Thursday, September 18, 2025
Homeबातम्या"निर्भय पत्रकारितेसाठी स्वातंत्र्य आवश्यक" - देवेंद्र भुजबळ

“निर्भय पत्रकारितेसाठी स्वातंत्र्य आवश्यक” – देवेंद्र भुजबळ

वृत्तपत्रे जनतेचा आवाज असला तरी पत्रकारांच्या जीवितालाच धोका असेल तर ते निर्भयपणे काम करू शकतील का ? हा खरा प्रश्न आहे. यामुळे जागतिक स्तरावर पत्रकारिता धोक्यात आली आहे असे मत निवृत्तमा माहिती संचालक, माध्यम अभ्यासक तथा ‘न्युज स्टोरी टुडे‘ या वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केले.

३ मे, या जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून ‘हॅलो सह्याद्री’ या थेट प्रसारित झालेल्या कार्यक्रमात निवेदिका चैताली कानिटकर यांनी दिलखुलासपणे त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

पत्रकारांसाठी धोकादायक समजल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या ५ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. तसेच वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याच्या निर्देशांकात
१८० देशांच्या यादीत भारत १४२ व्या क्रमांकावर आहे, ही अतिशय खेदाची बाब आहे असे सांगून त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

ज्ञान व माहिती देणे आणि मनोरंजन करणे ही वृत्तपत्रांची मूलभूत कर्तव्ये आहेत. वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार्‍या बातम्या आणि लेखांमुळे लोकांची मते तयार होतात. म्हणजेच समाजमन घडवण्याचे काम वृत्तपत्रे करतात, असे सांगून ज्या राष्ट्रात वृत्तपत्रांना स्वातंत्र्य आहे, ती जनतेसाठी अधिक प्रभावीपणे काम करत आहेत पण जगातील राजेशाही, हुकूमशाही, साम्यवादी आणि अन्य प्रकारच्या राजवटी असलेल्या देशातील वृत्तपत्रे लोकशाही असलेल्या देशातील वृत्तपत्रांप्रमाणे स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आज सोशल मीडिया प्रभावी झाल्याचे आपणास दिसून येते. सोशल मीडियामुळे आपले विचार, मते, अनुभव, अपेक्षा मांडण्यासाठी सर्व नागरिकांना मुक्त व्यासपीठ मिळाले आहे. पण काही वेळा, काही जण कुणाबद्दल काहीही गलिच्छ भाषेत लिहितात, काहीही बोलतात हे अतिशय चुकीचे असून स्वातंत्र्य म्हणजे स्वैरपणा असेही भुजबळ यांनी यावेळी एका प्रेक्षकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

पत्रकाराला काम करताना आज मर्यादा येत आहेत कारण भारतात श्रमिक पत्रकारांसाठी लागू असलेल्या कायद्याप्रमाणे नेमणुका न होता त्या कंत्राटी पद्धतीने करण्याची पद्धत सुरू झाली. त्यामुळे पत्रकारांना कायद्याचे संरक्षण राहिले. यासाठी पत्रकार संघटनांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तत्काळ बातमी देण्याच्या घाईतही पत्रकाराने आपली विश्वासार्हता सतत जपली पाहिजे. त्याच्याशी तडजोड करता कामा नये असेही त्यांनी स्पष्ट केले.

पूर्वी वृत्तपत्र क्षेत्रात आजच्याएवढे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. तंत्रज्ञान जसं बदलत जाते, तसे पत्रकारांनीही बदलले पाहिजे, असा सल्लाही भुजबळ यांनी यावेळी दिला.

तरुणांनी मुळात आपली आवड ओळखून हे क्षेत्र निवडल्यास त्यांना त्यांचे करिअर निश्चितपणे करता येईल आणि त्याचा आनंदही त्यांना मिळू शकेल, असे सांगून हे क्षेत्र ग्लॅमरस जरी असले तरी अतिशय आव्हानात्मक असल्याने पूर्ण विचार करुनच या क्षेत्रात आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

पूर्वी पत्रकारिता अभ्यासक्रम ठराविक विद्यापीठांतून शिकवला जात असे. आता मात्र विविध महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेता येते. त्यामुळे भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत, त्याचा लाभ आजच्या तरुणांनी घ्यावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

अभ्यासू पत्रकार कसे व्हायचे, या एका प्रेक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, मुळात वाचन, लेखनाची आवड असली पाहिजे. अभ्यास करण्याची वृत्ती असली पाहिजे. नवनव्या प्रवाहाबाबत त्याने सजग राहिले पाहिजे. केवळ नोकरी म्हणून न बघता, आजुबाजूंच्या घटनांचे अवलोकन करुन जागरुकपणे पत्रकारिता करावी, असेही त्यांनी सांगितले.

आज महाराष्ट्रासारख्या राज्यात अधिस्वीकृती पत्रिका धारक पत्रकारांसाठी अनेक सुविधा आहेत. पत्रकार कल्याण निधी, पत्रकार सन्मान योजना, एसटीने मोफत प्रवास, रेल्वेमध्ये पन्नास टक्के सवलत, वैद्यकीय उपचार, सवलतीच्या दरात शासनाची विश्रामगृहे मिळणे, वृत्तपत्र शासनमान्य यादीवर आल्यास शासनाच्या जाहिराती मिळणे अशा विविध बाबींची माहिती त्यांनी यावेळी दिली.

डॉ आलोक खोब्रागडे निर्माता असलेला हा जवळपास एक तासाचा संपूर्ण कार्यक्रम आपण दूरदर्शनच्या यू ट्यूब वर पाहू शकता. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आपल्याला जर श्री देवेंद्र भुजबळ यांच्याशी संपर्क साधावयाचा असेल तर आपण त्यांच्या +91 9869484800 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर देवेंद्रजी भुजबळ यांची पत्रकारिता विषयावरील मुलाखत पाहिली. खूप मार्मिक शब्दात त्यांनी पत्रकारितेबाबत आपले परखड विचार मांडले आणि ते पटलेही. आज पत्रकार सुरक्षित नाही. ही बाब आपल्या देशात फारच गंभीर स्वरूप धारण करत आहे. यामुळे भविष्यात पत्रकार निर्भीड भाष्य करताना विचार करतील अशी भीती वाटत आहे. तसे होऊ नये. देवेंद्रजी, आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन… धन्यवाद

  2. 🌹माननीय श्री भुजबळ साहेब, अभिनंदन 🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

  3. देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या मुलाखतीत वृत्तपत्राचा वाढता प्रभाव असूनही या प्रवासात निर्भीड आणि निर्भय पत्रकारितेसाठी पत्रकारांच्या सुरक्षिततेची गरज प्रतिपादन केली.पत्रकारांनीही विश्वासार्हता टिकवण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. यशस्वी पत्रकारांसाठी आवश्यक बाबींचे त्यांचे विवेचन अभिनंदनीय आहे.

  4. श्री. देवेंद्र भुजबळ यांची दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर पत्रकारिता
    या विषयावर झालेली मुलाखत ऐकण्यासारखीच आहे.
    पत्रकारिता आणि पत्रकार,आजचे कालचे, त्यांच्या समस्या,
    त्यांच्या मर्यादा ,सुविधा या सर्व मुद्यावरच्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत
    समंजसपणे ऊत्तरे दिली. पत्रकार हा भयमुक्त असावा हे त्यांचे विधान पटले.ज्ञान, माहिती आणि मनोरंजन हे पत्रकाराचे महत्व काम.त्यांत सौदेबाजी नसावी हा संदेशही त्यांनी त्यांच्या मुलाखतीतून सहजपणे दिला.
    सुरेख मुलाखत.
    अभिनंदन आणि धन्यवादही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा