कवितेच्या प्रांतात माझा देव म्हणजे ‘गझलसम्राट सुरेश भट’ !
ह्या माझ्या देवाला त्यांच्या स्मृती दिनाप्रित्यर्थ आदरांजली अर्पण करावी म्हणून मी माझ्या रचने बरोबरच माझ्या मनातल्या भावना व्यक्त करणारं एक छोटंसं लेखन केलं. त्याला खूप प्रतिसाद मिळाला. असं आणखी लेखन करा अशी गोड मागणी करणारे मेसेजेस ही आले. मग गझल सम्राटांच्या चरणी वंदन केलं. त्यांच्याकडे आशीर्वादाची याचना केली आणि हे लेखन पुढे न्यायचं ठरवलं.
माझी प्रार्थना सच्ची होती, ती पोहोचली होती आणि माझ्या देवाने मला आशीर्वाद दिला होता म्हणून एके दिवशी श्री. देवेंद्र भुजबळ सरांनी, ‘अश्या प्रकारचे लेखन आपल्या पोर्टल वर सदर स्वरूपात कराल का ?’ अशी विचारणा केली. त्यांनी दिलेली संधी आणि सदिच्छा यामुळे ‘मनातली कविता’ हा प्रवास सुरू झाला.
भावलेले एकेक कवी, त्यांची माहिती म्हणजे त्यांचे प्रकाशित, अप्रकाशित साहित्य, त्यांची लेखन शैली, त्यांच्या मला आवडणाऱ्या काही कविता, त्यातलीच मनात रुजलेली एक लाडकी कविता, माझ्या बौद्धिक कुवतीप्रमाणे या कवितांचे रसग्रहण आणि सरतेशेवटी आदरांजली म्हणून माझ्या मनाने जन्माला घातलेली एक कविता असं ह्या लेखनाचं स्वरूप होतं.
खरं म्हणजे ‘कवितेचे रसग्रहण’ ही एक संकल्पना आहे. मी माझ्या लेखनात ह्याचा वारंवार उल्लेख केलेला आहे की कवितेला नक्की काय सांगायचं आहे, ह्याचे आपण केवळ अंदाज बांधायचे…क्षितिजाच्या पार जाणाऱ्या तेजाची कल्पना चौकटीत उभं राहून कशी करायची ? आणि म्हणून केवळ कवितेचे रसग्रहण इतका संकुचित आवाका न ठेवता माझ्या लेखनातून त्या कवीचे भावविश्व आणि शैली ओळखण्याचा आणि ‘कविता’ ह्या शब्दाचा खऱ्या अर्थाने परिचय करून घेण्याचा आणि देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता.
ह्यात, माझ्यावर ज्यांच्या कवितांचे संस्कार झाले अश्या मला भावलेल्या कविवर्यांवर मी लिहीत गेले आणि बोलता बोलता ही संख्या कधी २४ वर पोहोचली कळलंच नाही.
१. कवयित्री शांता शेळके
२. कवी माणिक गोडघाटे (कवी ग्रेस)
३. कवी सुरेश भट
४. कवी बा.भ. बोरकर
५. कवयित्री इंदिरा संत
६. कवी वि. वा. शिरवाडकर. (कवी कुसुमाग्रज)
७. कवी वसंत बापट
८. कवी त्रिंबक बापुजी ठोमरे (बालकवी)
९. कवयित्री बहिणाबाई चौधरी
१०. कवी विंदा करंदीकर
११. कवी आत्माराम रावजी देशपांडे. (कवी अनिल)
१२. कवी वा. रा. कांत
१३. कवी कृष्णाजी केशव दामले
१४. कवी राम गणेश गडकरी. (कवी गोविंदाग्रज)
१५. कवी ग. दि. माडगूळकर
१६. कवयित्री पद्मावती गोळे
१७. कवी चिंतामणी त्रिंबक खानोलकर. (कवी आरती प्रभू)
१८. कवी भा. रा. तांबे
१९. कवी माधव पटवर्धन. (कवी माधव ज्युलियन)
२०. कवी सुधीर मोघे
२१. कवी बा. सी. मर्ढेकर
२२. कवी नारायण सुर्वे
२३. कवी मंगेश पाडगांवकर
२४. कवी प्रल्हाद केशव अत्रे. (कवी केशव कुमार)
ह्या २४ कवींचा ह्या सदरात समावेश आहे. अर्थात, मराठी काव्य विश्वात केवळ ह्यांचेच अस्तित्त्व होते असे मला मुळीच म्हणायचे नाही. कित्येक अनमोल रत्ने माझ्याकडून राहिली आहेत. त्याबद्दल मी वाचकांची क्षमा ही मागते, परंतू हे लेखन म्हणजे केवळ जे रुचलं, जे रुजलं त्याला पालवी फुटून उमललेली फुले आहेत.
ह्याच फुलांची माला ‘ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके ‘ यांच्या पासून ‘कंठहार’ रूपाने गुंफायला सुरुवात केली होती. ‘कवीवर्य केशव कुमार’ अर्थात आचार्य अत्रे यांचे २४ वे पुष्प त्यात गुंफून तो ‘आनंद’ उरी घेऊन
‘मनातली कविता’ ह्या सदराचा समारोप झाला.
मी खरोखर अतिशय भाग्यवान आहे की मला ही संधी मिळाली. ही संधी दिल्याबद्दल श्री. देवेंद्र भुजबळ सरांचे मनापासून आभार !
सर्व वाचकांनी अगदी मनापासून माझं लेखन वाचलं, त्याचं कौतुक केलं, भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत त्याबद्दल त्या सर्वांचेही खूप खूप आभार !
ह्या प्रवासात सगळ्यात मोठा आनंद खरं तर माझ्याच वाट्याला आला आहे. कसा ते सांगू ?
‘मनातली कविता’ या निमित्ताने ह्या कविवर्यांशी माझ्या पुन्हा भेटी झाल्या. त्यांच्या कविता पुन्हा एकदा भेटल्या आणि प्रत्येकीने स्वतःचा नव्याने परिचय करून दिला !
या नव्या परिचयाचे कारण, मी पूर्वीपेक्षा जरा बुद्धीने, विचाराने अधिक परिपक्व झाले आहे की मनाने, संवेदनेने अधिक हळवी झाले आहे, हे मला निश्चिपणे नाही सांगता येणार पण मला कवितांचा मोह, त्यांचे प्रेम आणि त्यांच्याबद्दल अनामिक ओढ वाटण्याचे हेच कारण असावे.
‘संपूर्ण जाणून घेतल्यानंतरही उरणारी एक हुरहुर लावणारी अनभिज्ञता !’

– लेखन : डॉ. गौरी जोशी कंसारा. न्यू जर्सी, अमेरिका.
☎️ 9869484800