Sunday, July 13, 2025
Homeलेखनिग्रही साथी सायण्णा

निग्रही साथी सायण्णा

आयुष्यात देऊ करण्यात आलेली शासकीय पदे, मानपान यापासून निग्रहाने दूर राहिलेले, विडी कामगारांचे राष्ट्रीय नेते आणि थोर समाजवादी साथी सायण्णा एनगंदुल यांची नुकतीच, म्हणजे २० नोव्हेंबर रोजी नव्वदावी जयंती साजरी झाली. त्यानिमित्ताने साथी हिरालाल पगडाल यांनी साथी सायण्णा यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा बोलका वेध.
साथी सायण्णा आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक
आज पर्यंत आपण अनेकांचे मृत्यू पाहिले, अनेक अंत्ययात्रा पाहिल्या, अंत्यविधी पाहिले पण साथी सायण्णा एनगंदुल यांचा मृत्यूही वेगळा आणि अंत्यविधी देखील वेगळा होता.
साथी सायण्णा एनगंदुल यांचे २५ मार्च २०२२ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी स्वेच्छा निर्वाण झाले. त्यांचा मृत्यू म्हणजे एका धीरोदात्त योद्ध्याने मृत्यूला स्वतः होऊन दिलेले निमंत्रण होते. त्यांनी निर्वाणापूर्वी ६६ दिवस प्रायोपवेशन केले होते. निर्धारपूर्वक अन्न त्याग केला होता.

प्रायोपवेशन म्हणजे स्वतः होऊनच मृत्यूच्या दिशेने वाटचाल करणे होय. सायण्णांनी मकर संक्रांतीच्या दिवशी शेवटचे अन्नग्रहण केले, त्यावेळी त्यांची प्रकृती धडधाकट होती. ते चालते, बोलते, हसते, खेळते, फिरते होते. असे असतांना त्यांनी अन्नत्यागाचा निर्धार केला. अप्रत्यक्षपणे संदेश दिला की, “माझे जीवन कृतार्थ झाले आहे, माझी जगण्याची इतिकर्तव्यता संपली आहे. इत:पर जगण्यासाठी मी काहीही करणार नाही”. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, हितचिंतक, कार्यकर्ते यांनी त्यांना अन्नग्रहण करण्याचा खूप आग्रह केला, पण सायण्णा बधले नाहीत, त्यांचा निर्धार ठाम होता.

सलग ६६ दिवस हा निर्धार त्यांनी कायम ठेवला.
ते थोडेसेही विचलीत झाले नाहीत. आनंदाने, स्वेच्छेने मृत्यूच्या दिशेने जात होते.अखेर ६६ व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू म्हणजे एक उत्सव होता. हा मृत्यू म्हणजे एका यशोगाथेचा गौरव होता.
त्यांचे हे प्रायोपवेशन त्यांना आचार्य विनोबा भावे यांच्या मार्गावर घेऊन गेले. मानवी समाजासाठी हे एक अनोखे उदाहरण आहे.

सायण्णा जरी समाजवादी साथी होते, तरी त्यांचे सर्व विचारांच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. ते अजातशत्रू होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वसमावेशक होते. त्यांच्या अंत्यविधीला जसे सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने हजर होते, तसेच सर्व राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांचे नेते, कार्यकर्ते झाडून हजर होते. म्हणतात ना ‘माणसाची परीक्षा एक तर तोरणा दारी होते नाहीतर मरणादारी होते’. सायण्णा यांच्या अंत्यसंस्कार समयी जी प्रचंड गर्दी जमा झाली होती, त्याने सायण्णा यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली. त्यांचे असामान्यत्व अधोरेखित झाले .

साथी सायण्णा राष्ट्र सेवा दलाचे सैनिक होते. त्यामुळे त्यांचा अंत्यविधी सेवादलाच्या इतमामात पार पडला. सायण्णा यांचा त्याग, तपश्चर्या, संघर्ष, कार्य, कर्तृत्व यांचा यथोचित सन्मान करणारा हा अंत्यविधी होता. ‘साथी सायण्णा अमर रहे’ ‘साथी सायण्णा झिंदाबाद- झिंदाबाद झिंदाबाद’. या गगनभेदी घोषणांच्या निनादात साथी सायण्णांना अंतीम निरोप देण्यात आला.

