Friday, May 9, 2025
Homeलेखनिरागस "फुलबाज्या"

निरागस “फुलबाज्या”

दिवाळीत मोठे आवाज करणारे फटाके असतात व फुलबाज्याहि असतात. तसेच पोट दुखेल एवढ हंसवणारे विनोद किंवा हळुच, खुदकन् हंसू येईल असे निरागस विनोदही असतात.

अशा या खऱ्या घडलेल्या प्रसंगांच्या “विनोदी फुलबाज्या,” खास दिवाळी साठी तुम्हांला पाठवत आहे.
हा लेख “चिमुकले विनोद” या सदराखाली, टोरोंटोहून प्रसिद्ध होण्याऱ्या त्रैमासिकात, वेगळ्या स्वरूपांत, २००३ मधे प्रसिद्ध झाला होता. आता ते मासिक बंद पडले आहे. पण त्यावेळच्या संपादकांच्या अनुमतीने परत लिहून येथे देत आहे.

लहान मुलांच मन खुप निर्मळ असतं. उत्स्फुर्तपणे ते जेंव्हा काही बोलतात तेंव्हा त्यातून निरागस विनोद होतात याची त्यांना अजिबात जाणिवहि नसते.

माझी मुले लहान असतांनाचे असेच काही गंमतीशीर प्रसंग व विनोद सांगणार आहे. माझी मुलगी वय वर्षे साडेचार व मुलगा तर सहा महिन्याचा असल्यापासुन इथे यु.के. मधे वाढले आहेत.
( पहा “आम्ही युकेकर“, १७ सप्टेंबरचा याच पोर्टल वरील माझा लेख). तेहि स्काॅटलंडमधे जिथे आम्ही एकटेच भारतीय होतो. घरात आम्ही मराठीच बोलायचो पण बाहेर इंग्लिश. त्याची मला व मुलांना हळूहळू सवय होत होती. पण काही वेळेस त्यातून विनोदहि व्हायचे.

पहिले सहा महिने लार्गज् मधे व नंतर साॅल्टकोटस् ला सोनल शाळेत खुप छान रमली होती. माॅयरा, फिओना, सुझन, या मैत्रीणी पण मिळाल्या होत्या. दर शनिवार/रविवार बहुतांशी सगळ्यांना इथे सुट्टी असायची. माझे यजमान त्या दिवशी घरी होते. सोनल, सुझन खेळत होत्या. मी दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. बाहेरून काहीतरी जळत असल्याचा वास आला म्हणून, आम्ही खिडकीतून बाहेर बघितलं तर ३/४ घर टाकून एका घराच्या छप्परातून धूर येत होता.

सोनल मराठी उत्तम बोलायची. आम्ही दोघं, “कशामुळे आग लागली असेल”, असं एकमेकांशी बोलत होतो. लग्गेच सोनल धावत येऊन मला बिलगत, तिच्या नेहेमीच्या ठसकेबाजपणे, प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाली “मल्ला माहितीय कश्शामुळे “आग” लागली असेल”. आम्ही दोघं चकीत झालो. घरात खेळतीय मग हिला कस माहिती ? “अग सोनू, तुला कस माहिती ?” असं मी विचारल्यावर “आई, (मी तोपर्यंत मम्मी नव्हते झाली) मला ~~वाटतय ~~ की कोणीतरी ना, त्या घराच्या छप्परावर मिरच्या टाकल्या असतील”. म्हणजे भारतांत असतांना “मिरच्यांना हात लावायचा नाही. नाहीतर हाताची, डोळ्यांना हात लागला तर डोळ्यांची “आग” होईल”, हे सांगीतल होत ना त्याची पक्की आठवण ठेवली होती माझ्या सोनूलीनी. काय विनोद केला हे तिला कळलंहि नाही. “माझी सोनू गं” म्हणत मी तिला हंसत जवळ घेतलं. आम्ही दोघं हसलो म्हणून ती पण हंसू लागली.

दुसरी एक आठवण आमचा बबलू जेमतेम दोन वर्षांचा असेल तेंव्हाची आहे. व्यवस्थित बोलायला लागला होता. मराठीतून इंग्लिश मधे हळूहळू परिवर्तन होत होतं. मराठीचं इंग्लिशीकरण सुद्धा करायचा. म्हणजे, “look I am पळींग”, असं गंमतीदार बोलायचा. सोनल वडीलांना “बाबा” म्हणायची आणि मी आमच्या काळच्या बाळबोध वळणामुळे त्यांना “अहो” म्हणत असे. त्यांना नांवानी हांक मारणारे दुसरे कोणी नव्हतेच. काही कामासाठी मी बाहेर पडले होते. आमचे बबलू महाशय पुश चेयर मधे बसून मस्तपैकी बडबडगीत म्हणत होते. तेवढ्यांत समोरून एक वयस्क बाई आल्या. आम्हीच एकुलते एक भारतीय, त्यामुळे मुलांच खुप कौतुक व्हायचं. छान स्काॅटीश उच्चारांत त्यांच, बबलूचे, “किती छान मोठ्ठे डोळे आहेत” इत्यादी कौतुक करणे चालू होतं. “तुझं नाव काय, तू शाळेत जातोस का” वगैरे नेहमी विचारले जाणारे प्रश्न सुरु होते. “तुझे डॅडी कुठे आहेत”? “आॅफीस” असं बबलूच व्यवस्थित उत्तरे देणेहि चालू होते. त्या बाईंनी “तुझ्या डॅडीच नांव काय”? विचारल्याबरोबर बबलूनी पटकन् “अहो” म्हणून उत्तर दिलं. मी “अहो” म्हणायची त्यामुळे त्याला तेच नांव आहे असं वाटल. मला तर हंसू येत होतंच पण पुढे त्या बाईंनी “ओ, व्हाॅट अे, ब्यु~ब~टी~फु~ल नेम” असा त्यांच्या किंचीत हेल काढलेल्या स्काॅटीश उच्चारात प्रतिसाद दिला. मग मात्र मला हंसू आवरण फार कठिण वाटल. बबलूची स्पॅनीश बायको मात्र त्याला “यू आर् माय ‘अहो'”. म्हणून चिडवत असते.

