Wednesday, March 12, 2025
Homeयशकथानिश्चयाचा महामेरू : प्रांजल पाटील

निश्चयाचा महामेरू : प्रांजल पाटील

कुटुंबियांचा सक्रिय पाठिंबा आणि मुले जिद्दी असतील तर गगन ठेंगणे प्रगतीसाठी. कल्पनाविलास नव्हे, ऐका तर मग गोष्ट उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका कुटुंबाच्या जिद्दीची, इवल्याश्या प्रांजलची !

जन्मत:च अधू डोळे असलेल्या प्रांजलला शाळेत तिच्या वर्गातल्या एकाने तिच्या डोळ्यावर पेन्सिल मारल्याचे निमित्त झाले लगेच हॉस्पिटलकडे धाव घेऊनही डॉक्टर तिचा डोळा परत आणू शकले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार उलट काही काळातच हळूहळू दुसरा डोळाही दृष्टीहीन होईल आणि खरोखर वर्षभरातच प्रांजलला वयाच्या सहाव्या वर्षी पूर्णपणे अंधत्व आले. शिक्षण थांबू नये म्हणून आई -वडिलांनी मन घट्ट करून दादरला कमलाबाई मेहता शाळेत तिच्यासाठी प्रवेश घेतला. या शाळेत ब्रेल लिपीत शिकवलं जातं. तिथं तिला सोमवारी सोडायला लागायचे आणि शुक्रवारी घरी आणता यायचे. वाईट वाटायचे इतक्या लहान वयांत, त्यातून दृष्टी नाही, कसं करेल लेकरू पण तिच्याच शिक्षणासाठी मनावर धोंडा ठेवावा लागे. दोन दिवस पूर्ण तिच्यासाठी ! तिला पेपर वाचायला आवडे म्हणून या दोन दिवसांत आठवड्याची वर्तमानपत्रे वाचून दाखवित. १० वी पर्यंत हाच परिपाठ.

प्रांजलने अकरावीत उल्हासनगरमधील CHM या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये सोडायची जबाबदारी आईने घेतली. शिवाय भाऊही तिला सोडायचे व आणायचे आनंदाने करू लागला. इंग्रजी माध्यम जड जातेय हे जाणवताच त्याने अभ्यासाचं साहित्य कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून तिला ऐकावयास सुरुवात केली. बारावीला ८५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला

सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी सगळ्या सोयीसुविधा होत्या. तेथून प्रांजल ने पदवीचं शिक्षण घेतलं. आतापर्यंत तिनं आपल्या अवस्थेशी जुळवून घेतलं होतं, पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ गाठलं. दिल्लीला एकटं कसं राहणार याबाबत आई-वडील साशंक होते.पण हळूहळू प्रांजल तिथं रुळली आणि आठ वर्षं दिल्लीत एकटं राहून तिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून M.A., M.Phill आणि Ph.D चा प्रबंध पूर्ण केला. इतकंच काय NET आणि SET परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाली.

प्रांजल ने M.Phill नंतर नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. त्याबद्दल सांगतांना त्या म्हणतात, “सुरुवातीचा काळ कोणती पुस्तकं वाचायची हे कळण्यातच गेला. माझ्या कॉम्प्युटरवर स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं. या सॉफ्टवेअरमुळे स्क्रीनवरच्या गोष्टी ऐकता येतात. मग मी अभ्यासाचं साहित्य PDF स्वरुपात कॉम्प्युटर वर लोड केलं. NCERT ची पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे तितकी अडचण आली नाही. असं साहित्य ऐकून मी अभ्यास केला.”

अनेकदा हेडफोन लावून प्रांजलचे कान दुखायचे. तेव्हा डोळे गेले आता कानांना तर कांही होणार नाही नां अशी चिंता त्यांना सतावायची. JNU मधली त्यांची एक मैत्रीण पूर्व आणि मुख्य परीक्षेला लेखनिक म्हणून यायची. परीक्षेचं प्रेशर खूप होतं पण त्यांनी धीर सोडला नाही कधी. यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिव्यांगांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही. तसेच ग्रंथालयातील पुस्तकांवर अनेक विद्यार्थी मार्किंग करत असल्याने, त्याचे कॉम्प्यूटरवर स्कॅन करताना आवश्यक भाग स्कॅन होत नाहीत. अशावेळी महत्त्वाचाच भाग वगळला जातो. ते बंद व्हावं यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रांजलना भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. शारीरिक विकलांग कोट्यातून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती पण तरीही रेल्वेनं अंध व्यक्तीला घेण्यास नकार दिला. ही घटना म्हणजे नव्या संघर्षाची सुरुवात !
याबद्दल बोलतांना त्या म्हणतात, “३ डिसेंबर २०१६ ला माझी मुख्य परीक्षा सुरू होणार होती त्याच्या आदल्या दिवशी हा सगळा प्रकार सुरू झाला. मला काय करावं काही कळत नव्हतं. परीक्षा दिली. नंतर DoPT (कार्मिक विभाग) ला गेले. पहिल्यांदा मला काहीच माहिती मिळाली नाही.वेगवेगळे पर्याय शोधायला सुरुवात केली. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना भेटले. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना भेटले. शेवटी मला P&T Finance मध्ये नोकरी मिळाली. तिथं मात्र मला रुजू व्हावं लागलं. कारण DoPTच्या मते त्यांनी मला सर्व्हिस देण्याचं काम तर केलं होतं. मी जर रुजू झाले नसते तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. मग मला पोस्ट अँड टेलिग्राफच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही जॉईन करा मग वाटलं तर तुम्ही रेल्वेसाठी प्रयत्न करा”.

आपल्या पहिल्या प्रयत्नातच प्रांजलने यूपीएससी परीक्षेत ७७३ वं स्थान मिळवलं होतं. ३० वर्षीय प्रांजलने २०१७ मध्ये आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करत १२४ वं स्थान मिळवलं.ही एक अभूतपूर्व कामगिरी ! प्रांजल लहेनसिंग पाटील ही अंध विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातून भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) परिक्षेत पात्र ठरणारी पहिली महिला आहे. मग प्रशिक्षणानंतर प्रांजलने २०१७ मध्ये केरळच्या एर्नाकुलममध्ये असिस्टट कलेक्टर म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
भुसावळ येथे रहाणारे, स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या कोमल पाटील यांनी २०१५ मध्ये प्रांजल शी विवाह करून एक नवा आदर्शच समाजापुढे ठेवला.प्रांजल यांना प्रत्येक टप्प्यावर कोमल यांनी साथ दिली आणि देत आहेत. सासरच्या कुटुबियांचीही त्यांना खंबीर साथ मिळाली आहे.

देशातील पहिली दृष्टीहिन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटीलने, १४ ऑक्टोबर २०१९ रोजी तिरुवनंतपुरममध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. खरी परीक्षा आता सुरू झाली पण ती देण्यासाठी प्रांजल सज्ज झाल्या पूर्ण आत्मविश्वासासह. त्यानंतर, त्यांनी तिरुवनंतपुरमचे उप-जिल्हाधिकारी आणि नंतर एर्नाकुलमचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून डिसेंबर २०२३ पर्यंत काम केले. आजमितीला त्या दिल्लीतील शिक्षण संचालनालयात अतिरिक्त संचालक (प्रशासन) या पदावर कार्यरत आहेत.

आईवडील कोणत्याही विपरीत परिस्थितीत मुलांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले तर मुले गगनाला गवसणी घालायच्या ताकदीने आत्मनिर्भर होतात हेच प्रांजलची यशोगाथा जगाला सांगते.

अपंगत्व ही केवळ मनाची स्थिती असते हे प्रांजल यांनी हे सिद्ध केले. इच्छाशक्ती आणि श्रद्धेला अथक प्रयनांची जोड दिली तर कोणालाही काहीही असाध्य नाही हेच खरे !

नीला बर्वे

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
(स्रोत : आंतरजाल)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम