नमस्कार मंडळी.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी प्रसिद्ध करण्यात येणारा पत्रकार दिवाळी अंक तांत्रिकदृष्ट्याच दर्जेदार झाला आहे, असे नाही तर आशयाच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण आणि अतिशय वाचनीय झाला आहे. अशा या सर्वांग सुंदर अंकात माझी
“निवृत्तीचे तोटे” हा विनोदी लेख प्रसिद्ध झाला आहे.

आपले लेखन काहीही काटछाट, दुरुस्त्या न करता प्रसिद्ध झाल्याचे पाहून मला शब्दातीत आनंद झाला. या अंकाचे संपादक, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण, कार्यकारी संपादक श्री शैलेंद्र शिर्के आणि सर्व संपादकीय चमुचे मनःपूर्वक आभार.आपल्याला हा लेख नक्कीच आवडेल, अशी आशा आहे. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, कल्पना, अनुभव कथन स्वागतार्ह आहे.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ
“निवृत्तीचे तोटे”
(हा काल्पनिक, विनोदी लेख आहे. काही सत्यता आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !)

नोकरीत होतो, तेव्हा कधी एकदा निवृत्त होतो, मनासारखे जीवन जगायला लागतो असे सारखे वाटत राहायचे आणि आता निवृत्त झालो तर दिवसेंदिवस उगाच निवृत्त झालो, असे वाटत आहे. हे म्हणजे कधी एकदा लग्न होते, असे वाटत रहाते. नंतर लग्न होते. मधूचंद्राचे क्षणनक्षण, दिवस, महिने, वर्षे भूर्कन उडून जायला सुरुवात होते, तसतसे कुणी कडून लग्नाच्या फंदात पडलो, एकटा होतो तेच बरे होते… असे वाटायला लागते.
नेमके तसेच नोकरी लागली की, सुरुवातीचे दिवस, महिने, वर्ष भर्रकन निघून जातात. पण नंतर मात्र जसजसे दिवस जाऊ लागतात, तसतसे निवृत्तीचे वेध लागतात. कधी एकदा निवृत्त होतो, असे वाटत राहते. पण एकदा खरंच निवृत्त झाल्यानंतर दोनतीन महिने इकडे तिकडे फिरून झाले की निवृत्तीचे तोटे लक्षात यायला लागतात.
पहिला मुख्य तोटा म्हणजे, महिन्याला मिळणाऱ्या पगाराच्या अर्धीच रक्कम हातात यायला लागते. पूर्ण पगार मिळत असतानाचे आपले महिन्याचे जे काही बजेट, आवडीनिवडी, छंद असतात त्यावर आता पहिल्यासारखा खर्च करता येत नाही! प्रत्येक क्षणी ही बाब मनाला टोचत राहते की, आता आपल्याला पगार नाही, तर पेन्शन मिळतेय आणि मिळतेय त्या पेन्शनमध्ये सर्व काही भागणार नाहीय, त्यामुळे आता अनिच्छेने का होईना काटकसर करत जगावे लागणार आहे.
दुसरा तोटा म्हणजे वर्ष भरात मिळत राहिलेल्या सुट्ट्या, राजा यांना मुकावे लागते. नोकरीत असताना ५२ शनिवार, ५२ रविवार, ३० अर्जित रजा, २० दिवस अनार्जित रजा, ८ किरकोळ रजा, १५ एक तरी जयंत्या, पुण्यतिथ्या, सण वार यांच्या सुट्या, विपश्यना करण्यासाठी मिळणारी १० दिवसांची विशेष रजा अशा एकूण १८७ दिवसांच्या रजा, सुट्ट्या बुडायला लागतात. काही खरे हुश्शार लोक तर दोन वर्षांची पूर्ण पगारी अध्ययन रजा देखील उपभोगतात. तसेच नोकरीत असताना वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षातील सुट्ट्या बघून वर्षभरात कधी, कुठे, कशासाठी जायचे याचे नियोजन करता यायचे. पण आता कधीही, कुठेही, कशासाठीही जायला आपण मोकळे आहोत, असे समजून कुठेच, कशासाठीच जायचे नियोजन होत नाही आणि मग रिकामा वेळ खायला उठतो !
आणखी एक म्हणजे, पूर्वी कुठे बायको पोरांसमवेत फिरायला जायचं म्हटलं की, कित्येकदा मंजूर झालेली रजा रद्द करून साहेबांनी कामाला यायला सांगितले आहे म्हणून भागायाचे. आता आपलीच इच्छा नसली तरी त्यांच्या सोबत मॅनेजर म्हणून जावेच लागते. न जाण्यासाठी काही बहाणाच मिळत नाही !
