नैतिकता म्हणजे काय, चारित्र्य संपन्न कुणाला म्हणायचे, खरे खोटे कुणी कसे ठरवायचे याचा नव्याने विचार करण्याची आता वेळ आली आहे. अवतीभवतीची परिस्थिती बघता नव्या व्याख्या लिहाव्या लागतील असे वाटते.
आपल्याकडे लोकशाही आहे पण प्रत्यक्षात ठोकशाही भाषा सुरू दिसते. उत्तम संविधान आहे. छान न्याय व्यवस्था आहे. पण त्यावर विश्वास ठेवावा अशी स्थिती नाही. न्याय मिळेल का नाही,केव्हा मिळेल याची शाश्वती नाही. कायद्याचा कुणाला धाक नाही. पोलिसांची कुणाला भीती वाटत नाही. आपण सुशासनाची अपेक्षा करतो, पण तिथे कुणाला निवडून देतो आहे ? निवडून आलेल्या लोक प्रतिनिधीत किती सुशिक्षित असतात ? अनेकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. अनेक जण जेलची वारी करून आलेले आहेत. खोट्या आजाराचे निमित्त करून बेल वर बाहेर सुटलेले आहेत. असे कोणते क्षेत्र आहे, असा कोणता वर्ग आहे जिथे भ्रष्टाचार नाही ? सगळी व्यवस्था खालपासून वरपर्यंत पोखरलेली दिसते. धर्म जातीच्या पोलादी भिंतींनी समाज विभागला आहे ?
अशा स्थितीत मानव वाद, शांती, सुशासन, चारित्र्य, हे नैतिकता, सुसंस्कार याच्या गोष्टी कशा करायच्या हेच कळेनासे झाले आहे.
उत्तम शिक्षण द्यायचे म्हणजे काय काय कसे शिकवायचे ? पोट भरायला नोकरी हवी. नोकरी साठी चांगली पदवी हवी. त्याच्या भरवशावर उत्तम उत्पन्नाची अपेक्षा आली. पैसा हाती असला की समाधान, आनंद मिळेल ही भोळी आशा ! लाखो करोडो रुपये बँकेत आहेत पण कुटुंबात सुख नाही हे वास्तव.सारखी वादावादी, भांडणे, अहंकार जोपासणे, दुसऱ्याला समजून न घेणे.. हीच प्रवृत्ती.जे घरात ते समाजात..ते दोन राज्यात, देशात.. वाद जमिनीचे, वाद श्रेष्ठ कनिष्ठ कोण याचे, वाद सत्ता कुणाची याचे. सगळे माझे.दुसऱ्याला काही मिळाले नाही तरी चालेल.माझी गरज, माझा अधिकार, माझी सत्ता महत्वाची. दुनिया गई भाडमे.. ही स्वार्थी प्रवृत्ती..
प्रश्न हा की या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण ? आपणच ! म्हणजे हे सगळे सुधारायचे, दुरुस्त करायचे तेही काम आपल्यालाच करावे लागणार. कुणी देव, कुणी परी आकाशातून उतरणार नाही, आपल्या या समस्या सोडवायला. म्हणजे कारणही आपण आणि उत्तरदायी, जबाबदार देखील आपणच. असा विचित्र पेच आहे.
तिसरे महायुद्ध आलरेडी सुरू झाले आहे. जो समाज आतापर्यंत एकमेकाच्या सहकार्याने प्रगत झाला, सुजाण झाला तोच समाज एकमेकाच्या जीवावर उठला आहे आता. हे स्वतःचे वर्चस्व, प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठीचे द्वंद्व आहे. माघार घ्यायला कुणी तयार नाही. कारण ते दुर्बलतेचे लक्षण समजले जाईल ही भीती आहे.
विचित्र विरोधाभास हा की एकीकडे सुविधा पदरात पाडून घेण्यासाठी कुणाला मागासलेले हे ब्रीद लावायचे आहे. अन् दुसरीकडे श्रेष्ठत्वाची लढाई देखील जिंकायची आहे. त्यासाठी दुसऱ्याचे पाय ओढून, त्याला पाडून वर जायची, प्रसंगी वाट्टेल तो अनाचार,अत्याचार करण्याची तयारी आहे.जे. नियम,कायदे बनवतात तेच ते मोडतात ! कारण त्यांना जाब विचारणारे कुणी नाही. ते कुठूनही, कसेही सही सलामत सुटू शकतात. सत्ता त्यांच्या हातात आहे. ते कुणाशीही कसलाही विधी निषेध न बाळगता हात मिळवणी करू शकतात.
आजकालच्या जगाचे नीती नियम समजणे दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. कुटुंब व्यवस्था आधीच मोडकळीस निघाली आहे. नाती जपावी, जोपासावी याची कुणाला गरज वाटेनाशी झाली आहे. मी, माझे चौकोनी लहानसे कुटुंब हेच ज्याचे त्याचे वर्तुळ. आता तर लग्न संस्था देखील टिकेल की नाही याची शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. आज लग्न, उद्या घटस्फोट… एव्हढेच नाही तर पंधरा वीस वर्षे संसार केल्यानंतर, घरात मोठी मुले असताना त्यांच्या समोर नवरा बायकोची भांडणे होताहेत. प्रत्येकाला स्वतःचा इगो महत्वाचा वाटतो ! मीच खरा, मीच खरी हा अट्टाहास संपता संपत नाहीय. नाती टिकवायची नाहीत. उसवलेले शिवायचा प्रयत्नच करायचा नाही. त्यापोटी मुलांचाही, त्यांच्या भविष्याचाही विचार करायचा नाही. हे सगळे बघता आपण शिकलो म्हणजे नेमके काय केले, पदवी घेतली म्हणजे नेमके काय कमावले असा प्रश्न पडतो ? आपल्याला समस्या समजत नाहीत.समस्या आहे हेही कधी कधी मान्य करायचे नाही. म्हणजे समस्या सोडविण्याऐवजी त्या चिघळत ठेवण्यातच दोन्ही पक्षी रस आहे. समस्या सोडवायची म्हणजे निकाल माझ्या बाजूने, माझ्या फायद्याचा लागावा असा अट्टाहास आहे. अशा परिस्थितीत कसे सुटतील प्रश्न ? कशी टिकेल कुटुंब व्यवस्था? कसे टिकतील, मोहरतील, फुलतील संसार ?
आता तर लिव्ह इन रिलेशन चे फॅड आले आहे. लग्नाची गरजच काय असा प्रश्न सहज विचारणारी नवी पिढी येऊ घातली आहे.जसे इंटरनेट, सोशल मिडिया,अन् येऊ घातलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेने जगात उलथापालथ घडवून आणली.. तशीच उलथापालथ वैचारिक, भावनिक पातळीवर सुरू झाली आहे ऑलरेडी !
आजची पिढी, उद्याची उमलती पिढी अन् भविष्यातील येऊ घातलेली पिढी.. या साऱ्यांनाच आणखीन काय काय बघावे लागणार, कशा कशाचा सामना करावा लागणार कोण जाणे ? भावनेला किती महत्व राहील, वैचारिक गोंधळ काय रुप धारण करील काहीच आता सांगता येणार नाही..इतके आपण अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर अक्षरशा लटकतो आहोत.
कुणास ठाऊक, उद्याचा धर्म, उद्याचे संस्कार, उद्याची नीतिमत्ता, उद्याचा समाज सारेच काही नखंशिखांत बदललेले असेल. आपण कल्पनाही करू शकणार नाही असे.. अनाकलनीय.. पण चांगले की वाईट हे मात्र काळच ठरवील !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
