उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात अनेक व्यक्ती येत असतात या बद्दल आनंद वाटतो पण त्या येथून जाताना खाकरा, चटण्या असे पदार्थ मोठ्या प्रमाणात घेऊन जातात. पण या पदार्थांबरोबर त्यांनी आश्रमात उपलब्ध असलेली आरोग्य आणि विशेषत: निसर्गोपचार याविषयी विक्रीसाठी उपलब्ध असलेली पुस्तके न्यावीत, ती स्वतः वाचावीत आणि वाचून झाल्यावर इतरांना द्यावीत, अशी अपेक्षा निसर्गोपचार आश्रमाचे कार्यकारी संचालक डॉ नारायण हेगडे यांनी नुकतीच व्यक्त केली. निसर्गोपचार आश्रम आणि न्यूज स्टोरी टुडे ने आठवडाभर आयोजित केलेल्या विशेष शिबिराच्या अंतिम दिवशी त्यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांशी अनौपचारिकरित्या संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
डॉ हेगडे पुढे म्हणाले की, इथून नेण्यात येणारे पदार्थ हे लवकरच संपणारे असतात. पण पुस्तकं ही न संपणारी आणि सतत आपल्याला ज्ञान देणारी असतात. म्हणून ती आपण इथून आवर्जून नेली पाहिजेत, वाचली पाहिजेत आणि वाचून स्वतःच्या घरी न ठेवता इतरांना वाचण्यासाठी दिली पाहिजेत.
महात्मा गांधी यांनी १९४६ साली स्थापन केलेला हा आश्रम, त्यांच्या विचार धारेप्रमाणे चालविण्याचा आजवर अतोनात प्रयत्न करण्यात येत असतो. त्यांनी मानवी जीवनाचा सखोल अभ्यास, चिंतन करून जे विचार जगाला दिले आहेत, ते आजही मार्गदर्शक असून, त्यानुसार वाटचाल करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे.
यावेळी बोलताना न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केलेल्या, आजच्या तरुण पिढीने निसर्गोपचार जीवन शैलीचा अंगीकार करण्याची नितांत गरज आहे, या विधानाचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, ही अतिशय महत्वाची सूचना असून त्या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करू.
या संवादावेळी निसर्गोपचार आश्रमाचे वैद्यकीय संचालक डॉ अभिषेक देविकर योग शिक्षक श्री सतीश सोनवणे आणि इतर साधक उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800