आपल्या इथे पानगळ सुरू झाली कि लगेच कुसूमाग्रजांची कविता आठवते.. त्या कवितेतली ही ओळ जास्त, “जिर्ण पाचोळा पडे तो उदास”…..…..आणि मन उगीचच उदास होऊन जातं.
पण अमेरिकेत पानगळ सुरू झाली कि एक रंगोत्सव सुरू होतो.जो मनाला सुखावतो. जसजशी थंडी वाढायला लागते, दिवस लहान होतात… तसतसे पानांमधले क्लोरोफिलचे साठे कमी होऊ लागतात.प्रकाश आणि उष्णता कमी मिळत असल्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदावते, त्यामुळे पानांतले हिरवे रंगद्रव्य कमी होते. आणि इतर रंग दिसायला लागतात.
निसर्गाचा हा नियमच आहे. पिकले पान गळणारच!..पण ते पान इथे उदास नाही करत. सुरू झालेले आयुष्य हे कधीतरी संपणारच आहे, पण हे सत्य, उदास होऊन नाही स्विकारायचं, तर रंग उधळत, आनंदात स्विकारायचं, हे मला इथला निसर्ग, इथली पानगळ पहातांना प्रकर्षानी जाणवलं.
झाडांनी नेत्रसुख तर दिलच, पण निसर्गाचं हे सत्य, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर निभावलेलं दाखवलं…
झाडांचा कोवळा पोपटी रंग, तारूण्यातल्या पानांचा गडद हिरवा रंग, परत येऊ घातलेली पिवळी छटा, काहींनी स्विकारलेला केशरी रंग, पटकन घातलेला लाल कोट, पहाता पहाता लालाचा तपकिरी, मग मातकट, मग जमिनीवरचा मिश्र रंगांचा सडा.. सारंच विलोभनीय ….

मॅपल (नारिंगी, लाल, किरमिजी छटा) आणि अस्पेन.. (पिवळे) ही झाडं, बर्च झाडाची पिवळी पाने (पांढरे उंच खोड ), आणि लाल झालेले ओक, पिवळे होणारे डेरेदार लिन्डेन, हॉर्नबीम, हिकोरी … ही सर्व झाडं परिसर सुंदर करतात आणि आपल्याला मोहवून टाकतात.
भारतात नवरात्रीचा .. नऊरंगांचा उत्सव चालला असतांना, अमेरिका, कॅनडा सारख्या देशांत, निसर्ग असा रंगाचा रंगोत्सव साजरा करत असतो..

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
चित्राताई,
अमेरिकेतल्या सुंदरशा पानगळीनं उभा केलेला रंगोत्सव….. त्याची तुम्ही टिपलेली छायाचित्रं पाहिली. खूप सुंदर आहेत.
या साऱ्या रंगांच्या उत्सवाचा जो शब्दोत्सव तुम्ही मांडला तो तर अप्रतिम आहे.
असंख्य रंगांच्या पानांच्या वेधक छटातून निसर्ग तर रंगांचे काव्यच तयार करत असतो.
पानगळीला खूपच सुंदर सकारात्मक दृष्टीने तुम्ही पाहिलंत. आयुष्याच्या सरत्या वर्षांच्यात मन विषण्ण होऊच नये हा फार महत्त्वाचा विचार तुम्ही मांडला आहे.
आयुष्याने जीवनभर दाखवलेले रंग, त्यांनी सजलेलं आपलं जीवन एका तटस्थ भावनेने आयुष्याच्या संध्याकाळी शांतपणे पण आनंदात निरखत राहावं. कवी ग्रेस म्हणतो तसं
*बुडता बुडता सांज प्रवाही*
*अलगद भरुनी यावे*
खरोखरच आयुष्याच्या अप्रतिहत प्रवाहात आपल्याच आयुष्याच्या सांजेच्या वेळी… आपलीच किरणे आवरून घेताना पसरलेला रक्तीमा पहात एखाद्या थेंबासारखं अनंताच्या प्रवाहामध्ये अलगद बुडून जावं…. त्याच्याशी एकरूप व्हावं. कधी मिसळलो ते समजूही नये. तीच सारकाही भरून येण्याची….. अपरमित आनंदाची…. कैवल्यावस्था असेल कदाचित !
जहाजाच्या प्रवासामध्ये जगातल्या अनेक देशांच्या मध्ये हे मनाला भुलवणारे अनेक रंगोत्सव पहायला मिळाले. निसर्गाची प्रतिभा लीला न्यारीच. प्रत्येक विभ्रम नवा, वेगळा. प्रत्येक सौंदर्य अभिजात. त्याच्यासारखं तेच.
नुसता एक हिरवा रंग तर त्याच्या अनंत छटा.
आणि परदेशातल्या पानगळीचा या बदलत जाणाऱ्या इंद्रधनुषी रंगांचा लपंडाव.
अनेक रंगात स्वतःलाच सजवून घेऊन स्वतःतंच मग्न झालेलं निसर्गाचं ते अवर्णनीय रूप. बाजूच्या कशाचंही त्याला भानच नाही बदलत्या झराळत्या आणि मावळत्या स्वतःच्या रंगांमध्ये अवगाहन करणारा निसर्ग….. परमेश्वराचं अत्यंत पावन मंगलमय अतिभव्य आणि अतिसुंदर रूप !
रंग बदलत बदलत जातात.अनेक रंगांच्या कल्लोळाचा शेवटी एका काळसर तपकिरी रंगांमध्ये विलय होणं. सारी पानं झडून जाऊन झाडाच्या पायाशीच त्यांचा सडा पडणं.
आयुष्यभर आपण भोगलेलं प्राक्तन, आपलीच कर्मं,यश, अपयश,अनुभव निसत्वपणे विखरून जाणं. सारं पर्णवैभव गळून जाऊन
पूर्णपणे फक्त सांगाडाच रहाणं.
त्यातही निसर्गाची तीच आत्ममग्नता…..विदेही आत्ममग्नता ! शरीराची रुपं बदलली तरी स्वानंदात मग्न राहणं.
यालाच स्वतःच्या आत आत *अकराव्या दिशेकडे* पाहणे असं म्हणूया का ?
ऑस्ट्रेलियात मुलीकडे मेलबर्नला गेलेलो असताना तिथून ब्राईट नावाच्या भागामध्ये गेलो होतो. ऑटमच्या सुरुवातीला ही पानांची विविध सुंदर रंगाची उधळण पाहायला लोक जगभरातून तिथे येतात. आम्ही गेलो तेव्हा छान सूर्यप्रकाश होता, पाऊस नव्हता, थंडी तर होतीच आणि वाढत चालली होती. पण तो विलक्षण नजारा मनात भरभरून घेतला….. वर्ड्सवर्थच्या
डॅफोडिल्स सारखा. तो कायम मनामध्ये ताजा राहणार आहे.
🌿🍃🍂🪸🙏
सुंदर लेख आणि फोटो.