नोकरीत असताना लोकांकडून आपल्याला जी इज्जत मिळते, मान सन्मान मिळतो तो आपण निवृत्त झाल्याचे जसजसे लोकांना कळत जाते, तसतसा कमीकमी होत जातो. पुढे तर हा मानसन्मान पूर्णपणे संपुष्टातच येतो. सरळ लोकं आपल्याकडे ताठ मानेने बघतात ! त्यामुळे कुठे तोंड दाखवायलाच जागा रहात नाही. त्यामुळे नोकरीत ज्याचे पद जितके जास्त भारी, त्याचे दुःखही तितकेच जास्त भारी पडत जाते !
आपल्या निवृत्तीनंतर, आपल्या घरातील परिस्थितीतही आमूलाग्र बदल चालल्याचे दिसायला लागते ! पहिले वेळच मिळायचा नाही म्हणून काही आवराआवर करायला जमायचे नाही. तर तुमचे तर कधी घरात लक्षच नसते, म्हणून उठताबासता बायकोची बोलणी खावी लागायची. आता वेळ आहे म्हणून काही आवरायला जावे तर बायकोचा कर्कश्श आवाज कानावर पडतो, ती मोठ्या आवाजात ओरडून सांगत असते, थांबा हो, कुठेही हात लावू नका. तुम्हाला कुठे, काय ठेवायचे ते माहिती नाही. नको तिथे, नको ते ठेवून माझे काम आणखीन वाढवून ठेवाल. त्यापेक्षा गुपचूप जागेवर बसा.

तोंड पाडून गुपचूप जागेवर बसण्यापेक्षा आंघोळपांघोळ करून कधी एकदा घराबाहेर पडतो, असे वाटून आंघोळीला
जावे तर तेव्हढ्यात चिरंजीव, जोराने ओरडतात, थांबा हो बाबा. तुम्हाला काय आंघोळीची इतकी घाई आहे ? आधी मला जाऊ द्या. मला ऑफिसला जायचे आहे. शेवटी आपण झक्कत बायको आणि पोराच्या मध्ये सँडविच होऊन बसून रहायचे.
पोरगा बाहेर पडला की आपण एकदाची आंघोळपांघोळ आटपून घराबाहेर पडतो. लिफ्टसाठी उभे असताना, पूर्वी जसजसा एकेक जण यायचा तसतसा तो हसत मुखाने नमस्ते सर, म्हणायचा. आता बघावे तर कुणी ढुंकूनही आपल्याकडे बघत नाही.
लिफ्टमधून खाली येऊन बिल्डिंगच्या बाहेर पडताना आधी वॉचमन छान सॅल्युट ठोकत “नमस्ते साब” म्हणायचा. आता पहिल्यासारखा तो सॅल्युट ठोकेल म्हणून मोठ्या अपेक्षेने त्याच्याकडे बघितले तर आपल्याशी ओळख असल्याचेही तो चेहऱ्यावर दाखवत नाही.
नोकरीत असताना कशी बिल्डिंगच्या बाहेर येताच सरकारी गाडी दिमाखात उभी असायची. ड्रायव्हर मोठ्या अदबीने गाडीचे दार उघडून तयार असायचा. साहेबांना घेऊन जाण्यात त्याला जीवनाची कृतकृत्यता वाटायची. गाडीत बसून जाताना, असे वाटायचे, जणू आपण सर्व जगाचे राजे आहोत! पण आता कशाचे काय ? त्यात नोकरीत असताना गाडी चालविणे हे ड्रायव्हर चे काम आहे, आपले नाही म्हणून आम्ही गाडी चालवायलाच काय, ती चालवायला शिकण्यातही कमीपणा मानला. बरं, ते ओला, उबेर ने जावं म्हटलं तर ते ऍप वापरण्याची पण बोंबच आहे. त्यामुळे चरफडत रिक्षा किंवा टॅक्सी स्टँड पर्यंत पाय ओढत ओढत जावे लागते.

