शाळेच्या वेळची गंमत आहे. आज विषय वाचला आणि पटकन आठवले. आमचा शाळेचा निकाल लागला होता. मी प्रथम क्रमांकाने पास झाले होते. दुसरी बहिण दुसर्या क्रमांकाने पास झाली होती. आम्ही खुप आनंदात होतो.
दोन, तीन नंबरच्या मैत्रिणी एक एक पेपर चे गुण तपासून बघत होत्या. मला गणितात लता पेक्षा दोन गुण कमी होते. इतक्यात माझी दोन लहान भावंडे रडत रडत मला शोधत आली. मी त्यांना रडताना बघून घाबरले. त्यांना कमी गुण मिळतील असे वाटतच होते. कारण ते अभ्यासाचा कंटाळा करायचे. तरी मी त्यांना मारून अभ्यास करून घेत असे.
मी त्यांना बाजूला नेवून निकाल बघितला तर बहिणीला चक्क सपास केले होते. तर इंग्रजीमध्ये गुण वाढवले होते. गुणाखाली लाल रेषा होती. आता घरी पप्पांचा मार मिळणार हे नक्कीच होते. मी पण काही करू शकत नव्हते. भावाला कमी मार्क होते. पण निदान तो काठावर पास होता.
आम्ही दोघी बहीणी आनंदात होतो. पण आज घरात त्यांच्याबरोबर मला पण वडीलांचे बोलणे खायला लागणार होते. ते दोघे रस्त्याला रडतच होते. घरी आई वाट बघत होती. तिने आमरस केला होता. आमचा निकाल बघून ती म्हणाली, बघा कश्या दर वर्षी चांगल्या गुणांनी पास होतात. आता त्यांचे रडणे बघूनच तिला अंदाज आला होता. आईचे पण काही चालणार नाही, असे आई म्हणाली. घर शांत झाले. मग आई म्हणाली, बरे झाले ते इथे नाहीत. ती म्हणाली, पप्पा कोर्टाच्या कामासाठी ठाण्याला गेले आहेत ते रात्री येतील.
बापरे ! मला तर जरा सुटल्यासारखे झाले. आता काय कराव ते कळेना. भूक जोराची लागली होती. म्हणून आधी जेवायला बसलो. आईने देवाला ताट दाखवले व आम्हाला दोघांचा निकाल देवासमोर ठेऊन नमस्कार करायला सांगितला. जेवायला बसलो तर पुन्हा हे दोघे जेवायला तयार नाही. भूक तर लागली होती. परत समजावले त्यांना अरे जेवणावर राग, रडणे बरे नसते. चला जेवा भराभर, तसे जेवले.
दुपारी खेळायला पण आले नाही. गादीतच लोळत होते. जसजशी रात्र होऊ लागली तसे रोडवर बघत बसले पप्पांची गाडी येते का ? माझ्या दोन्ही बाजूला बसून मला सांगत होते, “ताई काय तरी करना!” मी विचार करत होते काय करावें ? आमचे दोघींचे लाड होतील पण यांना मार मिळेल.
मग आईला समजवले, आपण आज निकालाचा विषय काढायचा नाही. तू लवकर जेवण कर आम्ही जेवून झोपतो. ती म्हणाली काही करा सकाळी तरी सांगणार ना ? मी म्हणाली, हो. झाले आठ वाजता कसेतरी जेवलो व गाद्या टाकून बसलो. इतक्यात दूर वरून गाडीचा लाईट दिसला. आम्ही पळत पळत गाडीत पडलो व तोंडावर पांघरूण घेऊन झोपायचे नाटक करत होतो. सगळे आवाज ऐकत होतो. ते विचारत होते अरे खाऊ घ्यायला कोणीच नाही काय ?
आई म्हणाली, “मुलं खेळून दमली म्हणू तुमची वाट बघून झोपली” झाल आमचा विषय संपला कारण रात्र पाळीवाला काका आला होता. आता तो सर्व दिवसभराचे शेतीचे कामकाज कसे झाले ते सांगत होता. आता बिनधास्त होऊन कधी झोप लागली ते कळलच नाही. पण झोपेत पण धपाटे खाणे सुरू होते.
— लेखन : डाॅ.अंजली सामंत. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800