छोट्या छोट्या रचनांमधून महाराष्ट्रातील तमाम मराठी रसिकांना आनंद देणारे आणि खळखळून हसविणारे संगमनेरचे सुपुत्र आमचे मित्र कविवर्य श्री मुरारबाजी देशपांडे सर यांचे निरीक्षण अतिशय बारकाईचे असते. छोट्या छोट्या गोष्टीतून बरोबर अचूक विसंगती टिपून त्यामधून हलक्या फुलक्या आनंददायी वात्रटिका तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
अशीच एक छान वात्रटिका
वाचू या आणि खूप हसू या !
– संपादक
असल्या कसल्या जाहिरातीत
सामील झालीस तुही
तू विकतेस तेल पण
नवऱ्याला टक्कल जुही
तुझा सल्ला अनेकांना
खरा होता वाटला
खोटा मजकूर सांगून
तू बराच पैसा लाटला
केस उगवणे दूरच
खिशाला बसली चाट
फसव्या फसव्या तेलाची
भलतीच ‘निसरडी ‘वाट
केस गेले, पैसे गेले
तेलाने चांगलीच जिरवली
वैतागलेल्या जिवांनी
तेलाकडेच पाठ फिरवली!
टक्कल ग्रस्तांची संघटना
लवकरच होणार स्थापन
भूलथापा मारणाऱ्या जाहिराती
कां सहन कराव्यात आपण ?
— रचना : मुरारी देशपांडे. संगमनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800