अशीच आणखी एक खुप मजेशीर आठवण. बबलू चार वर्षांचा व्हायच्या आधी त्याला शाळेची सवय व्हावी म्हणून त्याला जवळच्या एका प्ले ग्रुप, म्हणजे “किंडर गार्डन” मधे घेऊन जायच ठरवल. मला वाटल होते की मी निघाले की हा रडणार. कुठल काय. एवढी प्रचंड वेगवेगळी खेळणी व त्याच्या वयाची मुल-मली पाहिली आणि स्वारी एकदम खुश होऊन, मला टाटा करून, आत पसार झाली. मीच स्वत:चे डोळे पुसत घरी आले. दोन/तीन महिने झाले होते. रोज घरी आल्यावर तिथे कोण-कोण मित्र, मैत्रीणी मिळाल्या, काय खेळला, वगैरे सविस्तर, मराठी/इंग्लिश दोन्ही मिसळवून सांगायचा. तिथे मुलांना सोडायला येणाऱ्या आयांशी माझी ओळख व पुढे मैत्री झाली. अॅंडीच्या आईला नुकतीच मुलगी झाली होती. तिच्याशी तर खुप छान मैत्री झाली. पण त्या सगळ्या व शिक्षिका सगळ्या बायकाच व त्या पण सगळ्या स्काॅटीश. म्हणजे, गोऱ्यापान. माझ्यासारख्या ब्राऊन रंगाच्या नाहीत. हे त्याला जाणवायला लागले होते. घरी आल्यावर “आय वाॅंट व्हाईट, व्हाईट मम्मी” म्हणायला लागला होता. मी त्याच्या डॅडींना तक्रारीच्या सुरांत सांगीतले. अशावेळी चिडवायची संधी सोडणारा एकतरी नवरा आहे का या जगात ? “मग, तो एवढे म्हणतोय तर मला पण आता काहीतरी विचार करायला पाहिजे”, असं बोलून आगीत तेल ओतायचे.

भारतांतल्या सगळ्या जवळच्या लोकांची ओढ लागली होती. नकारात्मक विचारसरणी होऊन खुप चिडचिड होत असे. असच एकदा मिस्टरांच्या चिडवण्यामुळे चिडून, रागाच्या भरात “मला इथे अगदी कंटाळा आलाय, मी परत जाते” असं सांगून टाकले. सोनलही माझ्याबरोबर यायला तयार झाली. “मला भारतात यायचेच नाही”, असं म्हणायची “शिंग” फुटली नाहीत हे पाहून मला जरा समाधान वाटले. पण आमच्या बबलू महाराजांनी मात्र “तू जा”, असं खुश्शाल सांगीतल्यावर मी अवाक होऊन बघतच राहिले. त्याला एक धपाटा घालावासा वाटला. रागानी त्याच्याकडे बघत “मग तुमच्या दोघांचे कोण करेल, जेवायला कोण घालेल”, असं थोड दरडावूनच विचारल्यावर, “व्हाईट, व्हाईट मम्मी करेल”, हे एैकून आणि त्याच्या डॅडींचे मिस्किलपणे माझ्याकडे पाहून हंसणे बघून, आग केवढी भडकली असेल याची तुम्हीच कल्पना करा.

“हो, कुठे मिळणार आहे रे, तुम्हाला, ही व्हाईट, व्हाईट मम्मी ?”, मी असं आणखी आवाज चढवून विचारले. बबलू, एक क्षणभर विचार करून, शांतपणे, त्यांत काय विशेष आहे, अशा अविर्भावात म्हणाला, “आम्ही हाॅस्पिटलमधे जाऊ, तिथून बेबी गर्ल घेऊ, ती मोठ्ठी झाली की मम्मी होईल, मग आमच्याकडे लुकआफ्टर करेल”, झालं, हे एैकल्यावर कसा राग टिकणार ? रागाचे पाणी, पाणी होऊन डोळ्यांतून वाहायला लागले. मोठ्यांदी हसत, “माझा बुद्दुसिंग”, म्हणत त्याला मिठी मारली. सोनलहि हंसायला लागली. ते बघून बबलू पण हंसू लागला. आपण केवढा मोठा विनोद केला हे त्याला कळलंच नव्हत. आता मिस्टरांना चिडवायची संधी मला मिळाली आणि मी ती अजिबात सोडली नाहीच हे तुम्हाला सांगायला नकोच.

लीना फाटक

– लेखन : सौ. लीना फाटक, वाॅरिंग्टन,
– संपादन : देवेंद्र भुजबळ. +91 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
शितल अहेर on रेघोट्या…
शितल अहेर on हास्य दिन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on समस्यांना कॉमा करा आणि पुढे जा…– अलका भुजबळ
सौ.मृदुलाराजे on कामगार चळवळीचा इतिहास