ठाणे येथील समतोल सेवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सामाजिक कार्यकर्ते प्रशिक्षण समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यावेळी बोलताना, समतोलचे विश्वस्त, आमदार संजय केळकर म्हणाले की, या संस्थेचं कार्य असेच सुरू राहिल्यास भविष्यकालात मोठं विद्यापीठ तयार होईल. या प्रशिक्षणातून निर्माण होणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये डिसीप्लीन, डिव्होशन, डेडीकेशन आणि डिटरमिनेशन असेल तर कितीही अडचण आली तरीं त्यावर ते मात करू शकतील. अशा कार्यक्रमातुनच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन होते, असे सांगून त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
घरातून पळून येणाऱ्या मुला- मुलींचा शोध घेऊन त्यांचे मन परिवर्तन करून त्यांना घरी राहण्यासाठी तयार करण्याच्या समतोल फाऊंडेशनच्या कार्याचे कौतूक करताना प्रमुख पाहुणे, निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ म्हणाले की, घरातून मुलं पळून येणं हे कुटुंब व्यवस्था उध्वस्त होत असल्याचे लक्षण आहे.मुलं घरातून पळून जाण्याची विविध कारणे असतात. केवळ गोरगरिब घरातीलच मुलं- मुली घरातून पळून जातात असे नव्हे तर उद्योगपती, डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, आयपीएस अधिकारी घरचीही मुले पळून जातातही खरोखरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
इतकेच नाही तर देशात गेल्या वर्षात जवळपास १ लाख ४० हजार जणांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी १५ ते ३५ वयोगटातील ९० हजार युवक आहेत. अशाप्रकारे मतरुण- तरुणी आपले जीवन संपवित असतील तर ते आपल्या शिक्षण पद्धतीचे, कुटुंब संस्थेचे अपयश म्हटले पाहिजे का ? असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्यामुळेच घरातून पळून गेलेल्या आणि त्यांचा शोध घेऊन त्यांना सहारा देणाऱ्या समतोलसारख्या संस्थांची आज नितांत गरज आहे, असे सांगून याकामी जे जे सहाय्य करता येई ते करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी समतोलचे मित्र श्री महाजन यांनी संस्थेला ५० हजार रुपयांची मदत केली. संस्थेचे किचन सांभाळणाऱ्या वासंती कुंभार यांनी कोरोना कालातील अनुभवावर आधारित कविता सादर केली. तर प्रशिक्षण घेतलेल्या काही महिलांनी आपली मनोगतं व्यक्त केली.
समतोल फौंडेशनचे अध्यक्ष श्री विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले तर फौंडेशनचे कार्यवाह श्री राजेंद्र गोसावी यांनी सूत्र संचालन केले.
यावेळी फौंडेशनचे विश्वस्त श्री एस हरिहरण, जेष्ट पत्रकार श्री शेषराव वानखेडे, फौंडेशनचे हितचिंतक, कार्यकर्ते उपस्थित होते.
– टीम एनएसटी, 9869484800