किती सुंदर नक्षी चितारलीस ही धरतीवरती देवा
निसर्ग मानव यांच्यामधला
साधलास कां दुवा
मानवा तुला दिली
ईशाने स्वप्न पाहण्या दृष्टी
निसर्गातील चमत्कृतींनी भारावली ही सृष्टी
उंच उंच ही गिरीशिखरे परी पायथा धरतीवरती
मानवा तूंही जा उच्च प्रगतीपथी
परी अहंकारा ठेव भूवरी
नितळ नीर हे सांगे तुजसि निर्मळ ठेवी मना
द्वेषभावना, हेवेदावे विसरूनि ठेवी
मनी प्रेमभावना
पक्षी उडती नभांगणी या एकामागून एक
उत्कर्षाप्रती तूंही टाकी रे पाऊल एका मागे एक
हिरवळ फुलली असे प्रांगणी
जणुं झराच चैतन्याचा फुलवित राही संसारी
तूं बगिचा समाधान सौख्याचा
निळी निळाई हिरवाई नि शुभ्र धवल हिमशिखरी
तूंही मानवा जाणून घेई समाजात ना ठेवी दुरी

– रचना : स्वाती दामले. बदलापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800