आधी वेळ नसायचा म्हणून घरी कधी भाजीपाला, फळे, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू आणायची वेळच यायची नाही. त्याची भरपाई म्हणून आता आपण स्वतःहून घरी भाजीपाला, फळे ,इतर काही सामान घेऊन जावे तर बाईसाहेबांचा डोळे रोखून पहिला प्रश्न असतो की, याची काय गरज होती ? हे सर्व काही घरात आहे. त्याचे उत्तर काय द्यावे हे सुचत नाही तर भाजी कशी पडली ? सोबत कडीपत्ता (फुकट) मिळाला का ? या दोन प्रश्नांनी आपण गारद पडतो. आपण गारद झाल्याची खात्री पटली की, राणी सरकार भात्यातून तिसरा बाण काढतात आणि नेम धरून आपल्यावर टाकून विचारतात, तो म्हणजे आयुष्यभर तर कधी काही आणले नाही आणि आताच कसे सुचते, काही आणायचे ? आता आपण काय बोलणार ? तरी बरं, मी भाजीपाला, फळे वगैरे वस्तू घेताना विकणारी व्यक्ती “स्त्री “नाही ना ? (त्यातही तरुण) याची सतत दक्षता घेत असतो ! तसेच आम्ही शुध्द शाकाहारी असल्याने थोर थोर लेखकांनी वर्णन केल्याप्रमाणे कोळीनींशी माझा काही संबंध पण येत नाही !)
आता मला इतका अनुभव असल्याने तसेच माझे विचारही थोर असल्याने ते ऐकवण्यासाठी मला ठिकठिकाणी भाषणे द्यायला बोलाविले जाते. काही वेळा तर गाडी भाडे, मानधन पण मिळते. हेच आपले अनुभव, विचार घरात सांगायला गेलो की, आपल्यालाच ऐकून घ्यावे लागते, ते म्हणजे आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. तुमचे ज्ञान तुमच्याकडेच राहू द्या असे ऐकावे लागल्यावर आपण काय बोलणार ?
सकाळचा वेळ तरी चांगला जावा म्हणून, आमच्या घराजवळील बागेत भरत असलेल्या हास्य क्लब मध्ये मी जायला सुरुवात केली. बरेच दिवस नियमित गेलो. मधे काही कारणांनी बाहेर गावी जावे लागले. परत आल्यावर नेहमीप्रमाणे हा हा, हुं हु असे दहा पंधरा मिनिटे झाल्यावर एका सदस्याने, गंभीर चेहऱ्याने विचारले, तुम्ही दिसले नाही तर आम्हाला वाटलं, गेले. (म्हणजे मेले !) तेव्हापासून मी कधी बाहेरगावी जाणार असेल तर, हास्य क्लब च्या सर्व सदस्यांना कुठे चाललो आहे, किती दिवस इथे येणार नाही, असे मोठ्याने ओरडून अवगत करीत असतो. एक प्रकारे जाण्याची त्यांची परवानगीच घ्यावी लागते.
असाच अनुभव एका सहकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात आला. खूप दिवसांनी भेटलेल्या दुसऱ्या एका सहकाऱ्याने तोंडावरच विचारले, अरे तू आहेस ? मध्ये कुणीतरी बोलले,तू गेलास (मेला) म्हणून ! ते ऐकताच मलाही प्रश्न पडला की मी खरंच आहे की गेलो म्हणून ! पण तेव्हापासून मला ज्या ज्या महानुभावांनी, मला न विचारताच त्यांच्या त्यांच्या वॉट्स अप ग्रुपचे सदस्य करून घेतले आहे, त्या त्या ग्रुपवर, इच्छा असो की नसो, काही तरी टाकत बसावे लागते. काही आवडले, नाही आवडले तरी आपला अंगठा दाखवावा लागतो. त्यामुळे इतरांची खात्री पटते की, मी गेलो नाही, अजून आहे !
कामाच्या बाबतीत बोलायचे तर माझ्या पदावर आलेला अधिकारी, जो खरे म्हणजे माझा “ज्युनिअर” होता, तो प्रत्येक बाबतीत कसा चुकतोय, त्याने काय करावे, कसे करावे, काय करू नये, कसे करू नये म्हणून मी खाजगीतून सल्ले न देता जाहीरपणे त्याला आणि सर्व खात्याला सल्ले देतो.
त्यात परत नोकरीत असताना कधी काही विचार करण्याची वेळच यायची नाही. साहेबांनी सांगितलेले सर्व काही ब्रह्मवाक्य समजून डोळे झाकून अंमलात आणायचे किंवा अंमलात आणून घ्यायचे इतकेच काम असे. त्यामुळे विचार करण्याचा रिकामा उद्योग करायला वेळच मिळायचा नाही. आता निवृत्तीनंतर साहेबांचा दबाव जसजसा कमी कमी होऊ लागला, तसतसे एकेक विचार उसळी मारून वर यायला लागले आहेत. एकेक महान कल्पना सुचायला लागल्या आहेत. त्याच्या परिणामी नोकरीत एरव्ही कधी तोंड न उघडणारा मी, आता अख्ख्या सरकारलाच आणि सरकार म्हणजे नुसते राज्य सरकार नाही महाराजा, तर भारत सरकार ला देखील सुनवयाला कमी करत नाहीय ! काही जागतिक पातळीवरचे प्रश्न असतील तर त्या त्या बाबतीत मी त्या त्या सरकारांना, जागतिक संघटनांना देखील, त्या विषयातील माझ्याशिवाय दुसरा कुणी तज्ञ नाही, अशा अधिकारवाणीने सल्ले देत असतो. याद्वारे मी विश्वाची सेवा करत असतो. पण काही नतद्रष्ट व्यक्ती अशा असतात की, मी कोण होतो, याचा काही भीडभाड न ठेवता त्यांना समाज माध्यमाद्वारे मिळालेल्या स्वातंत्र्याचा “गैरफायदा” घेऊन सरळ विचारतात, की तुम्ही पदावर होते, त्यावेळी का नाही, आता सांगताय ते केले ? आता बसलेत, इतरांना अक्कल शिकवत ! आता बोला, काय बोलायचे ?
आता मी स्वतः निवृत्त असुनही कुठल्याही निवृत्ताला कधी भेटत नाही. तो “निवृत्तबंधू” दुरूनच दिसला की, त्याचे तोंड चुकवतो. चुकून जर आपण त्याच्या तावडीत सापडलोच समजा की तो त्याचे सनातन दुःख उगळायला सुरुवात करतो,
ते म्हणजे नोकरीत त्याच्यावर कसा अन्याय झाला, पदोन्नती कशी डावलण्यात आली, माझ्याच किती बदल्या झाल्या, इतरांकडून न होऊ शकणारी कामेच वरिष्ठ आपल्याला सांगून, कसे गोत्यात आणायचा प्रयत्न करायचे, तरी मी कसे हुशारीने काम करून त्यांचे नाक कापायचो, मला जी ग्रेड, पे स्केल मिळायला हवे होते ते न मिळाल्याने पेन्शन कशी कमी बसली वगैरे वगैरे ऐकले की, माझ्या पोटात गोळाच येतो, तो अशासाठी की मी जरी स्वतःला फार लोकप्रिय, कार्यक्षम अधिकारी समजत आलो तरी पण माझे कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी माझ्या विषयीही असेच “काही बाही” तर बोलत नसतील ना ?
जाऊ द्या, आता माझे “तोटे पुराण” इथेच थांबवतो. नाही तर लेखाच्या ऐवजी कादंबरी होईल. वाचता वाचता तुम्हालाही वाटेल, हा बाबा निवृत्त झाला आणि आता सर्व वाचण्यासाठी आम्हाला वेठीस धरतोय म्हणून ! त्या पेक्षा निवृत्त झाला नसता तर बरे झाले असते !!
टीप : निवृत्तीमुळे झालेल्या तोट्यांमध्ये भर घालण्याची, माझ्या दुःखात सहभागी होण्याची कुणाची इच्छा आणि महत्वाचे म्हणजे हिम्मत असेल तर त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आपले नाव जाहीर न करण्याच्या अटींवर काही सांगायचे असेल तर तशी “गोपनीयता” नक्की पाळली जाईल. (आमचे काही अनुभवी सहकारी सांगत की ज्या गोष्टींचा खूप बोभाटा व्हावे असे वरिष्ठांना वाटते, ते त्या बंद, खाकी लखोट्यावर, मुद्दाम ठळक शब्दात गोपनीय असे लिहून पत्र पाठवितात. त्यामुळे ज्याला, ज्यासाठी पत्र पाठविलेले असते, ते त्याच्या हाती पडण्याआधीच त्या बाबीचा जगभर बोभाटा झालेला असतो !) मी मात्र असे कधी काही केले नाही आणि खरं म्हणजे, केले असेलही तरी काही आठवत नाही. निवृत्तीची वर्षे वाढत चालल्यानेही कदाचित असे होत असावे !

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
निवृत्त माहिती संचालक (नवी मुंबई.)
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या दैनंदिन जीवनाचे उत्तम विश्लेषण केले आहे त्याबद्दल आपले आभार