साथी सायण्णा यांचे जीवन म्हणजे एक धगधगते यज्ञकुंड होते. ती एक संघर्षगाथा आहे. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९३२ रोजी एका गरीब विणकर कुटुंबात झाला. त्यांचे वडील नारायणराव एनगंदुल हातमागावर साडी विणण्याचे काम करीत असत. त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच होती. ते स्वतः अल्पशिक्षित होते. तीन मुले, चार मुली असा नऊ जणांचा परिवार चालवतांना तारांबळ होऊ लागली. गरीबी वाईट असते, ती माणसाची प्रगती रोखून धरते. सायण्णा सात भावंडात थोरले होते. सायण्णा इयत्ता सहावीत असतांनाच गरिबीमुळे त्यांचे शिक्षण बंद झाले. त्यांना लहानपणीच काम करून घर चालवायला मदत करण्याशिवाय पर्याय नव्हता. खरे तर ते शाळेत हुषार होते, आणखी वर्ष दीड वर्ष शिकून सातवी पास झाले असते तर ते सरकारी नोकर किंवा शिक्षक म्हणून सहज नोकरीला लागले असते. पण असे होणार नव्हते.

सायण्णा सुरुवातीला विणकाम आणि त्यानंतर विडी वळण्याचे काम करू लागले. सायण्णांनी विडी वळण्याचे कौशल्य पूर्णपणे हस्तगत केल्यावर ते रितसर विडी कामगार म्हणून भिकुसा विडी कारखान्यात कामगार म्हणून भरती झाले. बहुसंख्य विडी कामगार निरक्षर, त्यातही महिलांचे प्रमाण ९०% पेक्षा अधिक. विडी कारखाने म्हणजे माणसांचे खुराडेच असत. तेथे कामगारांसाठी कोणत्याही आवश्यक अशा प्राथमिक सोई सुविधा नसत.

सायण्णा मुळातच बंडखोर होते, तेथे जो कारकुनी नोकरवर्ग होता त्यांच्यापेक्षा ते थोडे जास्त शिकलेले होते. सायण्णांना कामगारांची हि असुविधा सहन होईना, त्यांनी त्याबाबत आवाज उठवला, कारकून मंडळींना नाकापेक्षा मोती जड नको होता. ते संधीची वाटच पाहत होते. सायण्णांनी आवाज उठवताच कारकून मंडळींनी त्यांच्या विरोधात मालकाकडे तक्रार केली. मालकांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता सायण्णांना तडकाफडकी कामावरून कमी केले. येथेच संघर्षाची पहिली ठिणगी पडली.

सायण्णा हे विडी मजदूर सभा या युनियनचे सदस्य होते. या युनियनचे नेतृत्व स्वा. सै.भास्करराव दुर्वे नाना करीत होते. त्यांनी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध युनियन कडे दाद मागितली. युनियनने मालकाला जाब विचारला, मालक बधायला तयार नाही. परिणामी युनियनने आंदोलनाचा पुकारा केला. सायण्णा यांनी मालकाच्या अन्याय्य कृतीविरुद्ध बेमुदत उपोषण चालू केले. सुरुवातीला मालकाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले, पण युनियनच्या दबावापुढे मालकाला झुकावे लागले. सायण्णांना पुन्हा कामावर घ्यायचा निर्णय झाला. सायण्णा यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला लढा जिंकला. एका संघर्षमय लोकजीवनाची हि यशस्वी सुरुवात होती. भविष्यात असे अनेक लढे त्यांच्या पुढे वाढून ठेवलेले होते.

या लढ्याच्या निमित्ताने सायण्णा आणि दुर्वेनाना यांचा घनिष्ट संबंध आला. सायण्णांचे अक्षर मोत्यासारखे छान होते. त्यांची समज, त्यांचा स्पष्टवक्तेपणा, त्यांची अन्यायाविरुद्ध लढण्याची मानसिकता याने दुर्वे नाना प्रभावीत झाले. विडी कामगार युनियनचे काम करण्यासाठी अशाच माणसांची गरज असते हे नानांना ठाऊक होते. नानांनी सायण्णांना युनियनचे पूर्णवेळ काम करण्याची ऑफर दिली आणि ती अण्णांनी स्वीकारली. एक सामान्य विडी कामगार, विडी कामगारांचा नेता बनला. विडी कामगारांचा नेता हि कठीण जबाबदारी होती, हे एक आव्हानात्मक काम होते. अण्णांनी हे आव्हान स्वीकारले. दुर्वे नानांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास त्यांनी सार्थ ठरवला.सायण्णांना लोक प्रेमाने अण्णा म्हणून संबोधू लागले.

विडी मजदूर सभेचे कार्यक्षेत्र संगमनेर, अकोले, सिन्नर या तीन तालुक्यात पसरलेले होते. हे तालुके दुष्काळी असल्यामुळे विडी व्यवसायावर अवलंबून होते. या तीनही तालुक्यातील शेकडो खेड्यात विडी कारखाने होते. त्यात हजारो विडी कामगार काम करीत होते. साल होते १९५३, त्यावेळी ग्रामीण भागात, दऱ्या खोऱ्यात फिरावे लागे. युनियनकडे स्वतःची बुलेट मोटारसायकल होती, त्यावर बसून अण्णांची तिन्ही तालुक्यात भटकंती चालू असे.त्याकाळात बुलेट काय किंवा इतर मोटारसायकल काय दुर्मीळ होती. तिन्ही तालुक्यात मिळून हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मोटारसायकली होत्या.

अण्णांचे व्यक्तिमत्त्व रूबाबदार आणि राजबिंडे होते. गोरा रंग, व्यायामाने कमावलेले पिळदार शरीर, धारदार नाक, पाणीदार तेजस्वी डोळे, भरपूर उंची, जाड्या भरड्या खादीचे कपडे, डोक्यावर लालटोपी याने त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिकची उंची लाभली होती. बुलेट मोटारसायकल चालवताना ते अधिक रुबाबदार दिसत असत.

विडी मजदूर सभेच्या पूर्णवेळ सेवकांचे काम केवळ विडी कामगारांपुरते सिमित नव्हते. त्या कामा बरोबरच त्यांना समाजवादी पक्ष, समाजवादी युवजन सभा, साने गुरुजी वाचनालय, शेतकरी शेतमजूर पंचायत, समाजवादी महिला सभा, राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी सेवा पथक यांचेही काम बघावे लागे. या सर्वांचे एकत्रित कार्यालय साने गुरुजी सभागृह, मोमीनपुरा, संगमनेर येथे होते.

साने गुरुजी सभागृहात वाचनालय होते, तेथे दररोजची सर्व दैनिके येत असत. याच सभागृहात या संघटनांच्या मिटिंगा होत असत, त्या बरोबरच राष्ट्र सेवा दलाच्या वतीने अभ्यासमंडळ आणि व्याख्याने आयोजित केली जात असत. सेवादलाची शिबिरं, संमेलने, अभ्यासमंडळ, समाजवादी पक्षाच्या सभा संमेलने, विविध आंदोलने यातून सायण्णांची वैचारिक बैठक पक्की झाली. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञाननिष्ठा हि त्यांची जीवननिष्ठा बनली. स्वातंत्र्य, समता, बंधुता हा त्यांचा स्थायीभाव बनला.

सेवादलातील संस्कारामुळे श्रमप्रतिष्ठा त्यांच्या अंगवळणी पडलेली होती. आयुष्यभर त्यांनी स्वतःचे कपडे स्वतःच धुतले. त्यांना कोणत्याही कामाची लाज वाटत नव्हती, त्यांना श्रम आणि श्रमिकांबद्दल आस्था होती.

महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.राम मनोहर लोहिया, एसेम जोशी, नानासाहेब गोरे, नानासाहेब दुर्वे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे उच्च कोटीचे नैतिक अधिष्ठान, स्वच्छ चारित्र्य त्यांनी आयुष्यभर जपले. ज्या माणसाचे आयुष्य खुल्या पुस्तकाप्रमाणे असते तो माणूस समाजात वंदनीय असतो. सायण्णा देखील समाजात वंदनीय होते.

विडी कामगारांचे प्रश्न अतिशय गंभीर होते. विडी कारखानदार विडी कामगारांचे प्रचंड शोषण करीत असत. त्यांना कमी मजुरीत काम करावे लागे. दर हजारी मजुरीचे दर वाढवून मिळावेत यासाठी वर्षोनुवर्षे संप, मोर्चे, जेलभरो, उपोषण, धरणे, सत्याग्रह करावे लागले. विडी मालक तंबाखू आणि पानपुडा यांचे वाटप करतांना लबाडी करीत. तंबाखू आणि पानपुडा कमी दिल्याने त्याचा तुटवडा पडे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी कामगारांना बाजारातून तंबाखू किंवा पानपुडा विकत घ्यावा लागे.

त्यांना प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी, भर पगारी रजा, साप्ताहिक सुट्टी यांचे लाभ मिळत नव्हते. विडी वळतांना पाठीत वाकावे लागते,त्यामुळे बहुसंख्य विडी कामगारांच्या पाठीला वाक आलेला असे. तंबाखूचा खखाना नाकातोंडात जात असल्याने दमा, क्षय आदी आजाराची लागण होत असे. बहुसंख्य विडी कामगार स्त्रीचे डोळे खोल गेलेले, गालफड बसलेले, छातीचा भाता झालेला, अंगावरील मांस सुरकूटलेले, कृश, कुपोषित शरीर असे भयानक चित्र सर्वत्र दिसत असे. या नरक यातनातून विडी कामगारांची सुटका करण्याचा यशस्वी प्रयत्न विडी कामगार संघटनांनी केला.

विडी कामगारांचे राष्ट्रव्यापी नेतृत्व संगमनेरने केले. कम्युनिस्ट पक्षाची लाल बावटा युनियन आणि समाजवाद्यांची मजदूर सभा यांनी देशपातळीवर विडी कामगारांना न्याय मिळवून दिला. या लढ्याचे राष्ट्रीय नेतृत्व ज्या मोजक्या लोकांनी केले त्यापैकी साथी सायण्णा एनगंदुल हे एक होते. त्यामुळे विडी कामगारांच्या मनात सायण्णांबद्दल कृतज्ञतेची भावना आहे यात वावगे काहीच नाही.

सायण्णा यांचे घर समाजवाद्यांचे माहेरघर होते. खेड्यापाड्यातुन संगमनेरला आलेला विडी कामगार सहज सायण्णा यांच्या घरी जात असे, तेथे सायण्णांची धर्मपत्नी सौ.कौसल्याबाई एनगंदुल आलेल्या गेलेल्यांची चहापाणी, भोजन याची आस्थेने व्यवस्था करीत असे. त्यामुळे कौसल्याबाई आणि सायण्णा हे दाम्पत्य विडी कामगारांच्या गळ्यातले ताईत बनले होते.

१९७४ साली कौसल्याबाई संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या, पण निवडणुकीची धामधुम सुरू होण्यापूर्वीच त्यांचा भाचा राम याचा अपघात झाला. रामची आई लहानपणीच वारली होती, आईविना या बाळाचा सांभाळ सायण्णा दाम्पत्याने केला. त्याचाच अपघात झाल्याने कौसल्याबाई उपचारासाठी त्याला घेऊन नाशिकला गेल्या. पण त्याने काहीच बिघडले नाही, कौसल्याबाई संगमनेरला फिरकल्या देखील नाही, तरीही लोकांनी त्यांना निवडून दिले. सायण्णा आणि कौसल्याबाई यांच्या पुण्याईचा तो परिणाम होता. सायण्णा आणि कौसल्याबाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा तो सन्मान होता.

१९७५ साली देशात आणीबाणी लादली गेली. देशभर विरोधी पक्ष नेत्यांची धरपकड झाली. सायण्णा यांना देखील मिसा कायद्याखाली अटक झाली. सायण्णा १९ महिने नासिक सेंट्रल जेलमध्ये राजबंदी होते. हा काळ त्यांच्या कुटुंबियांसाठी खूपच क्लेशाचा आणि आर्थिक विवंचनेचा होता. असे असतांनाही सायण्णांच्या कुटुंबाने कोणापुढे हात पसरला नाही, लाचारी पत्करली नाही. पत्नी कौसल्याबाई आणि एकुलता एक मुलगा चंद्रकांत यांनी प्रचंड कष्ट केले. कोंड्याचा मांडा करून दिवस काढले पण समाजवादी चळवळीचा झेंडा फडकत ठेवला. सायण्णांनी देखील मोडेन पण वाकणार नाही या जिद्दीने कारावास भोगला. त्यांच्या बरोबर अटकेत असलेल्या अनेकांनी माफीनामे लिहून दिले आणि तुरुंगातून सुटका करून घेतली. सायण्णांनी मात्र शेवटपर्यंत माफीनामा लिहून दिला नाही.

