स्व. इंदिरा गांधी यांचा 31 ऑक्टोबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांना ही आदरांजली ….
भारताच्या इतिहासात 31 ऑक्टोबर 1984 हा अत्यंत काळाकुट्ट दिवस होय. या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. जे व्हायचे ते होऊन गेले. परंतु त्यांनी देशासाठी दिलेले योगदान हे कोणीही विसरू शकत नाही. अर्थात त्यांना जर आदरांजली वाहायची असेल तर नारी शक्तीचा जागर तसेच आदर करणे हीच खरी आदरांजली ठरेल.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांनी इकोले नौवेल्ले, बेक्स (स्विझरलैंड), इकोले इंटरनेशनेल, जिनेवा, पुणे व मुंबई स्थित प्युपल्स ओन स्कूल, बैडमिंटन स्कूल, ब्रिस्टल, विश्व भारती, शांति निकेतन आणि समरविले कॉलेज, ऑक्सफोर्ड सारख्या प्रमुख संस्थांमधून शिक्षण प्राप्त केले होते. त्यांना जगभरातील सर्वोच्च विद्यापीठांमधून डॉक्टरेटच्या उपाधीने गौरविण्यात आले होते. प्रभावी शैक्षणिक पार्श्वभूमी असल्याने त्यांना कोलंबिया विश्वविद्यालयाकडून विशेष योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले होते.
श्रीमती इंदिरा गांधी सुरुवातीपासूनच स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय होत्या. बालपणी त्यांनी ‘बाल चरखा संघ’ स्थापन केला होता. असहकार चळवळी दरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या मदतीकरिता 1930 मध्ये लहान मुलांच्या साथीने ‘वानर सेना’ उभी केली होती. सप्टेंबर 1942 साली त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
1947 साली श्रीमती इंदिरा गांधी यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागात काम केले.
स्व. पंतप्रधान इंदिराजी यांच्या बद्दल बोलायचे झाले तर स्वातंत्र प्राप्ती नंतर फेब्रुवारी 1959 मध्ये नागपूर येथे आयोजित अखिल भारतीय कॉंग्रेस च्या अधिवेशनामध्ये त्यांना कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्या वेळी विरोधकानी पंडित नेहरू यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून नियुक्ती केली किवा काय अशा अनेक प्रश्नांच्या केलेल्या भडिमारावर व्यक्त न होता त्यांनी सरळ पक्षाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. असे म्हंटले जाते की, त्या दररोज सकाळी 9 ते दुपारी अडीच पर्यंत कार्यात मश्गूल असत. पक्षाचे दरवाजे कार्यकर्त्या साठी अणि जनते करीता नेहमीच उघडे असत. दर शनिवार रविवार या दिवशी 50 कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांना आपुलकीने सहकार्य करीत असत. या शिवाय वेळ मिळेल तेव्हा नियोजनबद्ध पद्धतीने त्या आळीपाळीने विविध राज्यांचा दौरा करून तेथील कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य जनतेशी संवाद साधताना त्यांच्या समस्या जाणून घेत असत आणि त्या समस्या सोडविण्यासाठी सर्व शक्ति लावत असत.
कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे काहीही असोत, मात्र जनभावना काय आहे अणि जनतेला काय हवे आहे याची दखल घेण्यासाठी जनसंपर्का साठी त्यांनी नियमित पणे पदयात्रा देखील काढल्या. हे करीत असताना अशोक मेहता यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांशी संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असत.
पंडितजी हयात असताना ऑक्टोबर 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले, तसेच तिबेट मधील जनतेवर अत्याचार देखील केले. त्या परिस्थितीत त्यांना पंडितजींबरोबर तिबेट मध्ये जावे लागले होते. त्या वेळी त्या भारत सुरक्षा परिषदेच्या सदस्य देखील होत्या. पूज्य दलाई लामा यांच्या बरोबर पंडित नेहरू यांनी तिबेटी जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने चर्चा केली. त्यात सहभागी होण्याचे भाग्य त्यांना लाभले.
आशियाई देशात समग्र शांती असावी तसेच सर्वानी एकत्र येऊन सहकार्याने आपापली प्रगती साधणे आवश्यक आहे असे विचार त्यावेळी पुढे आले. शांती, सहकार्य या द्वारे विकासासाठी आवश्यक असे प्रयत्न केले जातील यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले होते.
त्याच सुमारास म्हणजे 1964 साली भुवनेश्वर येथे झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या अधिवेशनात लोकशाही समाज वाद तसेच राष्ट्रीय एकात्मता इत्यादी इत्यादी विचारावर भर देण्यात आला. मात्र चीनचे आक्रमण पंडितजी यांच्या मनाला खूप चटका लावून गेले अणि त्या नंतर 27 मे 1964 रोजी त्यांचे निधन झाले.
अर्थात पंडितजींच्या राजकीय वारसा बद्दलची समस्या निर्माण झाली. त्या वेळी इंदिराजी यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या नावाची शिफारस केली. अर्थात हे शिव धनुष्य शास्त्री यांनी मोठया धैर्याने उचलले. केवळ शास्त्री यांच्या आग्रहाने इंदिराजी यांनी माहिती अणि नभोवाणी खात्याचे मंत्री पद स्विकारले.
पुढे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली. हे युद्ध 22 दिवस टिकले. अर्थात त्या युद्धात पराभव अर्थात पाकिस्तानचा झाला होता. परंतु त्या नंतर ताशकंद करार झाला. पंतप्रधान म्हणुन शास्त्रीजींनी करारांवर स्वाक्षरी केली परंतु मायदेशी परतताना त्यांचे दुर्दैवाने निधन झाले. सर्वांच्या दृष्टीने हा मोठा धक्का होता.
तो दिवस होता 10 जानेवारी 1966. प्रसंग बांका होता.
अशा परिस्थितीत सर्वांच्या आग्रहास्तव इंदिराजी यांनी 24 जानेवारी 1966 रोजी भारताच्या पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली. त्या आता जगातील सर्वात मोठ्या अशा लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधान झाल्या होत्या. आल्या आल्याच त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अणि जागतिक पातळीवर देशाचे अस्तित्व सिद्ध व्हावे तसेच टिकून राहावे या साठी व्यवस्थेच्या पलिकडे जाऊन रुपयाचे अवमूल्यन, बँकांचे राष्ट्रीयीकरण अशा प्रकारचे निर्णय घेऊन देशाची आर्थिक घडी तसेच सर्व सामान्य माणूस सुखी कसा होईल याचा विचार केला.
राजकारणात शह काट शह अशा प्रकाराच्या अनेक समस्यांशी तोंड देत इंदिराजी यांनी देशाचा विकास साधण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. विपरित काळात त्यांनी राष्ट्रीय आणीबाणी पुकारली. त्या नंतरच्या काळात त्यांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव देखील झाला.
न्यायमूर्ती शहा कमिशनला त्यांना समोर जावे लागले. लोकशाही समाज व्यवस्थेतील तो एक वस्तुनिष्ठ प्रकार होता. मात्र या सर्व आव्हानांना सामोरे जाऊन त्यांनी राष्ट्रीय अस्मिता अविरत तेवत ठेवली.
जगातील प्रबळ राष्ट्रात देखील त्यांना मान सन्मान मिळत गेला. हा सन्मान भीती पोटी नव्हता तर हा सन्मान आदरयुक्त होता.
देशातील सर्वच घटकांच्या विशेषता पिढ्यानुपिढ्या विकासाच्या शोधात असलेल्या जनतेला डोळ्या समोर ठेवून 20 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी त्यांनी मोठया जोमाने केली. महत्त्वाचे म्हणजे देशातील सर्वच घटकांशी त्या थेट संपर्कात असत त्यामुळे सर्व सामन्यांच्या मनात त्यांच्या बद्दल प्रचंड विश्वास तसेच आदर होता. याचाच अर्थ असा की जगातील त्या अत्यंत लोकप्रिय नेत्या.
त्यांच्या काळात देशातील सैन्यदल अधिक सक्षम करण्यासाठी भर देण्यात आला. भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेशची निर्मिती त्यांच्याच काळात झाली. पाकिस्तानचा पराभव करून भारतीय सैन्याने काबीज केलेला प्रदेश पाकिस्तानला परत केला अणि जगाला असे दाखवून दिले की भारत देश हा साम्राज्यवादी देश नाही. अशा प्रकाराचे अनेक कंगोरे सांगता येतील.
त्यांच्या जाण्याने एक युगाचा अंत झाला असे म्हंटले जाते हे खरे आहे. आजच्या काळात त्यांची स्मृती आठवताना एक खंत राहून जाते, ती अशी की त्यांच्या सारखी प्रचंड प्रमाणात ऊर्जा असलेली एक महिला देशाची पंतप्रधान होऊन गेली मात्र या देशातील महिलांवरील अत्याचार थांबले नाहीत.
आमच्या आया-बहिणी-कन्या अजूनही असुरक्षित आहेत हे कोणीतरी थांबवायाला हवे. शासन व्यवस्था, विविध कायदे करून महिलांना आत्मसन्मानाने निर्भयपणे जगता यावे यासाठी प्रयत्न करीत आहे, मात्र केवळ कायदा किंवा संविधान यांच्या आधाराने ही गोष्ट साध्य होईल का हा प्रश्न पडतो. त्या साठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे आणि एक दिलाने नारी शक्तीचा जागर अणि सन्मान करण्याची गरज आहे. स्व. इंदिराजी याना हीच खरी आदरांजली ठरेल 🙏

– लेखन : निरंजन राऊत.
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
नारी शक्तीचा जागर…हा लेख स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिराजी (प्रियदर्शनी) यांच्या जीवनातील धाडशी निर्णय आणि एका स्त्री मध्ये असलेली हिम्मत दाखवणारा आहे… खाऱ्या अर्थाने इंदिराजी या देशाच्या रणरागिनी होत्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते देशातल्या छोट्या-मोठ्या सर्व निर्णयात त्यांचा सहभाग होता तीस विकासासाठी व देशातील एकात्मता राखण्यासाठी त्यांनी आपले बलिदान केले… देशहित देशातला गरीब माणूस आणि श्रीमंतातीत श्रीमंत व्यक्ती यांचा समतोल राखण्यासाठी लढणाऱ्या रणचंडिका होत्या…
धन्यवाद सर अशा पुरोगामी विचाराच्या नारी शक्तीला मर्दांगी शिकवणाऱ्या या नेतृत्वाला सलाम…
खूप सुंदर लेख…मा.निरंजन राऊत सर खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद
नारी शक्तीचा जागर…हा लेख स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिराजी (प्रियदर्शनी) यांच्या जीवनातील धाडशी निर्णय आणि एका स्त्री मध्ये असलेली हिम्मत दाखवणारा आहे… खाऱ्या अर्थाने इंदिराजी या देशाच्या रणरागिनी होत्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते देशातल्या छोट्या-मोठ्या सर्व निर्णयात त्यांचा सहभाग होता तीस विकासासाठी व देशातील एकात्मता राखण्यासाठी त्यांनी आपले बलिदान केले… देशहित देशातला गरीब माणूस आणि श्रीमंतीत श्रीमंत व्यक्ती यांचा समतोल राखण्यासाठी लढणाऱ्या रणचंडिका होत्या…
धन्यवाद सर अशा पुरोगामी विचाराच्या नारी शक्तीला मर्दांगी शिकवणाऱ्या या नेतृत्वाला सलाम…
खूप सुंदर लेख…मा.निरंजन राऊत सर खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद
प्रथम महिला पंतप्रधान म्हणून अभिमान वाटतो.
विस्तृत माहिती मिळाली . धन्यवाद ! ! !