Wednesday, July 2, 2025
Homeसंस्कृतीनाशिकची खाद्यसंस्कृती

नाशिकची खाद्यसंस्कृती

नाशिक म्हणजे पूर्वीचे जनस्थान, गुलशनाबाद .. गुलाबांचे शहर अशी त्याची ओळख आहे.
दंडकारण्यात श्रीरामांचे वास्तव्य असल्यापासून नाशिकचा इतिहास आपल्याला माहित आहे. नाशिकची संस्कृती ही मिश्र व सर्वसमावेशक अशी आहे.

आम्ही जेव्हा १९६९ साली नोकरीनिमित्त नाशिकला आलो तेंव्हाचे नाशिक व आताचे नाशिक यात जमिन आसमानचे अंतर आहे. जी माणसे नोकरी निमित्त शहरात येतात ते आपल्या बरोबर आपले संस्कार व खाद्यसंस्कृतीही घेऊन येतात.

मुळचे नाशिककर सोडले तर बहुसंख्य लोक हे नाशिक मध्ये आमच्या सारखेच स्थलांतरीत व बहुसंख्य खेड्यातील आहेत व गेली अनेक वर्षे नाशिकशी समरस होऊन आज नाशिक हीच त्यांची ओळख बनली आहे.

१९६९ साली नाशिक मध्ये आलो तेव्हा नाशिकमध्ये खाण्यासाठी म्हणजे बाहेर खाण्यासाठी एकमेव प्रसिद्ध
हॅाटेल होते ते.. ”भगवंतराव हॅाटेल” बस्स. आणि बायको मुले ज्यांनी बरोबर आणली नाहीत त्यांनीच तेव्हा बाहेर खाण्याची म्हणजे जेवण्याची पद्धत होती. आजच्या सारखे उठसूठ बाहेर कुणी चरत नसे. अहो, क्वचित शिवाजी गार्डनमध्ये गेलो तर भितभित मुलांबरोबर भेळभत्ता आम्ही खात असू व ती ही मोठी पर्वणी किंवा चैन वाटत असे.

आम्ही बाहेरून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेली मंडळी एकमेकांच्या घरी जाऊन चहा पोह्यांचा आनंद लुटत असू. आम्ही आमच्याबरोबर खानदेशच्या खाद्य पद्धती आणल्या होत्या नि तेच वरण, भात, भाजी, पोळी आम्ही जेवत होतो. म्हणजे नाशिक मध्ये ज्या अठरापगडजाती आल्या त्या आपल्या खाद्यपद्धती घेऊन आल्या व तिच नाशिकची ओळख बनली.

यात मूळ नाशिककरांनी त्यांची खाद्यसंस्कृती जपली व बाकिच्यांनी त्यांची..?१९७२/७३ ला आम्ही पंचवटीत ढिकल्यांच्या दुमजली चाळीत रहात असतांना बिहारी कुटुंबापासून मारवाडी, गुजराथी, मराठी, ब्राह्मण कुटुंबे शेजारी शेजारी राहून आपल्या परंपरा जपत होतो. आमच्या घरासमोर एक एस् टी ड्रायव्हरचे कुटुंब
रहात असे , त्यांच्या घरून आलेले कुळीथाचे शेंगोळे मी प्रथम खाल्ले जे मी खानदेशात कधीही खाल्लेले नव्हते, तसेच पंडित कॅालनीत आमच्या शेजारी डोंगरगांवकर रहात होते त्यांच्या कडून आलेली इडली आम्ही प्रथमच खाल्ली व ती तेव्हा आम्हाला मुळीच आवडली नाही. तिच इडली चटणीसह आमच्याघरी आता आठवड्यातून दोनदा तरी बनते. म्हणजे
बघा दाक्षिणात्य इडली तेव्हाही नाशिकमध्ये रूळली होती व आज तर तिचा सुळसुळाट झाला आहे.

म्हणून मी विधान केले की, नाशिकची खाद्यसंस्कृती ही मिश्र संस्कृती आहे. जो इथे येतो तो आपल्या गुणवैशिष्ट्यांसह इथे एकरूप होऊन जातो. १९८५ साली टी.व्ही आले नि मग नाशिक काय सारे जगच एक होऊन गेले. सी.बी एस ला काही हॅाटेल्स उदा. प्रिया, गोकुळ, गोळे कॅालनीत वैभव, पेशवाई असे प्रस्थ वाढू लागले. त्यात चाट, पाणीपुरीची भर पडली.
गंगेवर सुद्धा तेव्हा खायची दुकाने नव्हती. फक्त बाजार व झिंगे माशांची दुकाने असत जी आज ही आहेत.

आज तर खाण्याच्या दुकानांचा नुसता सुळसुळाट झाला आहे. गंगापूर रस्त्यावर तर हॅाटेलांचा महापूर आहे. लग्नकार्य, पार्ट्या, मुंज, वाढदिवस या साठी आपण आता सर्रास हॅाटेलचा आश्रय घेतो व छोले, पुऱ्या, पनिर असे पूर्वी कधीही न खाल्लेले पदार्थ खातो.

आता आपण मुळचे कुठले ? ती ओळख सुद्धा पुसून जावी इतके मिश्र झालो आहोत. सर्व प्रकारच्या खाद्यसंस्कृतीचा स्वीकार आपण बिनबोभाटपणे केला आहे हे नक्की ! आणि मला वाटते हेच खऱ्या अर्थाने भारतीयत्व आहे नाही का ? जगाच्या पाठीवर कुठे ही गेलो तरी आता आपली उपासमार होत नाही इतके आपण सरावलो आहोत आणि माझ्या मते हे ही प्रगतीचे एक पाऊल आहे असे म्हणायला काही ही
हरकत नाही ..
नाशिक जिंदाबाद !
भारत जिंदाबाद !!

सुमती पवार

– लेखन : प्रा.सौ.सुमती पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. वाह्, छान वर्णन केलय. आईचे माहेर. खानदेशी १०० डिग्री मधून नाशिकचा गारवा सुखावह वाटायचा. प्रत्येक उन्हाळयात सुट्टीसाठी नाशिकला यायचो. मामे, मावस भावंडांची मोठ्ठी गॅंग असायची. बाहेरच खाण नव्हतच. फक्त तिखट, मिठ, मसाला लावून कैऱ्या, ऊसाचा रस, व अजुनहि जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचा सुप्रसिद्ध चिवडा. लहानपणची मजा काही औरच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४