निसर्गोपचार आश्रम आणि न्यूज स्टोरी टुडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंमेलन चांगलेच रंगतदार झाले.
प्रारंभी युवा भावेश पाटील याने गायलेल्या गणेश वंदनेने वातावरण भावपूर्ण केले.
त्यानंतर आश्रमाचे प्रमुख डॉ अभिषेक देवीकर, प्रा डॉ मीरा पिंपळस्कर, गप्पागोष्टी फेम श्री जयंत ओक, उद्योजक श्री श्रीकांत सिन्नरकर, प्रा आशी नाईक, न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्नेह मिलन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या नंतर डॉ अभिषेक देवीकर आपल्या भाषणात, आश्रमात नेहमी आरोग्यपर व्याख्याने होत असतात पण न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी काही साहित्यिक, सांस्कृतिक, प्रबोधन पर कार्यक्रम करण्याची कल्पना मांडली आणि ती पटल्याने आश्रम व्यवस्थापनाने सहमती दर्शविली असे सांगून परिपूर्ण आरोग्यासाठी सकस मनोरंजन ही आवश्यक आहे असे सांगितले.
या नंतर पौर्णिमा शेंडे यांनी निसर्गोपचार आश्रमातील दिनचर्येवर आधारीत पुढील विनोदी कविता हास्याचे मळे फुलवून गेली.
१. उरळी कांचनचे निसर्गोपचार
किती केले उपचार,….
किती केला विचार
हवे आहे आता शरीराला
शिस्तबद्ध आचार
चला जाऊ या …
आता करू या… निसर्गोपचार
ठरवले अलकाने
पाठविले मेसेज
चला आठवड्यासाठी ….
जाऊ…पुण्याजवळील उरलीकांचन येथे…
अनुभवून… तरी घेऊ..
चला आला आहे योग…
करू लंघन करू योग…
ताजेतवाने होत
आजार होईल दूर
शुद्ध हवा मोकळी जागा
सगळे भेटतील
होईल एक …टुर
आल्या आल्या भरला
एक सविस्तर फोर्म
हिरवागार मोकळा परीसर बघून
मन झाले प्रसन्न
वजन उंची लिहुन रिपोर्ट बघत
डाॅक्टरनी ट्रिटमेंट, डाएटचा लिहून दिला प्लॅन
हलका फुलका आहार
चालणं, फिरणं होत
होईल छान…. विहार
पहाटे पहाटे सर्वागीण
योगा आणि व्यायाम
नको नाश्ता नको स्वयंपाक
नाही काही काम
सकाळी डीटॉक्सचा गरम काढा
मनाला देतो साज
मग छान हलका फुलका तेलाचा
मस्त मिळतो मसाज
कधी कुणाला भाकरी
कधी कुणाला खिचडी
कधी साधं वरण तर
कधी साधी भाजी
एक वाटी ताक आणि वेगवेगळ्याचं चटण्या
शरीराला होत वंगण,
वजन येतं आटोक्यात,
निघुनच जाईल आपोआप
मग शरीरातील वात
काही वेळानंतर
आम्ही होतो खुश
वाट ज्याची पाहतो
तो येतो ज्युस ….
शरीराने व मनाने
सर्वागीण युक्त
नैसर्गिकरित्या
व्हावे व्याधीमुक्त
आयुष्यभर आरोग्य
रहावे परिपूर्ण
आयुष्यभर आरोग्य
रहावे परिपूर्ण
उरळीकांचन निसर्गोपचारचा
हाच एक धर्म
हाच एक मूळधर्म
— रचना : पूर्णिमा शेंडे.
यानंतर कवी शांतीलाल ननावरे यांनी कृष्ण कन्हैया माझा.., निवृत्त पोलिस उपअधीक्षक सौ सुनीता नाशिककर यांनी गायलेले मधुबन खुशबू देता है… हे गीत दिल्ली निवासी श्री गुलशन बजाज यांनी गायलेले किशोर कुमार चे किसका रस्ता देखे …… हे गीत, रेखा जोशी यांचे…
आला आला ग बाई
मोबाईल हाती…. हे भारुड,
डॉ. अबोली यांची, ऋणानुबंध कविता उपस्थितांची दाद मिळवून गेली.
एका साधक भगिनीने
इतनी शक्ती हमे देना दाता….
हे प्रेरणागीत गायले.
गप्पागोष्टी फेम श्री जयंत ओक यांनी एकाच, यमन या रागावर बेतलेली मराठी, हिंदी गाणी गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमापूर्वी श्री जयंत ओक यांच्या ७५ निमित्त त्यांना सुवासिनींनी औक्षण केले. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याचे आठवून या प्रसंगी ते सद्गदित झाले.
संपूर्ण कार्यक्रमाचे आटोपशीर पण हसतखेळत सूत्रसंचालन सौ अलका भुजबळ यांनी केले.
जर्मन भाषेच्या प्राध्यापक आशी नाईक या जर्मन भाषेत कविता सादर करतील असे वाटत होते, पण त्यांनी नवं वर्षा निमित्तची अर्थपूर्ण कविता सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले. ही कविता पुढे देऊन हा वृत्तांत पूर्ण करीत आहे.
सोडू एक संकल्प…..
सोडू एक संकल्प स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी
देवाने दिलेलं शरीर त्याला सुस्थितीत परत करण्यासाठी
सोडू एक संकल्प केवळ मन: शांतीसाठी ।
सातत्याने मनसा वाचा काया चे व्रत घेण्यासाठी ।।
सोडू एक संकल्प प्रिय अशा प्रियजनांसाठी ।
प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे संबंध जपण्यासाठी ।।
सोडू एक संकल्प अन्न धान्य देणाऱ्या मातृभूमीसाठी ।
तिची काळजी घेऊन तिच्या ऋणतून मुक्त होण्यासाठी ।।
सोडू एक संकल्प मानवता नावाच्या धर्मासाठी ।
एकमेका साहाय्य करून उन्नती करण्यासाठी ।।
सोडू एक संकल्प कर्त्या करवित्या ईश्वरासाठी ।
भक्तिभावाने कृतज्ञतेत राहण्यासाठी ।।
सोडू एक शेवटचा संकल्प मोक्ष प्राप्तीसाठी l
जीवन मरणाचा फेरा कायमचा पूर्ण करण्यासाठी l
— रचना : आशी नाईक.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
उरलीकांचन निसर्गोपचारचा अनुभव छान आहे. अशा स्नेहमिलन कार्यक्रमामुळे एकमेकांचे सुप्तगुण बाहेर येत आनंद मिळतो.
प्रत्येकाची कला आनंद देऊन गेली. संस्मरणीय असा कार्यक्रम झाला.
खूप सुंदर लेख ,आम्हाला प्रत्यक्ष तीथे असल्याचा अनुभव देऊन गेला .👌👏👏🎉