Wednesday, January 15, 2025
Homeबातम्यानूतन मराठी शाळेत दिवाळी

नूतन मराठी शाळेत दिवाळी

दिप हे ज्ञानाचे, तेजाचे, प्रगतीचे, प्रतीक आहे. दीपावली म्हटली म्हणजे सर्वप्रथम आकाशदिवा आणि खाली मांडलेली पणती डोळ्यासमोर येतात. या पणत्याच इतक्या सुंदर दिसतात. मातीची पणती, त्यातील तेवणारी तेलवात जीवनाचं, जगण्याचं मोठं रहस्यच सांगून जाते.

मुंबई, ठाणे, कल्याण या विभागातील अशा बऱ्याच मराठी शाळा आहेत की ज्या आपापल्या परीने हा दीपोत्सव शाळेत साजरा करतात .काही शाळांमध्ये दीपोत्सव हा मानवी कलाकृतीतून दिवे साकारून केला जातो. तर “नूतन ज्ञान मंदिर”, कल्याण (पूर्व) या शाळेमध्ये गेली १० वर्ष हा दीपोत्सव परीक्षा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता साजरा केला जातो.

या वर्षी श्री सुशांत राजाराम पाटील या (माजी विद्यार्थी) यांच्या सुरेल बासरी वादनाने या दीपोत्सवाला वेगळाच साज चढला.या दिवशी शालेय पटांगण हे मातीच्या पणत्या, वात आणि तेल यांच्या साह्याने उजळवून टाकले जाते. शाळेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पणत्या लावल्या जातात.

या उत्सवामध्ये शाळेतील विद्यार्थी त्याचप्रमाणे पालक सहभागी होतात. शाळेचा सर्व परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व पालक आणि त्याचबरोबर इतरही लोक हा उत्सव पाहण्यासाठी अगदी आवर्जून येतात.

टेकडीवर असलेली ही शाळा पणत्या लावल्यानंतर पूर्ण शालेय इमारत उजळून निघते आणि तिचे सौंदर्य डोळ्यांमधे साठवून ठेवण्यासारखे असते.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गागरे मॅडम यांच्या मते विद्यार्थी आपापल्या घरामध्ये दिवाळीतच साजरी करतातच. परंतु शाळेमध्ये एकत्रित रित्या येऊन हा दीपोत्सव साजरा करण्या मध्ये एक वेगळा आनंद असतो. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिव्यामध्ये वाती घालणे शाळेचे नावं पणत्यानी तयार करणे इतका सुंदर अनुभव एकत्रित विदयार्थ्यांना यातून मिळतो. त्याच्यातील सहकार्य भावना वाढीस लागते. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये रांगोळ्या घातल्या जातात आणि त्यावर पणत्या लावल्या जातात .मुला मुलींचा आनंद ओसंडून वाहत असतो.

शाळेची इमारतही हसून हा दीपोत्सव साजरा करते. अबोल वास्तू ही आनंदाने मोहरून जाते. एक नवा उत्साह, नवी उर्मी चैतन्य त्या वास्तूत निर्माण होते. बरोबर ६:३०वा शाळेची घंटा होते आणि पुढील १० मि सर्व शालेय इमारत पणत्यांनी उजळून निघते. अवर्णनीय असे सौंदर्यवती अशी शालेय इमारत दिसते. अनेक माजी विदयार्थी देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असतात.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी गागरे शाळेचे पर्यवेक्षक श्री रमाकांत पाटील सर आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी या उपक्रमामध्ये आनंदाने सहभागी होतात आणि आपल्या ज्ञानरूपी वसा विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या संस्कृतीच्या माध्यमातून पोहोचवत असतात.

अशाप्रकारे नूतन मंदिर कल्याण पूर्व ही मराठी माध्यमाची शाळा आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याचे अविरत कार्य करत आहे. अशा प्रकारचे उपक्रम म्हणजे शाळा आणि समाज यांना जोडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.
चला तर आपणही अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊ या आणि आपली भाषा, आपली संस्कृती, आपल्या मराठी शाळा, मराठी माध्यम टिकवण्यासाठी प्रयत्न करूया.

आस

— लेखन : आस
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments