रांच्या बाबतीत, कामाच्या जागी सहकाऱ्यांच्या बाबतीत तेच घडते. आपण कुणावर आंधळा विश्वास टाकतो. आपले सगळे पत्ते उघडे टाकतो. पण ती व्यक्ती विश्वासार्ह नसते. आपल्या मोकळेपणाचा गैर फायदा घेतला जातो. आपण दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जातो. शेवटी डाव आपल्यावरच उलटतो. आपला विश्वासघात होतो आपल्याच सहृदाकडून.. मित्राकडून.. आपले डोळे उघडतात, आपल्याला समज येते तोपर्यंत उशीर झाला असतो. अब पाछताय होत क्या जब चिडिया चुग गई खेत ! असा पश्चात्ताप करण्याची वेळ आपल्यावर येते.
आश्चर्य म्हणजे अशा चुकापासून आपण फारसे काही शिकत नाही. त्याच त्या चुका आपण पुन्हा पुन्हा करत जातो. हा मानवी स्वभाव आहे. फार कमी असे असतात जे ठेच लागल्यावर सावध होतात, शहाणे होतात. आपल्याला वाटते, आपलेच चुकले असेल. आपणच कुठेतरी कमी पडलो असणार दुसऱ्यांना समजून घ्यायला. आपणच कधी कधी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करतो.
दुरुस्ती करून घेण्याचा म्हणजेच चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. यात वाईट काहीच नाही. पण मानवी संबंध म्हणजे एका बाजूची वाहतुक नाही. दुसरीकडूनही तोच, तसाच सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असतो. टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणजे एकतर्फी प्रयत्नांना अर्थ नसतो. समोरूनही तसाच प्रतिसाद अपेक्षित असतो. पण ते होत नाही सहसा.
माणसे अहंकारी असतात. माझेच खरे, मीच बरोबर हा समोरच्याचा दुराग्रह असतो. अशावेळी टाळी वाजत नाही. संबंध पुढे जात नाहीत. एक प्रकारचे कुंपण निर्माण होते दोन व्यक्तीत. ते पार करणे दोघांनाही कठीण जाते. पाहिले पाऊल कुणी उचलायचे, माघार कुणी घ्यायची, चूक कुणी आधी कबूल करायची असे अहंकार दोघातले अंतर कमी करण्याऐवजी वाढवत जातात.
क्षमाशील असणे हा एक उपाय आहे. दुसऱ्या आधी आपणच स्वतःला तपासणे हेही गरजेचे आहे. कधी कधी आपल्या चेहऱ्यावर चे डाग आपल्याला दिसत नाहीत आरशात पाहिल्या शिवाय. आरशावरची धूळ नीट पुसल्या शिवाय ! हे आत्मपरीक्षण जास्त महत्वाचे संबंध सुधारायच्या प्रक्रियेत. आधी स्वतःला सुधारा. पुढचा नंतर सुधारेल. किंबहुना आपण सुधारल्याशिवाय दुसऱ्याला सुधारण्याचा हक्क आपल्याला प्राप्त होत नाही. मीच खोटे बोलत असेन, मीच मोठ्याने ओरडत असेन तर मला समोरच्या व्यक्तीने चांगले वागावे, प्रामाणिक असावे असा आग्रह धरता येणार नाही. मला तसा नैतिक अधिकार प्राप्त होत नाही.
तसेही हे संघर्ष, ताणतणाव, मतभेद निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला सगळे काही शतप्रतिशत अचूक हवे असते. तडजोडीची आपली तयारी नसते. अन् प्रत्यक्षात हे शक्य नसते. आमच्या अभियांत्रिकीचे उदाहरण द्यायचे झाले तर ज्याला आम्ही आदर्श प्रतिसाद किंवा परिणाम म्हणतो ती अशक्यप्राय गोष्ट समजली जाते. आम्ही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो.
आदर्श परीणामाच्या तुलनेत व्यावहारिक निकाल हे नेहमीच खालच्या पातळीवर असतात. त्या दोघांतील जो फार फरक असतो त्याला चूक म्हणतात. ही चूक कशी दुरुस्त करायची यातच अभियांत्रिकी कसब असते. शहाणपण, कौशल्य असते.
मानवी नाते सबंधाचेही तसेच आहे. पूर्णत्व, आदर्श, परफेक्ट हा हव्यास, ध्यास चुकीचा. एखादी वाट आपल्या योग्य नसली तर दुसरा मार्ग शोधा. कदाचित ही दुसरी वाट अधिक योग्य असू शकेल आपल्यासाठी.
एका हिंदी कवीने फार सुंदर लिहिले आहे :
“वो अफसाना जिसे अंजाम तक ले जाना ना मुंमकिन
उसे किसी खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा “..
तू नही और सही असे म्हणत पुढचा रस्ता चालायला लागणे उत्तम!
दुसरा उपाय हा की सारे काही नव्याने पुन्हा सुरू करणे. मागचे विसरून जायचे सगळे. झाले गेले गंगेला मिळाले म्हणत. नव्याने पुन्हा सुरू करायचे नाते. कोऱ्या पाटीवर नवा अध्याय लिहायचा. सगळे पूर्वग्रह विसरून, जुन्या चुकांची पुनरावृत्ती न करता, कसलेही पूर्व ग्रह न बाळगता नव्याने तेच गणित सोडवायचे. अर्थात नव्या पद्धतीने. नव्या उमेदीने. वर ज्या गाण्याचा उल्लेख केलाय त्याच्या मुखड्यात हाच कवी म्हणतो,
“चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो “..
छान सल्ला दिलाय कवीने. एकाच ठिकाणी कुंठीत बसू नका. तेच ते जुने कोळसे उगाळीत बसू नका. पुढे पाऊल टाकत नवी वाट शोधा. हवी ती मंजिल नक्की सापडेल.
पुन्हा शेवटी अभियांत्रिकीचेच तत्व सांगतो. प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. एक नव्हे तर अनेक उत्तरे असतात. आपल्या सोयीचे, आपल्याला योग्य वाटेल ते, आपले उत्तर आपणच शोधायचे असते. तेही तडजोडीची तयारी ठेऊन !!

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैदराबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