१९७७ साली रितसर आणीबाणी उठली, साथी सायण्णा ताठमानेने, सन्मानाने तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगातच स्थापन झालेल्या जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिले आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड संघर्ष केला.
भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी ६ जानेवारी १९८३ ते २५ जून १९८३ पर्यंत पायी भारत यात्रा केली होती. साथी सायण्णा या यात्रेत सहभागी झाले. चंद्रशेखर हे त्यांचे आदर्श बनले. त्यांनी स्वतः चंद्रशेखर यांच्याप्रमाणेच दाढी ठेवली, त्यांच्याप्रमाणे नेहरुशर्ट आणि जॅकेट असा पोशाख घालायला सुरुवात केली. ते हुबेहूब चंद्रशेखर यांच्या सारखे दिसत त्यामुळे त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे चंद्रशेखर असे संबोधले जाऊ लागले.

१९८८-८९ मध्ये राज्य सरकारने आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगार किमान वेतन समिती नेमली. या समितीत कामगारांचे प्रतिनिधी म्हणून साथी सायण्णा एनगंदुल यांची नेमणूक झाली. सायण्णांनी विडी कामगारांचे वेतन महागाई निर्देशांकांशी जोडावे यासाठी संघर्ष केला होता. या समितीचे सदस्य होताच त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला आणि विडी कामगारांचे वेतन महागाईच्या निर्देशांकाशी जोडण्यात यावे अशी शिफारस या समितीने केली. ही शिफारस म्हणजे सायण्णांच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येला मिळालेले फळ होते.
साथी सायण्णा यांना केंद्र सरकारने दोन वेळा विडी वेलफेअर बोर्डाच्या सदस्यपदी नेमले. आपल्या या दोन टर्मच्या काळात त्यांनी विडी कामगारांना घरकुलासाठी कर्ज, विडी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, विडी कामगारांसाठी विडी वेलफेअर बोर्डाचे दवाखाने आदी प्रश्न मार्गी लावले.

साथी सायण्णा आयुष्यभर साधेपणाने जगले, वागले, राहिले. त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतला, त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात स्वतःला झोकून दिले, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात भाग घेतला, मंडल आयोगाच्या अंमलबजावणी साठी संघर्ष केला. दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओ बी सी, अल्पसंख्याक, शेतकरी, कामगार,शोषित, वंचित उपेक्षित माणसाच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर झुंजत राहिले.

साथी सायण्णा यांच्या यशात त्यांची पत्नी कौसल्याबाई यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी सायण्णा यांच्या खांद्याला खांदा लावून सर्व लढ्यात भाग घेतला, सायण्णांचा संसार सांभाळला. त्यांचे बॅक ऑफिस सांभाळले. दुर्दैवाने त्यांचे १४ सप्टेंबर २०१४ रोजी दुःखद निधन झाले.
सायण्णा यांना ९० वर्षाचे दीर्घायुष्य लाभले. ज्या कुटुंबात वयोवृद्ध माणसाची सर्वप्रकारची काळजी घेतली जाते. ज्या घरात त्यांचा मान सन्मान राखला जातो. त्याच घरात माणसाला दीर्घायुष्य शक्य असते. सायण्णा यांचा मुलगा चंद्रकांत, सून कल्पना आणि नातवंडांनी सायण्णांचा मान सन्मान राखला, त्यांची सर्व अर्थाने काळजी घेतली हे येथे मुद्दामहून नमूद केले पाहिजे.

साथी सायण्णा यांना अनेक मान सन्मान चालून आले पण त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. राज्य आणि देशपातळीवर अनेक शासकीय, बिगर शासकीय समित्यांच्या सदस्यत्वाचा सन्मान मिळाला पण ते कधी हवेत गेले नाहीत त्यांचे पाय कायम जमिनीवर होते.मिळालेल्या संधीचा उपयोग त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच केला.
लोकांच्या प्रश्नांसाठी शेकडो वेळा तुरुंगवास पत्करला. लोकांचे संसार फुलावेत यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या अवलीयाने स्वतःच्या संसाराकडे मात्र कधीच लक्ष दिले नाही. नव्वदाव्या वर्षी हे जग सोडून जातांना या माणसाच्या नावावर ना एक इंच जमीन होती, ना बँकेत काही शिल्लक होती. लौकिक अर्थाने ज्याला संपत्ती म्हणतात ती संपत्ती या माणसाने कमावली नाही पण जनतेचे अलोट प्रेम मात्र कमावले होते. तीच त्यांची अलौकिक संपत्ती होती.

असा अवलिया पुन्हा होणे नाही कामगारांचा नेता, समाजवादी साथी सायण्णा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
साथी सायण्णा झिंदाबाद – झिंदाबाद झिंदाबाद.

हिरालाल पगडाल

– लेखन : हिरालाल पगडाल. संगमनेर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments