Friday, November 22, 2024
Homeकलानिसर्गचित्र…

निसर्गचित्र…

गेल्यावर्षी मी सपत्नीक मुलीकडे इंग्लंडला गेलो होतो. याही वर्षी तिच्याकडेच आहे. मी इंग्लंडला चाललो हे सांगितल्यावर अनेकांनी enjoy UK trip अशा आशयाचे मेसेज मला पाठवले. मात्र इथे येतो ते तिला घरात मदत करण्यासाठी. आमच्या प्रवासाचे कारण हे पर्यटन नाही. असो….

एकतर इथे उन्हाळा. पण अनेकवेळा सहन होत नाही इतकी थंडी हवेत असते आणि इथे अधूनमधून पाऊसही पडतो. घर आवरण्यातच दिवस कसा संपतो हेच कळत नाही.

आमच्या मुलीने घरात लावायला एक सुंदर चित्र गेल्या वर्षी विकत घेतले. हाॅलमध्ये ते सुंदर निसर्गचित्र आहे. एका सायंकाळचे नदीकाठाचे ते चित्र आहे.

यावर्षी एकदा आम्ही सगळे लंडनला गेलो होतो. आवश्यक गोष्टींची खरेदी करून घरी परतायला आम्हाला उशीर झाला.
दुपारी एका भारतीय हाॅटेलमध्ये भरपूर जेवण झाले होते. रेल्वेने प्रवास करताना, खिडकीतून बाहेर पहात होतो. सूर्य मावळत होता. ढगांच्या आडून त्याची अनेक किरणे आसमंतावर विविध रंग उधळत होती. त्यामुळे गुलाबी, शेंदरी, सोनेरी अशा अनेक छटा आकाशाच्या त्या अतिभव्य कॅनव्हासवर पसरल्या होत्या. झाडे, डोंगर, टेकड्या यांच्या मूळ रंगांच्या काळोख्या छटा गडद होत होत्या. आकाशात अनेक पक्षी मुक्तपणे गिरक्या घेत होते.

घरातील निसर्गचित्र

‘घरी जाऊन तरी काय ? तेच रात्रीचं जेवण, गप्पा मारत झोपी जायचं’ या रूटीनला कंटाळलेले ते जीव स्वच्छंदपणे ढगांवर पोहत होते. हे मी पहात होतो, विनामूल्य.
घरातील निसर्गचित्र महागडे होते. मात्र हे प्रत्यक्षातील निसर्गचित्र मला अधिक सुंदर वाटले. कारण एकतर इथे जीवंत सळसळ होती. आणि यातले रंग क्षणाक्षणाला बदलत होते. इथल्या काळ्या रंगातही किती विविध छटा होत्या. माझ्या डोळ्यापुढून ते खरोखरचे निसर्गचित्र जाता जात नव्हते. खरंच खऱ्या निसर्गाची सर कशालाच नाही. नाही का ?

सतीश शिरसाट

— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. ह. मु .इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments